Saturday, July 25, 2026

अविनाशी गुरू

 

१९९६ साली एक बातमी वर्तमानपत्रामध्ये आली कि कुणी एक सनदी अधिकारी कि जे मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काम पहात होते, त्यांनी प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन सामाजिक जीवनात प्रवेश करायचे ठरविले आहे. बातमीमध्ये असेही नमूद केलेले होते कि दहा वर्षे प्रशासकीय सेवेत व्यतीत केल्यानंतर अशी स्वेच्छानिवृत्ती घ्यायची असा निर्णय त्यांनी सेवेमध्ये रुजू होतानाच घेतला होता. बातमीमध्ये पुढे असेही नमूद केल्याचे स्मरते कि निवृत्ती नंतर त्या अधिकाऱ्याने पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या प्रांगणात एक सभा घ्यावयाचे योजले होते, आणि त्या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि वाजपेयीजींच्या सरकारमधील एक वरिष्ठ मंत्री, श्री. अरुण शौरीजी ह्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले होते. मी त्यावेळी कायद्याच्या शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षांमध्ये होतो. उमेदीचा, वेगळ्याच नवलाईचा आणि उत्साहाचा तो काळ, जेव्हा सामाजिक जाणीवा अधिकच सजग होत्या, आणि अशी काही बातमी वाचून कुतूहल तर जागे झालेच होते. त्यामुळे मी सभेतील त्यांचे भाषण ऐकायला सभास्थळी पोहोचलो. ते सनदी अधिकारी सभेमध्ये नक्की काय बोलले ते आत्ता अजिबात स्मरत नाही, परंतु त्यांच्या भाषणाने मी प्रचंड प्रेरित झालो होतो, आणि घरी येऊन मी त्यावर एक छोटासा लेखही लिहिला होता. मला तो माझाच लेख फार आवडला होता (मध्यंतरी तो शोधला, पण दुर्दैवाने तो सापडला नाही).

त्यानंतर त्यांच्याविषयी कुठे ना कुठे काही ना काही वाचनात, ऐकिवात येत राहिले असेल. पण पुन्हा त्यांना ऐकण्याचा, पाहण्याचा योग १९९९ साली रामकृष्ण मिशन मध्ये १२ जानेवारी ह्या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीपूर्वी आयोजित केलेल्या एका व्याख्यानमालेच्या निमित्ताने आला. ह्या व्याख्यानमालेत रोज एका वक्त्याचे भाषण असायचे. काही वक्त्यांची भाषणे २ दिवसही होती, पण ह्या सनदी अधिकाऱ्यांचे व्याख्यान सलग ३ दिवस होते. सलग ३ दिवस त्यांचे व्याख्यान आणि तेही स्वामी विवेकानंद ह्या विषयावर म्हणजे पर्वणीच होती. अर्थातच इतर सर्व वक्त्यांमध्ये मला सर्वात अधिक आवडली ती ह्यांचीच व्याख्याने. अमोघ वक्तृत्व आणि पांडित्यपूर्ण सखोल अभ्यास ह्यांनी त्यांची व्याख्याने अत्यंत प्रभावी झाली होती.

२००१ साली मी Rotaract Club चा President असताना आम्ही एक फार मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला आम्ही ह्या सरांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. अर्थात हि कल्पना माझीच होती. मला आठवते त्याप्रमाणे कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि छोटासा वार्तालाप देखील झाला होता. पण कार्यक्रमाच्या दिवशी माझा एक सहकारी त्यांना घरातून कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी उशिरा पोहोचला आणि त्यामुळे त्यांनी कार्यक्रमास येण्यास नकार दिला (दिल टूट गया था मेरा तब!).

त्यानंतर बरीच वर्षे त्यांना ऐकण्याचा योग आल्याचे मला आठवत नाही. पण साधारणपणे २०११-१२ च्या सुमारास मी त्यांच्या एका कविता संग्रहाचे audio book विकत घेऊन त्यांच्या कविता त्यांच्याच आवाजात ऐकल्या. बहुतेक सर्व कवितांमधून राष्ट्रप्रेरणा देणारा, सामाजिक आणि चिंतनात्मक असाच आशय होता. शब्दप्रभुत्व आणि आशय संपन्न कविता सरांच्या गंभीर आवाजात ऐकणे हि एक अनोखी उपलब्धी होती. त्या कविता संग्रहाचे नाव होते "रात्र गहिरीच्या तिसऱ्या प्रहरी" आणि त्याचे कवी आहेत श्री. अविनाश धर्माधिकारी सर.

'रात्र गहिरीच्या तिसऱ्या प्रहरी' आणि 'अस्वस्थ दशकाची डायरी' हि त्यांची दोन पुस्तके मी माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून ऐकून होतो. हि नावेच मला इतकी आवडली होती कि ती वाचण्याची फार उत्सुकता होती. रात्र गहिरीच्या..... ऐकले ते वर लिहिलेच. 'अस्वस्थ दशकाची डायरी' काही वर्षांपूर्वी एका मैत्रिणीकडून घेऊन वाचायला घेतले होते, परंतु त्यावेळी ते पूर्ण होऊ शकले नाही. पण १-२ वर्षांपूर्वी सरांनी हे पुस्तक YouTube वर ध्वनिबद्ध करून प्रकाशित केले तेव्हा पुन्हा एकदा सरांच्या अद्भुत वाचनशैलीत हे पुस्तक ऐकण्याचा योग आला. एक भाग ऐकून झाल्यानंतर पुढील भाग प्रकाशित होण्यापूर्वी प्रचंड उत्कंठा असायची. १९७५ ते १९८५ ह्या दशकामधील अस्वस्थ-धुमसत्या भारताचे प्रत्यक्षदर्शी वर्णन, अनुभव-कथन आणि विचार-प्रदर्शन सरांनी ह्या पुस्तकात केले आहे. माझा जन्म १९७५ चा. मला मी वर्तमानपत्र व्यवस्थितपणे वाचायला लागल्याचे आठवते ते Operation Bluestar पासून. त्यावेळी वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर पंजाबमधील दहशतवादावर खूप बातम्या असायच्या. सरांच्या ह्या पुस्तकामध्ये पंजाबमधील तो अस्वस्थ कालावधी, आसाममधील आसूच्या आंदोलनांचा धुमसता कालावधी, गुजराथमधील विद्यार्थी आंदोलनांचा आढावा अशा भारताच्या अखंडतेला आव्हान देणाऱ्या अनेक ऐतिहासिक घडामोडींचा उहापोह आहे, पण मुख्य म्हणजे सरांनी त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून तसेच भारताचा कार्यकर्ता म्हणून ह्या सर्व भागांमध्ये जाऊन, पाहणी करून, त्या समस्यांशी निगडित व्यक्ती (अगदी भिन्द्रावले, प्रफुल कुमार महंता ते अडवाणीजी) ह्यांच्याशी वार्तालाप करून, तेथील भूभाग; लोकमानस, सामान्य जनता ह्या सर्वांचे अवलोकन करून त्यावर निःपक्षपाती, वास्तववादी पण तरीही राष्ट्रीय हित आणि एकात्मता हि उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन केलेले लेखन अत्यंत उद्बोधक आहेच, परंतु रोचकही आहे. सर ह्या पुस्तकातून भेटत राहिलेच, पण गेली सुमारे १० वर्षे अविनाश सर मला नित्यनेमाने YouTube वर भेटत राहिले आहेत, आणि आजही भेटत आहेत.

हिंजवडीमध्ये माझे ऑफिस असल्याने बिबवेवाडी ते हिंजवडी ह्या सुमारे ३५ किलोमीटरच्या, १-१.५ तासाच्या प्रवासात माझे वाहन चालवता चालवता मी YouTube वर जे काही सतत ऐकत असायचो त्यात सरांची अनेक व्याख्याने त्यांच्या चाणक्य मंडळाच्या किंवा त्यांच्या वैयक्तिक channel वर ऐकत आलो आहे. गेल्या १० वर्षातील सरांचे Youtube वरील एकही व्याख्यान मी miss केलेले नाही, अगदी अनावधानाने झाले असेल तरच. सर्वप्रथम Youtube वर चाणक्य मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमात सरांनी दिलेली अनेक विषयांवरची अप्रतिम व्याख्याने ऐकण्यात आली. एक वर्ष सरांनी विविध देशांमध्ये घडून आलेल्या क्रांती, उदा. अमेरिकेतील यादवी युद्ध, फ्रांसमधील Joan of Arc ची चित्तथरारक जीवनगाथा, जपानमधील Meiji Restoration ची अद्भुत कहाणी, चीनच्या यादवीमधील माओचा Long March आणि अर्थातच भारताविषयीचे कारगिल युद्ध अशा काही कथा आणि त्यातील कथासार अत्यंत खिळवून ठेवणाऱ्या त्यांच्या अफाट वक्तृत्वशैलीत सांगितल्या आहेत. त्यानंतरच्या वर्षात पर्यावरण, दहशतवाद, जागतिकीकरण, लोकशाही, अण्वस्त्र युद्धे अशा अनेक विषयांवर अतिशय अभ्यासपूर्ण, रोचक, रोमांचक अशी व्याख्याने आहेत. हळूहळू सरांनी अनेकविध विषयांवर व्याख्याने, भाषणे, पुस्तक वाचन, मार्गदर्शनपर संभाषणे, संवादपूर्ण चर्चासत्र असा ज्ञानाने ओतप्रोत, वक्तृत्वाने समृद्ध, विषय वैविध्याने नटलेला प्रचंड खजिनाच YouTube च्या माध्यमातून सर्वांसाठी खुला केलेला आहे. सरांचा दिग्मूढ करून सोडणारा व्यासंग, अभ्यास, वक्तृत्व ह्याबरोबरच विनम्रता, बोलण्या-वागण्यातील तरुणाई, राष्ट्र-प्रथम हि अविचल भूमिका, भारतीय संस्कृती; साहित्य, संस्कार ह्याविषयीचा सार्थ अभिमान, विज्ञान असू द्या कि गणित; शास्त्र असू द्या कि कला; साहित्य असू द्या कि संगीत, सर्वच विषयांचा अत्यंत सखोल अभ्यास आपल्याला अचंबित करून सोडतोच, पण त्यांची व्याख्याने ऐकता ऐकता आपण श्रीमंत देखील होत जातो. त्यांची प्रेरणादायी भाषणे देखील उत्तम काम करण्याची प्रेरणा देतात. उत्तमता आणि प्रतिभा ह्याच्या संगमातून उत्तम काम करून देशाला पुढे घेऊन जाणे हा त्यांचा सततचा संदेश असतो. प्रत्येक भाषणाची सुरुवात 'सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा' ह्यांनी सर करतात, वारंवार महाराष्ट्राची भूमिका हि भारताला समृद्ध आणि समर्थ करण्याची आहे, आणि भारताची भूमिका 'वसुधैव कुटुंबकम' हि आहे ह्याचे स्मरण करून देतात. पुस्तके कशी वाचावीत, अभ्यास कसा करावा, अभ्यासाचा उद्देश काय असावा, वाचनाचा वेग कसा वाढवावा, वेळेचे नियोजन कसे करावे अशा एक ना अनेक मार्गदर्शपर विषयांवरील त्यांची व्याख्याने सर्वांनाच अत्यंत उपयुक्त आहेत.

सरांची हि व्याख्याने मी एकूण अगणित तास ऐकली आहेत, सतत ऐकत असतो आणि ऐकत राहीन. त्यांच्या ह्या भाषणातून ज्ञान, कौशल्य, स्वयंप्रेरणा, शिस्त, नियोजन, विनम्रता, देशप्रेम, लोकप्रेम, संस्कृती प्रेम, अस्मिता, अभ्यास, व्यासंग, वक्तृत्व, निश्चय, धैर्य नि धीरोदात्तता, अशा किती किती गोष्टी माझ्या परीने शिकल्या आहेत, शिकतो आहे, शिकत राहणार आहे! त्यांनीदेखील हे सर्व videos माझ्याप्रमाणेच अनेकांना खूप काही शिकता यावे ह्याच उदात्त हेतूने post केलेले आहेत. आणि त्यामुळेच माझ्याप्रमाणेच अनेकांचे श्री अविनाश धर्माधिकारी हे एक 'अविनाशी गुरूवर्य' आहेत हे कबूल करताना मला अतिप्रचंड आनंद होत आहे. सरांना निरामय दीर्घायुष्य लाभो हीच त्यांच्याप्रती मनापासून प्रार्थना!

--

सारंग भणगे

गोविंद निहलानींचा "विजेता" (१९८२)


अंगद एक दिशाहीन युवक, वडिलांशी त्याचा कलह. आपल्या मामामुळे तो भारतीय सेनेच्या प्रशिक्षणासाठी NDA मध्ये दाखल होतो. तिथल्या प्रशिक्षणातदेखील अंगदची कामगिरी सामान्यच असते. एका boxing च्या सामन्यात तो हारतो, पण हरण्याआधी तो इतका मार खातो कि त्याचा प्रतिस्पर्धी म्हणतो कि 'तुझ्यात सहनशक्ती जबरदस्त आहे, पण जर का तू थोडासा प्रतिहल्ला केला असतास तर कदाचित मी हारलो असतो. अंगद खेळात हारतो, परंतु हार न मानता. आणि हे हार न मानणे हाच आहे विजेताचा सारांश, जो शेवटपर्यंत अनेक प्रसंगातून ठळकपणे जाणवत राहतो. हार न मानण्यामधून देखील एक विजिगीषु वृत्तीचे दर्शन घडवणारा गोविंद निहलानींचा १९८२ सालचा 'विजेता' हा चित्रपट नितांत सुंदर आहेच, आणि माझा सर्वोत्तम चित्रपटातील सर्वात आवडता आहे!

तसे अनेक चित्रपट आहेत ज्यात नायक/नायिका पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितून प्रचंड संघर्ष करून परमोच्च यश मिळवतात. विजेताचे वैशिष्ट्य असे आहे कि ती एकदम वास्तवातील, आपल्या रोजच्या जीवनातील कथा वाटते कारण अंगदचा संघर्ष हा अनेक लोकांचा संघर्ष असू शकतो, तो जवळचा वाटतो, उगाच असामान्य वाटत नाही. ना त्याची परिस्थिती अति प्रतिकूल असते, ना त्याच्यामध्ये काही असामान्य कौशल्य असते, ना तो शेवटपर्यंत काही प्रचंड असाधारण असे यश प्राप्त करतो. तो धाडसी नाही, पराक्रमी नाही, त्याच्यात कुठलेच विशेष कौशल्य नाही; प्रतिभा नाही, त्याला ना त्या boxing च्या सामन्यात कर्तृत्व गाजवता येते, ना fighter pilot बनण्याच्या प्रशिक्षणाचे वेळी सर्वसामान्य सैनिक ज्या कसरती विमान चालवताना करत असतात त्या त्याला करता येतात, तो कुठे शत्रूला नामोहरम करीत नाही, त्याला आपल्या girlfriend ला साधे आपले प्रेमही व्यक्त करता येत नाही,की पण तरीही तो विजेता बनतो. 

अंगद फक्त हरत नाही, तो संघर्षाला नाही म्हणत नाही, तो लढतो असेही म्हणता येणार नाही, फक्त तो तग धरून राहतो, जिद्द सोडत नाही. एवढे करूनही तो पूर्ण चित्रपटात उठून दिसतो असेही नाही. तो सामान्य असतो, तो सामान्यच राहतो. परंतु सामान्यकडून अतिसामान्यकडे खेचणाऱ्या gravity pull ला प्रतिरोध करत तो जिद्दीने विजेता बनतो, हेच त्याचे असामान्यत्व असे मी म्हणेन. 

ह्याच पार्श्वभूमीवर असलेल्या इतर कुठल्याच चित्रपटांप्रमाणे heroic कामे न करणारा हा विजेता मला तरी प्रचंड आवडला. हा चित्रपटदेखील असामान्य असूनही सामान्यच राहिला, म्हणजे ना तो commercial hits मध्ये गणला जातो, ना तो cult movie म्हणून नावाजला जातो, ना त्याचे parallel art movie म्हणून कौतुक होते. एवढेच काय तर गोविंद निहलानींचे उत्कृष्ट चित्रपट कोणते हे विचारले तर त्यात विजेताची गणना होणे तर सोडाच, पण कदाचित तो फार कुणाला आठवणार देखील नाही.

कुठेतरी एका कथेत लहानपणी वाचले होते जे 'विजेता'ला तंतोतंत जुळते कि 'त्याचे असामान्यत्व त्याच्या सामान्य असण्यातच आहे'!

तळटीप: हे चित्रपटाचे परीक्षण वगैरे नसल्यामुळे जुजबी तपशील सोडला तर चित्रपटाविषयी किंवा त्याच्याशी संबंधित कलाकारांविषयी काहीही लिहिलेले नाही.

सारंग भणगे.

स्वाध्यायान्मा प्रमदः


१९९९ साली प्रथम परमपूज्य पांडुरंगशास्त्री तथा दादा आठवले प्रणित "स्वाध्याय" परिवाराशी माझा परिचय झाला. सर्वसाधारणपणे कुठल्याही अध्यात्मिक किंवा पारमार्थिक संस्था-संप्रदायांच्या कार्य किंवा जीवनपद्धतीपेक्षा अतिशय वेगळ्या प्रकारे 'स्वाध्याय' परिवार चालतो. परंपरानाचे पालन अपारंपरिक पद्धतीने करणारा हा परिवार (संस्था किंवा संप्रदाय नव्हे!), ह्याची काही मला जाणवलेली ठळक वैशिष्ट्ये म्हणजे - गंध; टोपी; माळ ई. कुठल्याही प्रकारच्या साधनांची गरज नाही, एका जागेवर बसून केलेल्या फक्त साधना - उपासना ह्याहून अधिक कार्यशील साधक-प्रचार (भावाफेरी-भक्तीफेरी) ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे, परिवाराच्या कार्यासाठी दान-देणग्या न घेता, आणि कधीही कुणालाही न मागता, परिवाराशी निगडित असणाऱ्या प्रामाणिक निरपेक्षपणे सिद्ध झालेल्या इच्छुकांकडूनच खाजगीरित्या देणगी स्वीकारणे, उपासना करताना आनंदमय राहून प्रत्येक तंत्र-मंत्राचा अर्थ आणि ध्वनी समजावून घेऊन मग त्यांची उपासना करणे, केवळ स्तोत्र-मंत्रांमध्ये न अडकता वैचारिक परिवर्तन घडविण्यासाठी बुद्धिवादी-ज्ञानवादी बनणे ई. अशा तऱ्हेने कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग आणि भक्तियोग, अशा चारही योगांची सांगड घालून परमार्थ साधण्याचा एक अभिनव प्रयोग दादांनी ह्या देशामध्ये घडवून आणला! मला अजून आठवते आहे कि दादांना जेव्हा, ज्याला आशिया खंडातील नोबेल म्हटले जाते असा प्रतिष्ठित मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ते एका मुलाखतीत म्हणाले होते कि हे पुरस्कार म्हणजे भगवंताची love letters आहेत!

स्वाध्याय परिवाराचा मूलमंत्र म्हणजे "स्वाध्यायान्मा प्रमद:" ह्याचा अर्थ हाच कि स्वाध्याय, अर्थात स्व-अध्याय ह्यामध्ये कधी कसूर करू नये. संस्कृत किंवा मराठीतही प्रमाद म्हणजे गुन्हा. त्यामुळे मी ह्या घोषवाक्याचा अर्थ स्वाध्याय न करणे हा प्रमाद आहे असा घ्यायचो. मुळात तुम्ही सतत स्वाध्याय करत रहा हाच संदेश त्यामध्ये स्वाभाविकपणे अभिप्रेत आहे. आता स्वाध्याय म्हणजे जरी वरकरणी औपचारिक शिक्षण झाले तरीही तुम्ही स्वतःच अध्ययन करत रहा असा असला तरी एक अर्थ असाही घेता येऊ शकेल असे वाटते कि आता भौतिक शिक्षण झाल्यानंतर स्व विषयीचा अभ्यास, म्हणजे आत्मज्ञानाचा अभ्यास करत राहावे. काहीही असले तरी सतत अभ्यास करत राहा इतका साधा, सरळ, सुस्पष्ट संदेश देणारे घोषवाक्य, प्रेरणावाक्य असलेल्या परिवाराविषयी कुणासही आदर असणे स्वाभाविक असावे!

काही मोजक्या वर्षांच्या स्वाध्याय परिवारातील माझ्या सहभागानंतर आज अनेक वर्षांनी माझ्या मनात 'स्वाध्यायान्मा प्रमद:' ह्याचा उद्घोष पुनरवाने होऊ लागला आहे. स्वाध्यायाचे नवीन अर्थ, नवीन आयाम ह्यांचा शोध घ्यावा, ह्यावर विचार करावा, स्वतःच्या आयुष्यात त्यांचा समावेश अधिक प्रभावीपणाने करावा असे प्रकर्षांने प्रतीत होऊ लागले आहे. तसे तर ज्ञानतृष्णा हि सतत आहे, परंतु त्याचे रूपांतर ज्ञानसाधनेत करणे, स्वाध्यायात करणे ह्यावर आजवर चिंतन केले नव्हते, ते चिंतन आज करावे वाटू लागले आहे. ते नक्की कसे करायचे ह्यावर पुढील काळात चिंतन करून रचनात्मक पद्धतीने स्वाध्याय करावा असा ध्यास घेण्याचा मी संकल्प करणार आहे!

सारंग भणगे

विजिगीषु जीवनवाद

 

स्वाध्यायन्मा प्रमद: ह्या स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख सूत्रानुसारच परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले (अर्थात दादा) ह्यांच्या अनेक सर्वोत्तम शिकवणुकींमधील एक उत्कृष्ट शिकवण म्हणजे 'विजिगीषु जीवनवाद'! दादांच्या अनेक प्रवचनांमधून प्रकट झालेल्या विचारधनाचे संकलन करून विजिगीषु जीवनवाद हे पुस्तक स्वाध्याय परिवारातर्फे प्रकाशित झालेले आहे. मी ते अनेक वर्षांपूर्वी वाचले होते, त्यामुळे अर्थातच त्यातील तपशील आता स्मरणातून गेला आहे, पण त्याचे सारतत्वबीज subconcious mind मध्ये रुजले गेले आहे.

विजिगीषु जीवनवाद हा दोन शब्दांमध्येच प्रचंड जादू आहे, प्रचंड भावार्थ संपुटित झालेला आहे. मला तरी केवळ हे दोन शब्द ऐकले तरीही छातीमध्ये आत्मविश्वासाची हवा भरल्यासारखे वाटते. दादांची अविरत प्रसन्न मुद्रा डोळ्यासमोर तरळून जाते आणि मनात प्रसन्नतेची फुले सहजच उमलतात. खरेतर दादांची ती चिरप्रसन्न मुद्रा हे विजिगीषु जीवनवाद ह्या शब्दांचे, त्यातील विचारांचे भाषांतर किंवा प्रतीक आहे अशी माझी भावना आहे! त्यामुळेच विजिगीषु जीवनवाद हे शब्द आणि दादांची ती मुद्रा हे जणू अद्वैतच असल्याप्रमाणे वाटते आणि माझ्याही मनात एका प्रसन्न आत्मविश्वासाची निर्मिती होते.

विजिगीषु चा सरळ शब्दार्थ जिंकण्याची इच्छा असलेला असा आहे. पण त्या शब्दार्थाच्या पलीकडे ह्या शब्दातील जीवनार्थाचा समुद्र भरलेला आहे. विचार करत असताना असे जाणवले कि आशावाद (कि ज्याविषयी सातत्याने बोलले जाते) हा निश्चित चांगला आहेच, परंतु आशावादामध्येदेखील एक नकारात्मक छटा आहे. आशावादामध्ये सद्य परिस्थिती हि नकारात्मक असल्याची भावना कुठेतरी सूचित होते असे मला वाटते आहे. तर विजिगीषुमध्ये कुठल्याही आव्हानांवर, समस्यांवर, विपरीत परिस्थितीवर मात करून "विजेता" होण्याचे सामर्थ्य वाटते. मनामध्ये सतत विजयी होण्याचे शिवाजी महाराजीय सामर्थ्य विजिगीषुमध्ये मला जाणवते. विजिगीषु हि अधिक कृतीशील करणारी, विधायक/ सकारात्मक कृतीसाठी प्रेरणा देणारी अशी वृत्ती वाटते, तर आशावाद हि तशी निष्क्रिय भावना वाटते. म्हणजे, कठीण काळ संपेल - हा झाला आशावाद, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती परिस्थिती अनुकूल बनवण्यासाठी कृती करण्याची प्रेरणा देते ती विजिगीषु वृत्ती! बोगदा संपून कधीतरी प्रकाश किरण दिसेल अशी भावना हा आशावाद; तर प्रकाश किरण दिसण्यासाठी वेळ पडली तर बोगदासुद्धा फोडेन हि विजिगीषु वृत्ती!

अशी हि वृत्ती हाच आपला जीवनवाद असावा, म्हणजेच ती केवळ काही काळापुरती किंवा प्रसंगापुरती भावना नव्हे, तर ती वृत्ती आहे; स्व-भाव आहे कि ज्यातून केवळ प्रतिकूल परिस्थितीतच नाही, तर अनुकूल परिस्थितीमध्येदेखील विजिगीषु वृत्ती बाणवून सतत जीवनोत्कर्ष साधणे हा विजिगीषु जीवनवाद! विजिगीषु वृत्ती जेव्हा जीवनवाद होतो, तेव्हा संपूर्ण जीवनच 'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर' ते ते जीवनात अंगिकारण्याची, प्राप्त करण्याची प्रेरणा देत राहते.

योगेश्वर-कृष्ण हा दादांचा फार आवडता, आणि कृष्णाचे संपूर्ण जीवनच विजिगीषु जीवनवादाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. समरांगणात शस्त्रत्याग करून हतबल झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृषणांनी सांगितलेल्या भगवद्गीतेचे सार देखील कदाचित विजिगीषु जीवनवादच असावे, किमान अर्जुनामध्ये विजिगीषु वृत्तीला प्रेरणा देण्याचेच काम भगवंताने केले असे म्हणायला काही प्रत्यवाय नसावा. शिवाजी महाराज हे देखील विजिगीषु जीवनवादाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत.

आज कैक वर्षांनी जेव्हा विजिगीषु जीवनवाद ह्यावर विचार करावयास बसलो तेव्हा आधी मी म्हटल्याप्रमाणे मनामध्ये रुजलेले किंवा रुतून बसलेले हे सुप्त विचार प्रकट झाले. वर लिहिलेले सर्व हे केवळ विजिगीषु जीवनवादाविषयीचे माझे आकलन आणि चिंतन आहे. पुस्तकातील विचार निश्चितपणे ह्याहून कितीतरी अधिक सखोल, व्यापक, प्रेरणादायी असणार हे निश्चित!

सारंग भणगे.

ईश्वराचा formula



देव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय? ह्या विषयावर अगदी college च्या दिवसांपासून चिंतन करत आलो आहे. विधी महाविद्यालयातील पहिल्या वर्षी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून संपूर्ण वर्गासमोर आपल्या आवडत्या विषयावर एक भाषण द्यावयाचे असायचे. त्यावेळीही मी आपल्या परीने समजलेला 'देव म्हणजे काय?' असाच विषय निवडला होता. हा विषय असा आहे कि ज्यावर अखंड आयुष्य चिंतन करीत राहिले तरी कदाचित निश्चित उत्तर मिळणार नाही, किंवा उत्तर मिळून देखील समाधान होणार नाही, किंवा आज मिळालेले उत्तर उद्या वेगळ्या स्वरूपात समजेल; अधिक स्पष्ट होईल. त्यामुळेच ह्या प्रश्नाचे वेळोवेळी झालेले आकलन, आपले जमा झालेले चिंतन व्यक्त करत राहण्यातून हा शोध अधिक सुस्पष्ट होत जाईल असे वाटते.

दुसरा भाग म्हणजे, हा प्रश्न म्हटले तर इतका जटील आहे कि कदाचित प्रत्येकाला सापडलेले उत्तर हे निरनिराळे असू शकेल आणि ती सारीच उत्तरे आपापल्या जागी बरोबर असू शकतील - पूर्णतः वा अंशतः! किंवा कदाचित हा प्रश्नच नसेल किंवा ह्याला निश्चित असे उत्तरच नसेल. शक्यता अनेक आहेत, आणि अशा अनेक शक्यतेतील एक शक्यता माझ्या आकलनानुसार मांडायचा हा प्रयत्न! जिथे वेदोपनिषदांनीदेखील ह्या प्रश्नाचे उत्तर देताना केवळ नेsति  नेsति एवढेच सांगितले, तिथे माझ्या ह्या आणखी एका प्रयत्नाला कुणी नेsति म्हणून नाकारले तरी त्याबद्दल मला खचितच खेद वाटणार नाही.

सनातन धर्मामध्ये ईश्वर हा चैतन्यस्वरूप मानला आहे. ईश्वराचे वर्णन करताना सतचित्तानंदस्वरूप असेही केले जाते, ह्यामधील सत् म्हणजे सनातन अर्थात चिरंतन किंवा शाश्वत, तर चित् म्हणजे विशुद्ध अशी चेतना अर्थात चैतन्य.

सनातन धर्मातील दुसरी एक धारणा म्हणजे ईश्वर जर मूर्तिमंत चैतन्य असेल तर सर्व प्राणिमात्र हे त्या चैतन्याचे अंश आहेत, म्हणजेच प्रत्येक प्राणिमात्रांमध्ये ईश्वराचा अंश आहे, ईश्वरीय चेतनेचा अंश आहे, आणि म्हणूनच तत्वमसि म्हणजे 'तो (ईश्वर) तूच आहेस', अहं ब्रह्मास्मि म्हणजे मीच ते ब्रम्ह आहे अशा मान्यता आहेत. त्यामुळेच 'नर का नारायण' होऊ शकतो ही मान्यता आहे. अर्थात, ईश्वर हा सर्वाभूती समाविष्ट आहे, आणि तो चेतनेच्या स्वरूपात प्रत्येक प्राणिमात्रांमध्ये, अगदी जड वस्तूंमध्येदेखील प्रकट झाला आहे, परावर्तित झाला आहे. ह्या विचाराचे एक स्पष्टीकरण विश्वनिर्मितीच्या वैदिक मान्यतेमध्ये निहित आहे. 'एकोऽहम् बहुस्याम्' ह्या सूत्रामधून वैदिक वाङ्मयात विश्वनिर्मिती सांगितली गेली आहे. ईश-तत्व हे एक होते आणि त्या तत्वाने बहू अर्थात अनेक होण्याचा 'संकल्प' केला. त्या संकल्पाची परिणती म्हणजे ते सघन एकमेवाद्वितीय चैतन्यस्वरूप ईशतत्व बहू झाले, आणि ते बहू होताना त्या अतिप्रचंड अतिसामर्थ्यशाली ईश्वरीय चेतनेतून त्या चेतनेची अनेकविध रूपे निर्माण झाली. Big bang theory मध्येही अगदी हेच सांगितले आहे कि संपूर्ण विश्व हे singularity स्वरूपात असताना प्रचंड महास्फोट होऊन विश्व, अंतराळ, ग्रह-तारे ई. तयार झाले. हि singularity म्हणजेच ते चैतन्यस्वरूप ईश तत्व, आणि त्या प्रचंड स्फोटातून निर्माण झालेली, बहुस्याम झालेली सृष्टी म्हणजेच त्या singularity चीच अनेक दृश्य रूपे. ह्या न्यायाने प्रत्येक अणुरेणूंमध्ये, मग भले तो जड वस्तूंमधील असो कि जड देहांमधील, सर्वत्र ते singularity नामक ईशतत्व समाविष्ट आहे. ह्याचाच अर्थ सृष्टीच्या प्रत्येक घटकामध्ये चेतना आहे. काही घटकांमध्ये ती अधिक जागृत आहे, तर काही घटकांमध्ये ती सुप्तावस्थेत आहे. चेतना जागृत असणारे सजीव आणि नसणारे निर्जीव. निर्जीव वस्तूंमध्ये चेतना नाही हा भ्रम आहे हे तर आजच्या शास्त्राने देखील सिद्ध झाले आहे. प्रत्येक वस्तूमध्येदेखील binding energy च्या स्वरूपात अतिप्रचंड अशी चेतना असते. आईन्स्टाईनच्या  E = mc² ह्या formula मध्ये हेच सांगितले आहे कि प्रत्येक वस्तूमध्ये त्या वस्तूचे वस्तुमान आणि प्रकाशाच्या वेगाचा वर्ग ह्यांचा गुणाकार केला तर तेवढी चेतना अर्थात ऊर्जा त्या वस्तूमध्ये आहे. म्हणजे एखाद्या अत्यंत छोट्या वस्तूमध्येदेखील अतिप्रचंड ऊर्जा/चेतना असते. ह्या ऊर्जेच्या स्फोटातून किती महाभयानक संहार होऊ शकतो हे जगणे हिरोशिमा नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बच्या स्फोटातून पहिलेच आहे.

ह्यावरून असे लक्षात येते कि संपूर्ण विश्वातील सजीव-निर्जीव वस्तू, प्राणिमात्र ह्यांच्यातील हि चेतना, हि ऊर्जा जर एकत्र केली तर ती मानवी मनाच्या कल्पनेपलीकडील अति-अति-अति-प्रचंड अशी चेतना असेल, आणि तीच मला आकलन झालेली ईश्वरीय चेतना होय, तोच ईश्वर होय! सोपे करून सांगायचे झाले तर एकोऽहम् बहुस्याम् ह्यातून संपूर्ण विश्व निर्माण झाले कि जे त्या एकाचे / singularity चेच प्रतिरूप आहे, आणि तीच अतिप्रचंड चैतन्य प्रत्येक प्राणिमात्र आणि वस्तूमध्ये अंश रूपात प्रकट झाली आहे. संपूर्ण सृष्टी हि त्या ईश्वराचेच रूप आहे, त्याचाच खेळ आहे, त्याचीच माया आहे. हि दृश्य, इंद्रिय गोचर सृष्टी हि माया आहे कारण जे इंद्रियांना जाणावते आहे ते संपूर्ण सत्य नाही, तर तो केवळ एक दिखावा किंवा देखावा आहे, पण तरीही जळी स्थळी काष्ठी पाषाणी ईश्वरच आहे.

वैदिक विचारांमध्ये ईश्वर हा कुठल्याही इंद्रियांना न जाणवणारा आहे - रंग-रूप, वास, स्पर्श, नाद, चव ह्या सर्वांपलीकडे आहे, त्यामुळेच त्याचे वर्णन  नेsति  नेsति  असेच करणे क्रमप्राप्त आहे. जे तत्व हे संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीचे मूळ आहे, त्याचे वर्णन सृष्टीतील काही वस्तू-पदार्थ सांगून कसे करणार!. ऊर्जा अथवा चैतन्य हे देखील जोवर कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रकट होत नाही तोवर ते देखील इंद्रियगम्य नाही.

ह्या चैतन्याचा अंश जसा संपूर्ण सृष्टीमध्ये प्रतिबिंबित झाला आहे, तसाच तो काही विशिष्ट जीवांमध्ये अधिक प्रकर्षाने, अधिक प्रखरतेने, अधिक प्रभावीपणे आविष्कृत होतो. जसे एखाद्या electrical device ला अधिक मोठा current चालतो कारण त्याची तशी capacity असते, तद्वतच हे ईश्वरीय चैतन्य जेव्हा पूर्ण स्वरूपात एखाद्या मनुष्यामध्ये आविष्कृत होते तेव्हा त्याला ईश्वराचा अवतार किंवा पूर्णांश असे म्हणणे अगदी स्वाभाविक आणि तार्किक देखील आहे.

चैतन्य चराचरांमध्ये असल्याने, अचर गोष्टींमध्ये सुद्धा ती सुप्तावस्थेत संचारीत होत असते. परंतु जेव्हा चर आणि अचर हे दोन्ही एकाच चैतन्यस्वरूप तत्वातून निर्माण झालेले आहेत, तेव्हा अचर वस्तूतील सुप्त चेतनेला ऊर्जांवस्था देणे जसे nuclear reaction देताना शक्य आहे, तसेच ज्यांना ह्या विश्वाच्या एकात्मितेची जाणीव स्पष्ट झाली आहे, आणि त्यामुळे त्यांच्यासाठी चर - अचर हा भेदच केवळ आभासी आहे, त्यांना ती अचर वस्तूला चेतना देऊन ती चर करणे अशक्य नाही. जेव्हा वस्तुमान आणि ऊर्जा ह्या नाण्याच्या केवळ दोन बाजू आहेत, नव्हे नव्हे त्या एकच आहेत, फक्त त्या एकमेकात रूपांतरित होऊ शकतात, मग एखाद्या ज्ञानदेवाला भिंत चालवणे किंवा एखाद्या रेड्याच्या तोंडी वेद वदवणे हे का शक्य नसावे! मुळात ज्याचे मूळ एकच आहे त्याच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये भेद मानणे हेच (आपल्या आणि पर्यायाने सृष्टीच्या, सृष्टीतील सर्व घटकांच्या सत्य स्वरूपाचे) अज्ञान आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण सारेच एकाच सघन चिरंतन, सनातन चेतनेची आविष्कृत झालेली रुपेच केवळ आहोत, आणि ज्यातून आपण निर्माण झालो आहोत त्याच परमचैतन्यताच आपल्याला पुन्हा विलीन व्हायचे आहे (कारण जिथून ती चेतना आली तिथेच ती परत जाणे अगदी स्वाभाविक आहे), तर मग त्या परमचैतन्यमध्ये (अर्थात ईश्वरमध्ये) आणि आपल्यामध्ये भेद असणे, द्वैत असणे हि केवळ माया आहे, आणि ते आपले अज्ञान आहे. द्वैत हे केवळ दृश्य किंवा इंद्रिय-नैमित्तिक आहे, पण इंद्रियांच्या अतीत जेव्हा आपल्या चित्ताचा विकास होईल तेव्हा हे अशाश्वत मायारूपी पडदा दूर सरून मूळ ईशतत्व किंवा परमचैतन्य आणि आपल्यातील चैतन्य किंवा वस्तुमानरूपी चैतन्य ह्यात अद्वैत आहे ह्याची जाणीव होईल. सगुण आणि निर्गुण हा वादही इथेच मिटतो, कारण सगुण चैतन्यासाठी सगुण ईश्वराची आवश्यकता तोवरच आहे जोवर सगुणातील निर्गुणाची जाणीव स्थिर होत नाही. जेव्हा हि जाणीव स्थिर होईल, ज्ञान प्रकट होईल, तेव्हा सगुणाची आवश्यकता जरी नसली तरी सगुण हे निर्गुणाचेच स्वरूप आहे हे उमजल्याने सगुणा  विषयी काही आक्षेप उरत नाही.

मला आजपर्यंत झालेल्या आकलनानुसार वैदिक शास्त्रातील ईश्वराविषयीचा विचार हा पूर्णतः  E = mc²  ह्या formula मधून तंतोतंत explain होतो, आणि म्हणूनच मी त्याला ईश्वराचा formula असेच म्हणतो!

सारंग भणगे. 

Wednesday, May 20, 2026

लडाख - मे २०२६

समुद्रसपाटी पासून ११,००० ते १८,००० फूट उंचीवर, अनेकविध रंगांची रेती; माती; वाळू, दगड; धोंडे; खडक; डोंगर; पर्वत; आणि बर्फाच्छादित शिखरे; चिंचोळ्या नद्या; विस्तीर्ण वाळवंटी दऱ्या-खोरे, रंग बदलणाऱ्या निळ्या रंगांची विशाल सरोवरे, डोंगरांच्या कड्यांवर बांधलेली तिबेटी पद्धतीची घरे; निसर्गरम्य परिसरात डोंगरांवर बांधलेल्या बुद्धाच्या उंच उंच मुर्त्यांची बुद्ध विहारे, अत्यंत नम्र; सज्जन; मितभाषी; कामसू; चपट्या नाकाची आणि मिचमिच्या डोळ्यांची साधी सरळ माणसे, आणि त्यांनी निर्माण केलेली निर्मळ; निरलस; निसर्ग-प्रेरित संस्कृती.....अशा अनेक प्रकारे विविधगुणदर्शन घडवून आणणाऱ्या नितांत सुंदर लडाख बद्दल खरेतर भरपूर काही लिहिता येईल, लिहायचा प्रयत्नही करेन. परंतु इतक्या सगळ्या सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लडाखभर सतत दिसत राहतात ते भारतीय लष्कराचे सैनिकी तळ, लष्करी गणवेश धारण केलेले रुबाबदार सैनिक; हिरव्या रंगाच्या गाड्या; BRO (Border Road Organisation) ने तयार केलेले गुळगुळीत रस्ते; जागोजागी BRO च्या कार्याविषयी गौरवपूर्ण उल्लेख करणारी तडफदार वाक्ये . अनेक गोष्टींबरोबर उल्लेख करणे आवश्यक असलेली उल्लेखनीय अशी भारतीय लष्कराची स्मारके!

स्मारक - Hall of Fame, Leh

"When you go home, tell them of us and say, for your tomorrow, we gave our today."

फक्त credit card नेच प्रवेश फी स्वीकारण्याची लष्करी पद्धत आधीच असलेला विश्वास आणि आदर दृढ करते. प्रवेश घेतल्याबरोबर असलेल्या छोट्याशा दालनात एक लष्करी अधिकारी तुमचे स्वागत करतो तेव्हा सर्वप्रथम लक्ष जाते ते वर उद्धृत केलेल्या संदेशावर, आणि टचकन डोळ्यात पाणी उभे राहते. 'कुछ याद उन्हे भी कर लो, जो लौट के फिर ना आये' ह्या कवी प्रदीप ह्यांच्या अजरामर ओळींची आठवण करून देणारे ते वाक्य, आपल्या सैनिकांच्या सर्वोच्च निरपेक्ष त्यागाची आठवण करून देते. त्यानंतर अनेकदा आणि वारंवार डोळ्यात पाणी येत राहते; गालांवरून वाहत राहते. सैन्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्याहून अधिक आपण काही केले पाहिजे, पण एवढी संवेदनशीलता तरी आपल्यामध्ये असलीच पाहिजे!

तेथील लष्करी अधिकारी लडाखमध्ये लढल्या गेलेल्या एकूण युद्धांची (१९६२ - चीन, १९६५ - पाकिस्तान, १९७१ - पाकिस्तान, १९९९ - पाकिस्तान, २०२० (गलवान) - चीन) संक्षिप्त ओळख करून देऊन मग १९९९ च्या कारगिल युद्ध्याची तपशीलवार माहिती देतात. जेव्हा ते terrain model वर युद्ध कसे आणि कुठे घडले हे सांगतात तेव्हा अनेक चित्रपट, बातम्या, documentaries मध्ये पाहिलेल्या युद्धाची अधिक स्पष्ट कल्पना येते. शेरशहा Captain विक्रम बात्राचा निडर स्वभाव, Captain मनोजकुमार पांडेंचा विलक्षण पराक्रम, १५ गोळ्या खाऊनही जिवंत राहिलेले सुभेदार योगेंद्र सिंह यादव, ह्यांच्याबरोबरच सर्वात पहिल्या शोध मोहीम पथकातील हालहाल करून मारल्या गेलेल्या सर्वच्या सर्व सैनिकांचा परमोच्च त्याग, त्यांनी भोगलेल्या यातना ऐकून जीव कासावीस होतो.

कारगिल युद्ध्याबरोबरच एकूण भारतीय लष्करातील परमवीर चक्र, महावीर चक्र आणि इतर शौर्य पुरस्कारांची आणि त्यांनी सन्मानित केलेल्या वीर योद्धयांची माहिती दिली जाते. प्रत्येक वेळी जाणवत राहते कि आपले आजचे अस्तित्व हे ह्या शूर योद्धयांच्या अतुलनीय पराक्रम आणि त्यागामुळेच आहे.

संग्रहालयात पाहण्यासारखे, वाचण्यासारखे इतर पुष्कळ आहेच. त्याचा प्रत्यक्ष अनुभव नक्कीच घ्यावा! "Only the best of friends and the worst of enemies visit us."



स्मारक - स्योक युद्ध स्मारक, नुब्रा खोरे, लडाख

सियाचीन हिमखंडाविषयी आपण सर्वांनी ऐकलेच असेल. १९८५ साली ह्या अत्यंत मोक्याच्या हिमखंडाला (glacier) भारताने ताब्यात घेतले. वस्तुतः एवढ्या उंचीवर (समुद्रसपाटीपासून २१,००० फूट) आणि मानवी वास्तव्यासाठी अत्यंत प्रतिकूल, किंबहुना मानवी वास्तव्य अशक्यच होईल अशा ह्या हिमखंडावर सैनिकी तळ असण्याची आवश्यकता नाही असे अलिखित सामंजस्य भारत-पाकिस्तान मध्ये होते. परंतु चीन आणि पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी ह्या अशा ठिकाणी भारतीय लष्कराला गेली ४१ वर्षे वास्तव्य करावे लागत आहे. खरेतर, भारताने त्वरित हालचाली करून तिथे लष्करी तळ उभा केला नसता तर १९८५ ला पाकिस्तानने हे मोक्याचे ठाणे काबीज केले असते.

सियाचिनला केवळ बर्फ असतो, सर्वत्र पांढऱ्या बर्फाचे साम्राज्य! तापमान उणे ४० ते ६० अंश इतके अतिप्रचंड थंड असते. २१,००० फूट उंचीवर प्राणवायू अत्यंत विरळ असतो. ह्या आणि अशा अनेक निरतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय सैनिक तिथे तळ ठोकून आहेत.

तिथे आपल्या सैनिकांना महिन्यांहून अधिक काळ वास्तव्यास पाठवले जात नाही. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय हि नुब्रा खोऱ्यातील सियाचीन base camp मधूनच होते. ह्यासाठी फार मोठा खर्च भारतीय लष्कर खर्च करते. पण महिने, अशा अतिप्रचंड थंड वातावरणात राहून, लष्करी क्रिया पार पडून, सतत पांढऱ्या शुभ्र बर्फाचेच केवळ दर्शन घेऊन सैनिकांवर विविध मानसिक परिणाम सुद्धा होतात. अनेकदा तिथे हिमवर्षाव; हिमस्खलन (avalanches) होते, वातावरण सतत बदलत राहते. जरी तिथे चीन-पाकिस्तानबरोबर युद्ध होत नसले तरी क्रूर निसर्गाशी चाललेल्या निरंतर युद्धात अनेक भारतीय सैनिक दरवर्षी आपले प्राण गमावतात! ह्या खंडप्राय देशाचे संरक्षण करण्यासाठी सियाचीनच्या ह्या हिमखंडांच्या टोकांवर आपले सैन्य सर्वस्वाचा त्याग करत गेले ४१ वर्षे प्रत्येक दिवस एक प्रकारच्या युद्धाचा सामना करत तगून आहेत. नुब्रा खोऱ्यातील ह्या स्मारकात १९८५ पासून हुतात्मा झालेल्या ह्या शूरवीरांच्या नावाची यादी आहे. तसे म्हटले तर इतर काहीच नाही, परंतु विशाल डोंगरांनी वेढलेल्या आणि खोल दरीतून वाहणाऱ्या सिंधू नदीच्या जवळच उभ्या केलेल्या ह्या स्मारकापाशी जाऊन ह्या वीरांचे किंचित स्मरण करणे हे देखील सौभाग्यच आहे!



स्मारक - रेझिंग ला युद्ध स्मारक, अहिर धाम

मेजर शैतान सिंग ह्यांचे नाव जर ऐकले नसेल तर आपल्या एक मुस्काटात मारून घ्यावी. खरेतर मेजर शैतान सिंग, Captain विक्रम बात्रा, Captain मनोज कुमार पांडे ह्या सारख्यांना आपण दैवत म्हणूनच मानले पाहिजे, त्यांचे पूजन केले पाहिजे, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे; आणि त्यांच्या ह्या स्मारकांना तीर्थस्थळाचा दर्जा दिला पाहिजे. "शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा" राम प्रसाद बिस्मिल ह्यांच्या ह्या ओळी प्रत्यक्षात यायला हव्यात!

१९६२ च्या चीन युद्धात १८,००० फूट उंचीवरील रेझिंग ला खिंडीमध्ये मेजर शैतान सिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली चिनी सैन्याबरोबर लढत असताना, ११४ भारतीय सैनिकांनी प्राणांची आहुती दिली, परंतु बदल्यात १३०० चिनी सैनिकांना कंठस्नान घातले, ते देखील तुटपुंजा दारुगोळा, साहित्य, कपडे, अन्न-पाणी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये! एखाद्या कल्पित युद्धकथेमध्ये शोभावा असा विलक्षण, अमानवी पराक्रम गाजवणाऱ्या ह्या ११४ हुतात्म्यांचे स्मारक चुशुल येथे काहीच वर्षांपूर्वी बांधले गेले आहे. मे महिन्याच्या उन्हाळी मौसमात, दुपारी साधारणपणे १२ वाजता sweaters अंगावर चढवलेले असतानादेखील प्रचंड वाऱ्याने झोक तर जात होतेच, परंतु थंडीने हुडहुडी भरत होती. तर मग १७-१८ नोव्हेंबरच्या कडाक्याच्या थंडीत ह्या ११३ वीरांनी कसे युद्ध लढले असेल ह्याची कल्पना देखील करवत नाही. ,००० चिनी सैनिकांशी १२० सैनिक दिवस अन्नपाण्याविना लढले. झुंज अशी दिली कि महिन्यांनी जेव्हा भारतीय लष्कराधिकारी रेझिंग ला ला पोहोचले तेव्हा ह्या सैनिकांची बोटे अजूनही बंदुकांवर होती. "दस दस को एक ने मारा" ह्याचा प्रत्यय देणारी अहिर जातीची १३ कुमाऊँ रेजिमेंटच्या ह्या सैनिकांच्या विरागाथेचे वर्णन कवी प्रदीपांनी अक्षरश: करून ठेवले आहे -

"जब तक थी सांस लड़े वो

फिर अपनी लाश बिछा दी

संगीन पे धर कर माथा

सो गये अमर बलिदानी

जो शहीद हुए हैं उनकी

ज़रा याद करो क़ुर्बानी"

"थी खून से लथ पथ काया

फिर बंदूक उठाके

दस दस को एक ने मारा

फिर गिर गये होश गंवा के"

स्मारकात ह्या वीर-गाथेची इत्थंभूत माहिती ऐकताना, अमिताभ बच्चन ह्यांच्या आवाजातील documentary पाहताना मनाची प्रचंड कालवाकालव होत राहते, डोळ्यातून अश्रूंचा पारा सतत फुटत राहतो, ऊर अभिमानाने भरून येतो, गळा आणि डोळे ओले होत राहतात. इतका प्रचंड पराक्रम गाजवणारे हे सैनिक अनामिकच राहतात, त्यांच्या त्यागाविषयी आपण अनभिज्ञच राहतो, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यापेक्षा आपण फिल्मी हिरोंकडून प्रेरणा घेतो, आपले ऐषोआरामातले जीवन जगताना क्वचितच त्यांची आठवण आपण काढतो . अनेक संमिश्र भावनांनी आपण भावविवश किंवा भावविव्हल देखील होतो.

ह्या तीन स्मारकरांनी लडाखची माझी हि ट्रिप खऱ्या अर्थाने सुफळ संपूर्ण झाली. प्रवासाच्या आनंदाला एक अर्थपूर्णता लाभली. सिंधू नदी पाहून, तिला स्पर्श करून आपण ह्या नदीतून उगम झालेल्या, फुललेल्या संस्कृतीचे पाईक आहोत, अविभाज्य भाग आहोत हि भावना गदगदत राहिली, पण ह्या लष्करी स्मारकांमधून लडाखभर पसरलेला, पण डोळ्यांनी दिसणारा आपल्या सैनिकांच्या रक्ताचा लाल रंग आणि त्यांच्या त्यागाचा अदृश्य असा भगवा-केसरी रंग मन भरून राहिला आहे! आणि पुन्हा पुन्हा ते शब्द प्रतिध्वनीत होत राहत आहेत -

" मेरे वतन के लोगों

ज़रा आंख में भर लो पानी

जो शहीद हुए हैं उनकी

ज़रा याद करो क़ुर्बानी"






स्मारक - छत्रपती शिवाजी महाराज पॅंगॉन्ग लेक

पॅंगॉन्ग लेकला आपण पोहोचत असतानाच आपल्याला सर्वात प्रथम Maratha Light Infantry च्या आवारातील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पूर्ण पुतळ्याचे दर्शन होते आणि ऊर अभिमानाने भरून येतो. "सप्तसिंधू यवनांच्या हातून मुक्त करा" ह्या महाराजांच्या स्वप्न वजा आदेशाची पूर्ती आज झालेली असली तरीही लडाखच्या दोन बाजूंना आपले दोन कट्टर शत्रू आजही भारतीय प्रदेश गिळंकृत करून बसलेले आहेत. अशा परिस्थितीत महाराजांचा विजयी मुद्रेतील हा पुतळा अत्यंत प्रेरणादायी स्मारकचं आहे! ह्या उल्लेखाशिवाय प्रस्तुत लेखाचे प्रयोजन पूर्णही झाले नसते अशी माझी भावना आहे!



- सारंग भणगे (२० मे २०२६

Related Posts Plugin for WordPress, Blogger...