Showing posts with label वृत्तांत. Show all posts
Showing posts with label वृत्तांत. Show all posts

Monday, March 19, 2018

करम जागृती प्रस्तुत 'बाल शोषण' ह्या विषयावरील कवी संमेलन

(हा वृत्तांत नाही, उत्स्फूर्त मनोगत आहे. पूर्ण वाचावे अशी कळकळीची विनंती)


गेल्या वर्षभरात निर्माण केलेली अत्यंत वेगळी परंपरा पुढे चालू ठेवत करम अर्थात कविता रसिक मंडळाने रविवारी 'बाल शोषण' ह्या विषयावर कविसंमेलन आयोजित केले होते. ह्यापूर्वी अगदी 'लग्न केले नसते तर' पासून 'वीरांगना' ते 'वारांगना' अशा विविध सामाजिक विषयांवर संमेलने घडवून आणल्यानंतर आता ह्या वर्षात 'जागृती' ह्या सदराखाली सुरु केलेल्या संमेलनात 'बाल शोषण' सारखा अत्यंत संवेदनशील विषय हाताळण्याची हिंमत करमने दाखवली. 

जर कवी म्हणजे संवेदनशील मन असे असेल तर समाजात घडत असलेल्या दाहक वास्तवापासून कवी आणि त्याच ते so-called संवेदनशील मन दूर राहू शकत नाही ह्या, तसेच कवितेच्या माध्यमातून ह्या ज्वलंत प्रश्नांना पुन्हा एकदा हवा देणे अशा स्वच्छ भूमिकेतून स्वखर्चाने आणि स्वकष्टाने हि संमेलने आयोजित केली जात आहेत. एरव्ही बहुतेक प्रत्येक आठवड्यालाच कुठे ना कुठे तरी कलासक्त मंडळींची काव्यसंमेलने होत आहेतच, परंतु एवढे समाजाभिमुख राहून केवळ 'आमचे कवितेवर प्रेम आहे', असा डंका न पिटता, कवितेतून समाजातील प्रश्नांचे वास्तव समाजापुढे मांडू, स्वत:च्या आतील कवितेच्या विस्तूला, केवळ काव्यात्मक नव्हे तर वास्तववादी व्यथा - वेदनांची ठिणगी पडून चेतवू, असा पवित्रा घेणारे आणि तो यशस्वी करण्यासाठी आटापिटा करणारे काव्यगट माझ्यातरी पाहण्यात नाहीत.

करमच्या कुठल्याही कार्यक्रमाचे स्वरूप हे केवळ कवितावाचन नसून, किंवा केवळ विषयाच्या अनुषंगाने कुणा पर्यंकपंडितांना पाचारण करून केवळ पुस्तकी चर्चा घडवून आणणे असेही नसून, त्या त्या प्रश्नाने पोळलेल्या; त्या चटका लावणाऱ्या विषयाच्या मातीत; नव्हे नव्हे चिखलात लोळलेल्या आणि त्या त्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम केल्याने अस्सल जिवंत अनुभव असलेल्या अ-साहित्यिक मंडळींना बोलावून त्या प्रश्नाविषयी / विषयाविषयीचे अनुभव, चिंतन, चर्चा हे आधी घडवून मग कवींना कवितेतून त्या प्रश्नाच्या अनेक नकसकंगोऱ्यांवर आपल्या शब्दांचे लेणे चढवण्याची संधी दिली जाते. म्हणजे आवर्जून नमूद करायची गोष्ट अशी कि इथे केवळ कविसंमेलन आणि केवळ साहित्यिक चर्चा नाही घडत, तर घडतो माणुसकीचा सजीव सोहळा! अगदी सामाजिक कार्यकर्त्यांपासून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांना करमच्या साहित्यिक मंचावर स्थान दिले गेले आहे, प्रसंगी प्रचंड टीका सहन करून! लिहावे तेवढे त्याचे महत्व कमी होते, आणि लेखकाचे वाढते, म्हणून आवरते घेणेच योग्य!

'बाल शोषण' ह्या सारखा अत्यंत गंभीर विषय, ज्यावर नुसत्या गप्पांमध्ये देखील बोलणे; ऐकणे हे हेलावून टाकणारे असते; 'देवाघरची फुले' म्हणून धरतीवर आलेल्या निष्पाप जीवांवर; त्यांच्या अबल असण्याचा गैरफायदा घेत किती अनंत प्रकारे त्यांचे शोषण चालते, हे किती विदारक आहे; हादरवून टाकणारे आहे ह्याचा अनुभव संमेलनात आला. सामान्य कवी आणि श्रोत्यांबरोबर करमचा सहगट 'सुवानिती' हा ज्या विविध गरजू शाळा - आश्रमांबरोबर काम करतो तेथील ८-१५ वयोगटातील मुले मुली देखील ह्या संमेलनात सामील झाली होती. अर्थातच, ह्या विषयातील मानसोपचार तज्ञ आणि कवयित्री नूतन शेटे, तसेच पोद्दार शाळेच्या प्राचार्या अनघा घोलपजी ह्या सहभागी होत्या.

नूतनजींनी चटका लावणारे बाल शोषणाचे काही प्रसंग श्रोत्यांना सांगितलेच, परंतु तिथे उपस्थित असलेल्या मुलांना आणि पालकांनाही असा स्पष्ट संदेश ठासून दिला कि 'आपले शरीर हि केवळ आणि केवळ आपली मालकी आहे', 'त्याच्या रक्षणासाठी जर कुणी अतिप्रसंग करत असेल तर जीवाच्या आकांताने ओरडले पाहिजे; प्रतिकार केला पाहिजे', 'गप्प बसता कामा नये; प्रतिकार हा आपला अधिकार आणि जबाबदारी देखील आहे' ई., तर अनघाजींनी शाळांमध्ये मुलांना कशा प्रकारे सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यासाठी तंत्रज्ञानापासून ते प्रशिक्षणापर्यंत सर्व मार्ग कसे वापरले जातात, ज्या शाळांकडे आर्थिक पाठबळ मुबलक नाही त्या शाळादेखील कशाप्रकारे मुलांच्या सुरक्षेसाठी दक्ष राहू शकतात ई. पैलूंवर प्रकाश टाकला. त्यानंतर प्राध्यापक सोनाग्रासरांनी थोडक्यात जे त्यांचे विचार मांडले त्यात 'अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्याची वेळ ज्या समाजात येते त्या समाजाकडून कुठलीही आशा ठेवता येणार नाही' असा चाबूक ओढला तेव्हा अक्षरश: अंगावर काटा आला.

ह्या सन्माननीय व्यक्तींबरोबर आश्रमशाळेतून आलेली एक मुलगी, तिनेही आपले मनोगत व्यक्त केले. पुढे जाऊन अशाच प्रश्नांसाठी जीवन वेचायचे आहे असा वेडा ध्यास व्यक्त करणारी ती मुलगी कदाचित सर्व कवींच्या गालावर एक चपराक ओढून गेली असावी.

ह्या विचार मंथनात मनात काय काय विचार वाहत गेले, एका विषयाला किती बाजू आहेत, किती पैलू आहेत, कंगोरे आहेत, ह्याचे जे दर्शन झाले ते गोंधळात टाकणारे होतेच, परंतु विचार करायला लावणारे होते. कवींमध्ये 'जागृती' आणतानाच समाजाला सजग करणारे होते. घरातील सर्व प्रकारच्या नातेवाईकांकडून होणारे छोट्या छोट्या मुलांचे लैंगिक शोषण हादरवणारे आहेच, परंतु खरोखर कुठलेच नाते विश्वासार्ह राहिले नाही हि दारूण खंत मनात दाटवणारे होते. हे मुळांना सांगून आपण त्यांना जागरूक आणि सावध करतो आहोत कि त्यांच्यात एक कायमस्वरूपी भयगंड निर्माण करतो आहोत अशी दुविधा मनात निर्माण करणारे होते. मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेत जागोजागी CCTV Surveillance आणि पहारा देणारे शिक्षक हवेत कि विश्वास निर्माण करणारे; प्रेमादर निर्माण करणारे शिक्षक आणि वातावरण हवे..........असे कितीतरी प्रश्न उभे राहिले, ज्यावर विचार करत राहिला पाहिजे! आणि तो ही एक उद्देश ह्या कार्यक्रमातून आहेच अर्थात.

हे लिहून मी कार्यक्रमाचा वृत्तांत लिहिण्याचा किंवा आढावा घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर ह्या संमेलनातून नक्की काय घडत ह्याची झलकमात्र दाखवण्याचा यथाशक्ती प्रयत्न तेवढा करतो आहे.

त्यानंतर कवी संमेलन तर झालेच आणि त्यात एकाहून एक कविता सादर झाल्याच, पण त्या कविता अगदी लहान मुलांना ऐकायला भाग पाडून त्यांचे तिथेच काव्य-शोषण केले गेले नाही (:) ) तर त्या मुलांना नूतनजी आणि आरती देवगावकर ह्यांनी एका वेगळ्या खोलीत छान गप्पा=गोष्टीमार्फत अधिक उपयुक्त अशी माहिती दिली, संवाद साधला; त्यांना बोलते केले! मुलांचे ते चिमुकले विश्व उलगडताना धन्यता वाटली, परंतु अशाच कुणा निष्पाप मुलांचे जेव्हा शोषण होत असेल तेव्हा त्यांची काय अवस्था होत असेल ह्या विचाराने मनात अपार खिन्नाताही दाटली!

कवितांविषयी अधिक लिहित नाही, तो माझ्या ह्या उत्स्फूर्त लेखनाचा विषयही नाही. पण त्या कविता देखील खूप काही बोलून गेल्या हे सांगणे न लगे!

ह्या अशा कार्यक्रमांना उचलून धरणे, ह्या एका किमान जबाबदारीची जाणीव माझ्या ह्या तोडक्या-मोडक्या शब्दातून काही जणांना तरी होईल एवढी अशा; इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करून थांबतो!

कुणाचेही वैयक्तिक आभार मी इथे व्यक्त करत नाही, परंतु ह्या कार्यक्रमांना यश यावे; त्यांचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे ह्यासाठी त्यांच्या हातांना बळ द्या असे आवाहन जरूर व्यक्त करेन!

--
सारंग भणगे (१९ मार्च २०१८)

Wednesday, February 28, 2018

मकस अजिंक्यतारा मेळावा


२००९ सालापासून मकसचे झालेले पुष्कळ मेळावे म्हणजे आम्हा संचालकांसाठी एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो, आणि म्हणूनच मेळाव्याची तारीख जवळ येत जाते तशी उत्सुकता वाढत जाते, तसाच उत्साहही! दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी किमान २-३ मेळावे तर सहजच होऊन जात असत. परंतु, ह्यावेळी जवळपास दोन-अडीच वर्षांच्या खंडानंतर मेळावा आयोजित होत होता.

२५ फेब्रुवारी २०१८, रविवारचा दिवस; ठिकाण कास पठार, सातारा! प्रथमच एवढ्या खंडानंतर होणारा मेळावा; तो ही साताऱ्यासारख्या शहरात जिथे अजून मकसचा एकही कार्यक्रम झालेला नाही, आणि त्याहून म्हणजे तो प्रत्यक्ष शहरात नाही तर कुठे तरी डोंगर-झाडांनी वेढलेल्या परिसरात, आणि आयोजन पाहणारा संचालक देखील नवीन, अननुभवी. सगळंच नवीन आणि वेगळ. अर्थातच मनात एक धागधुग होती कि मेळाव्याला किती कवी हजार राहतील, कार्यक्रम कसा होईल, काही अडचणी येतील का ई. ई.

पण २५ फेब्रुवारीच्या पूर्वसंध्येलाच सुमारे २० लोकांनी मेळाव्याच्या ठिकाणी हजेरी लावली, आणि ह्या सर्व शंका दूर झाल्या. तरीही मेळाव्याच्या मुख्य दिवशी फारतर ५-७ मंडळी अजून येतील अशी अपेक्षा असताना, जेव्हा एकूण संख्या ३७ एवढी उत्साहवर्धक झाली तेव्हा झालेला मनस्वी आनंद एक आयोजकच समजू शकेल. विषयाच्या अनुषंगाने म्हणून इथेच नमूद करू इच्छितो कि जरी आयोजकांनी कितीही सद्भावनेने आणि प्रेमाने एखादा कार्यक्रम आयोजित केला असला तरीही कवींचा सहभाग हा तो कार्यक्रम यशस्वी होण्यातील सर्वात महत्वाचा भाग असतो, हे मान्य केलेच पाहिजे. त्या अर्थाने मकस संचालक मंडळ सहभागी कवींचे खरोखर आभारी आहे!

२४ फेब्रुवारीची पूर्वसंध्या अत्यंत रम्य गेली हे सांगणेच नको! पुष्कळ कालावधीनंतर झालेली परिचित-अपरीचीतांची सहृदय भेट; गप्पांना आलेला उत; अपरिचित देखील काही क्षणातच आपलेसे वाटू लागण्याचा आलेला आनंददायी अनुभव; निवासाचे अत्यंत रम्य असे ठिकाण; जिभेवर कायम चव रेंगाळत रहावी असे चविष्ट जेवण; आनंदने (पेंढारकर) इतक्या लांबून आणलेल्या म्युझिक सिस्टमने वर गायलेल्या सुरेल गीतांनी सुरू झालेली रात्र मैफल; रात्रीबरोबरच चढत गेलेली कवितांची धुंदी; साडेतीन वाजता झोपूनही पहाटे ७ ला उठताना जाणवलेला आल्हाद; सकाळच्या गप्पा, फोटो सेशन आणि मग आवरत आवरत मेळाव्याच्या स्थानाकडे केलेले कूच हे सगळे लिहिण्यासाठी एक स्वतंत्र वृत्तांत लिहिला पाहिजे, पण मुख्य वृत्तांत मेळाव्याचा, म्हणून हा खूप काळ स्मरणात राहील अशा रात्रीचा संक्षिप्त आढावा!

साताऱ्याकडून कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर डॉ. संदीप श्रोत्री ह्यांचे फार्म हाउस आपल्या मेळाव्याचे सुनिश्चित केलेले ठिकाण होते. कास पठार ही आता World Natural Heritage site असल्याने खूपच नावाजली आहे. जरी आत्ता कारवीच्या फुलांचा मौसम नसला तरीही एकूणच संपूर्ण कास पठार परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. एका छोट्या दरीच्या काठी बांधलेली नीटस अशी ती बंगली हे एखाद्या कवी संमेलनासाठी सुयोग्य असेच ठिकाण आहे. आजूबाजूला झाडे-झुडपे; जवळच दरी; चहुबाजूला डोंगर-टेकड्यांनी वेढलेले, असे कुठल्याही कलावंताच्या कलेला स्फूर्ती किंवा चालना देणारे असे सुरेख चित्रमय वातावरण, आणि त्यामध्ये उभी असलेली ती प्रसन्न वास्तु. अंगण ओलांडून गेले कि असलेल्या पोर्चमध्ये बसायची व्यवस्था, समोर २-३ पायऱ्या चढून गेले कि जुन्या पद्धतीचा दरवाजा, त्यातून आत गेल्यावर एक गोलाकार दिवाणखाना; त्याचे उंच सिलिंग आणि सिलिंगच्या मधोमध प्रकाश येण्यासाठी ठेवलेला मोठ्ठा गोल झरोका; दिवाणखाण्याच्या दरीकडील बाजूला दोन पायऱ्या खाली उतरून बसायची अर्धवर्तुळाकार जागा आणि तिथे असलेल्या ३ मोठाल्या खिडक्या, असा एकूण दिमाखदार डामडौल, आणि अशा त्या दिवाणखान्यात भरणारा आपला मेळावा!

नावनोंदणी बरोबर चहा-नाश्ता ह्यांचा आस्वाद घेतल्यानंतर बरोब्बर १०.३० वाजता मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला. विनायकने माईकचा ताबा घेऊन सर्वप्रथम दीपप्रज्वलन आणि गणेशपूजन समूहातील ज्येष्ठांच्या हस्ते झाले. त्यानंतर विनायकने मेळाव्याची रूपरेषा थोडक्यात सांगून पुढील सूत्रे राजेशकडे सुपूर्त केली.

पहिला कार्यक्रम हा मंचीय काव्यसदरीकरणाचा होता. राजेशने सूत्रसंचालन केलेल्या ह्या बहारदार कार्यक्रमात सहभागी झालेले कवी होते – तुषार जोशी, पूजा भडांगे, मिता लोणकर; मिनिष उमराणी; आणि प्रीतम गाडगीळ. प्रत्येकी दोन कविता एकापाठोपाठ सर्व सहभागी कवींनी सादर केल्या. तुषार संचालक असूनही इतके वर्षात प्रथमच मेळाव्यातील मंचीय कार्यक्रमात दिसला, तर प्रीतम; मिता ह्या प्रथमच कुठल्याही काव्यमंचावरून कविता सादर करत होत्या. सकाळच्या उत्साही वातावरणात कवितांचे तुषार अंगावर पडू लागले ते तुषारच्याच ‘ओठांवर तीळ कसला’ ह्या तरल प्रेमाकाव्यातून, कि जे त्याने त्याच्या खास तुष्की शैलीत गाऊन सादर केले. श्रोत्यांची मने त्यावर डोलू लागली, कि पाठोपाठ ‘काळोखाचे अस्तर लावून रात्र विणूया आपण’ किंवा ‘शिकून घेऊ सूर्यफुलांची अल्लड भाषा’ अशा प्रासादिक काव्यमय निसर्गवर्णनाने भरलेल्या पूजाच्या कवितेने सभागृह भारावून गेले. तिच्या जवळपास प्रत्येक ओळीला वाह मिळत गेली. त्यानंतर मिताच्या ‘सावळ्या मेघातळी मी पेरलेले बीज आहे’ किंवा ‘कोरड्या रेतीत अश्रू गाळणे हे ठीक नाही’ अशा ओळी रसिकांची दाद घेतानाच त्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेल्या. ‘सहजच फांदीवर बसले काही तसे शब्द सुचले’ किंवा ‘वाट हरवले कुणी तान्हुले, तसे शब्द कवितेस बिलगले’ अशा हळव्या ओळीतील ओल मनामनांना स्पर्शून गेल्या, तर प्रितमच्या ‘इरकली कंचुकी बघ दंडात रुतते बघ तुझ्याचसाठी’ सारख्या ओळी रसिकांना रिझवून गेल्या.

ह्याच कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागातही ‘तुझ्या स्मृतींचा सुगंध उत्कट प्रजाक्ताहून दाट (तुषार); ‘बाभळीचा जन्म तुझी बोचरी कहाणी, तरी कशी गाते बाई आनंदाची गाणी’ (पूजा); ‘ही मिठी कशी अलवार अंगात वीज झंकारते’ (मिता); ‘देहभर फुललेले वारूळ मन सैरभैर’ (मिनिष); प्रितमची ‘विद्रोह’ कविता, अशा सुगंधी, उत्कट, घनदाट, तरल, हळव्या, रोमांचक, शृंगारिक, गहिऱ्या कविता आणि काव्यपंक्तींनी रसिक न्हाऊन निघाले.

ह्या सर्व कवी मंडळींच्या कविता जितक्या बहारदार होत्या तितकेच उत्कृष्ट सहज आणि उत्स्फूर्त सूत्रसंचालन राजेशने केले. दोन कवितातील दुवा जोडत, त्या कवितातील रस हलकेच वेचत, कुठे हसवत; कुठे मनाला स्पर्श करत संपूर्ण कार्यक्रमाची सूत्र त्याने सक्षमपणे सांभाळली.

मेळाव्यातील एवढा एकच मंचीय कार्यक्रम सुफळ संपन्न झाल्यानंतर सर्व मान्यवर कवींनी आपापली एक काव्यरचना पुढे येऊन सादर करण्याचा मेळाव्याचा मुख्य भाग सुरू झाला. ह्या कार्यक्रमात सादर झालेली प्रत्येक कविता म्हणजे वेगवेगळ्या रंगांचा गडद असा पोत घेऊन आलेली होती, आणि प्रत्येक कवी एखाद्या ब्रशसारखा रसिकांच्या मनाच्या कॅनव्हासवर त्या त्या रंगाचा स्ट्रोक काढत गेला आणि शेवटी जे चित्र निर्माण झाले त्यात सर्व रंग; सर्व आकार उमटले होते. ‘अजून थोडे चालीन म्हणतो, आभाळाला गाठीन म्हणतो’ (मनोहर जाधव), ‘आकाशातील ताऱ्यालाही माझ्यासाठी निखळ म्हणालो’ (हेमंत राजाराम), ‘झालेत सरळ रस्ते माणूस नागमोडी’ (जयंत कुलकर्णी), ‘मजबूत हातांनी आणि छत्रीने बाबा आभाळ तोलून धरायचे....घरचे आणि बाहेरचेही’ (विलास अधिकारी), ‘अजूनही त्या फुलांना बरी किंमत येते’ (डी एस कुलकर्णी), ‘हसतानाही जगण्यावर मी जरा रडलो होतो’ (विशाल कुलकर्णी), ‘एक गोळी झाडावी जुन्या साऱ्या आपल्या कवितांवर’ (विनायक उजळंबे), ‘दु:ख हलके होत असते बोलण्याने’ (शिवाजी सावंत), ‘मनाला निळे पंख लावून गेले’ (रश्मी मार्डी)....अशा कितीतरी ओळींच्या लाटा मनाच्या किनाऱ्याला धडका देत ओलावत राहिल्या. ‘जगा’ (देवकुळे सर), ‘प्रेमाचा वर्षाव कधीच नव्हता’ (जान्हवी शिराळकर), ‘कवितेविरुद्ध फिर्याद’ (शैलजा किंकर), ‘खळी विरुद्ध पाकळी’ (उमेश वैद्य), ‘रुपगर्विता’ (आकाश बिरारी), मेघना राजे ह्यांची कविता, ‘मंथन केले आयुष्याचे’ (जयप्रकाश खळदकर), ‘संध्येच्या पारावरती’ (कामिनी केंभावी), ‘बेण हरवलं आहे’ (मयूर ढोबळे), ‘मेघ सरले’ (स्वप्ना अमृतकर), आनंद पेंढारकरांची हिंदी-मराठी मिश्र गझल, ‘मी राधा आहे’ (संतोष वाटपाडे), ‘राधेस लागली आज’ (विभावरी बिडवे), ‘मनाचे घनदाट जंगल’ (दीपा वाकडे), ‘सोनपरी’ (मानसी चिटणीस), ‘आली कशी कळेना गोत्यात जिंदगी’ (वसंत शिंदे), ‘लग्न झालेले बॅचलर’ (विनायक अनिखिंडी), ‘मन कावरे बावरे’ (अमर शिंदे), ‘आकाश निळे’ (राजेश गुरव), ‘कवी व्हावं वाटलंय का’ (सारंग भणगे) अशा कवितांच्या गलबतांनी मनाच्या बंदरात लंगर कधी टाकले ते कळलेच नाही. प्रत्येक कवितेत पुष्कळ काही सांगण्यासारखे होते कि जसे खाली वि पाकळीची अभिनव कल्पकता, रुपगर्विताची पार्श्वभूमी, संध्येच्या पारावरतीची गहनता, बेण हरवलं आहे मधील सोप्या भाषेतून आजच्या मुलांविषयी व्यक्त झालेली तळमळ, आनंद आणि अमरच्या गायलेल्या कवितांवर धरलेला ताल, वसंत शिंदेंचे जोरकस सादरीकरण, लग्न झालेले बॅचलर मधला नर्मविनोद ई.

पोटभर कविता ऐकून, पोटभर दाद देऊन मग पोट भरायची वेळ झाली आहे ह्याचे भान पोटातल्या कावळ्यांनी साद घातल्यावर सर्वांना झाले. जवळपास दोन वाजत आले होते आणि बाहेर जेवणाची तयारी झालेली होती. बगिच्यामध्ये एका उंचवट्यावर टेबल मांडून त्यावर सुग्रास जेवण सर्वांची वाट पहात होते. सातारी पाहुणचारात चमचमीत रस्सा आणि म्हाद्या हे दोन चविष्ट पदार्थ जेवणाच्या पंगतीची रंगत वाढवून गेले.

जेवणानंतर पुन्हा आपल्या सभागृहात घेऊन जाण्यासाठी संचालकांची जरा घाईच चाललेली. कारण त्यांच्यासाठी पुढच्या सत्रातला पहिला कार्यक्रम हा विशेष महत्वाचा होता. क्षुधाशांती झालेली मंडळी शांतपणे स्थानापन्न झाल्यावर विनायकने माईक सारंगच्या हातात सुपूर्त केला. पुढचा कार्यक्रम आधी जाहीर केलेल्या रुपरेषेप्रमाणे सन्मानसोहळ्याचा होता, पण कसला सन्मान; कुणाचा सन्मान; कशाबद्दल ई. माहिती अर्थातच गुलदस्त्यात होती.

सारंगने सर्वप्रथम मकस ही जरी इतर अनेक काव्यमंडळांप्रमाणे कार्यरत असली तरीही मकसचे काही वेगळेपण मांडले. मकस हा कवींमधील सौहार्द वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध असलेला समूह आहे, आणि पारंपारिक संमेलने, सत्कार, पारितोषिक ह्यांना छेद देत आजवर काम करत आलेला समूह आहे, असे सांगितले. त्यानंतर आज मकसच्या त्या परंपरेच्या विरुद्ध मकस एक आत्मियता किंवा कृतज्ञता भेट एका व्यक्तीला देणार आहे असे नमूद करून श्रेष्ठ कवी आणि गझलकार श्री. जयंत कुलकर्णी (अर्थात जयंतकाका) ह्यांचे नाव जाहीर करताच इतर श्रोत्यांबरोबरच त्यांच्या स्वत:च्या चेहऱ्यावर एक हर्षमिश्रित आश्चर्य उमटले.

त्यापाठोपाठ जयंतकाकांना मंचावर बोलावून सारंगने मकस आणि जयंतकाका ह्यांच्यातील ऋणानुबंध विशद केला आणि ह्या आत्मियता भेटीची भूमिका देखील स्पष्ट केली. त्यानंतर विभावरीच्या हस्ते जयंतकाकांना पुष्पगुच्छ, शिवाजींच्या हस्ते स्मृतीचिन्ह (ज्यावर जयंतकाका ह्यांची आवडती गझल आणि त्यांचं प्रसन्न चेहरा छापलेला आहे), राजेशच्या हस्ते पुणेरी पगडी आणि तुषारच्या हस्ते शाल प्रदान करून यथाचित सन्मान केला. तसेच जयंतकाकांविषयी काही आठवणी आनंद आणि हेमंतजी ह्यांनी सांगितल्या, आणि जयंतकाकांनी भारावल्या शब्दात त्यांचे मनोगत व्यक्त केले. सर्व प्रेक्षक देखील ह्या हृद्य सोहळ्याने भारावले असावेत निश्चित, हे त्यांनी केलेल्या टाळ्या आणि कौतुकोद्गारातून स्पष्ट जाणवले. पगडी घातलेली, शाल पांघरलेली, हातात स्मृतीचिन्ह धरलेली जयंतकाकांची (आनंदच्या शब्दात) ‘जिंदादिल’ मूर्ती कृतार्थ वाटत होती. ती मूर्ती खरोखर मनात ठसली आणि मनातून अनेकांच्या camera मध्येही जाऊन बसली!

जयंतकाकांप्रमाणेच श्रीधरकाकांचाही असाच आत्मियता भेट देण्याचा निर्णय सारंगने संचालक मंडळातर्फे जाहीर केला.

त्यानंतरचा कार्यक्रम पुन्हा एकदा काव्यमैफलीचा होता. पहिल्या सत्राप्रमाणेच सर्व कवींनी (संचालक सोडून) एकामागून एक कविता सादर केल्या. पुन्हा एकदा कवितांच्या फैरी झडल्या आणि त्यांचं आनंद सर्वांनी खूप मनापासून लुटला.

प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच. कवितांची अशी मेजवानी झोडल्यानंतर पोट जरी भरले नसले तरीही काळाचा वेग आपल्या हाती नसतो. घड्याळाचे काटे फिरत राहिले आणि मैफल शेवटास आली. आभार प्रदर्शनाचा औपचारिक भाग अनौपचारिक रित्या संपवून मेळावा संपुष्टात आला. निरोपाच्या गाठी भेटीत मंडळी गुंतली. निरोप घेतले ते पुन्हा भेटण्याच्या वायद्यानेच!

मकस अजिंक्यतारा मेळावा संपन्न झाला तो सर्वांच्या सहभागाने. राजेशचे उत्कृष्ट नियोजन आणि त्याला मिनिषने दिलेली साथ, आनंदने आणलेले म्युझिक सिस्टम, संतोष वाटपाडेसारखा गाजत असलेल्या कवीचा सहभाग, पूजा आणि रश्मी ह्या नव्या पिढीतील दमदार कवयित्रींच्या प्रगल्भ कविता, विशाल, मनोहर, देवकुळे सर, हेमंतजी, कामिनीजी ई. सर्वांचा उत्साही सहभाग, वसंतजी, मयूर, स्वप्ना  ह्यांच्या दमदार कविता, मिता, प्रितम, दीपा, अमर ह्यांची पदार्पणातीलच उत्तम काव्यपेशकश, विशालजी, जान्हवीजी ह्यांच्या मनस्वी कविता, विनायक अनिखिंडी, मानसीजी, शैलजाजी ह्यांच्या वेगळ्या शैलीच्या कविता ह्या साऱ्या गोष्टींचा उल्लेख पुन्हा एकदा करणे क्रमप्राप्त आहे.

इथे भेटलात..........पुन्हा पुन्हा भेटत रहा, असे म्हणून थांबतो!

ता.क. कुणाचे नाव चुकीचे लिहिले गेले असेल, कविता किंवा कवितेच्या ओळी चुकीच्या लिहिल्या गेल्या असतील, कुणाचा उल्लेख राहिला असेल तर ह्या अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल माफ करा

आपला,
सारंग भणगे

मकस संचालक

Monday, November 17, 2014

जबलपूर मराठी कवी संमेलन वृत्तांत


जबलपूरच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या हर्षे सभागृहामध्ये ‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’ ह्या संस्थेतर्फे ‘मराठी कविता समूहा’च्या संचालकांचा जबलपूर मधील मराठी रसिकांच्या समोर ‘मराठी कवितांचा’ कार्यक्रम १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मराठी कविता समूहाच्या इतिहासात प्रथमच केवळ संचालकांचा असा कार्यक्रम साकार झाला.
कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे सचिव श्री. अनिल राजूरकर ह्यांची होती. में महिन्यामध्ये इंदूर येथे मराठी कविता समूहाचा स्नेह मेळावा झाला होता. त्याची माहिती राजूरकर सरांपर्यंत पोहोचली आणि जबलपूर येथील ह्या कार्यक्रमाचे बीज त्यांच्या मनात रुजले.
जबलपूर सारख्या हिंदी भाषिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक मंडळी वर्षानुवर्षे वास्तव्य करून आहेत. जरी आता जबलपूर मध्ये मराठी भाषेमध्ये शिक्षण बंद झाले असले तरी ‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’ ह्या संस्थेच्या माध्यमातून काही मोजक्या मराठी मंडळींनी अजूनही मराठीचा दीप तेवत ठेवला आहे. संस्थेतर्फे विविध मराठी कार्यक्रमांचे आयोजन होत असते आणि त्यामध्येच हा संचालकांच्या कवितांच्या सादरीकरणाचा ‘मराठी कविता मेळावा’ आयोजित करण्यात आला.
संध्याकाळी सुमारे सव्वा सहाच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सौ. सुमेधा पोळ यांनी सर्वांचे स्वागत केले आणि पारंपारिक पद्धतीने दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन ह्याने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर कवींना मंचावर आमंत्रित करण्यात आले आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व कवी आपापल्या ठरलेल्या क्रमानुसार मंचावर स्थानापन्न झाले, आणि ध्वनिक्षेपक श्रीधर काकांच्या हातात देण्यात आला.
नोव्हेंबरच्या महिन्यातील सुरम्य संध्याकाळ, बाहेर सुटलेला मंद गारवा, समोर बसलेला रसिक प्रेक्षक आणि मराठी कविता समूहाच्या काव्यशिलेदारांच्या हातात आलेला ध्वनिक्षेपक, म्हणजे कवितांच्या कार्यक्रमाला संपूर्णत: पूरक असे हे वातावरण!
श्रीधर काकांनी त्यांच्या शांत, धीम्या शैलीत सुस्पष्ट शब्दोच्चारांनी, प्रसन्न मुद्रेने रसिकांबरोबरचा आपला संवाद सुरू केला. महाराष्ट्राच्या सीमेपार हिंदी भाषिक प्रदेशात मराठी कविता सादर करायला बोलावणाऱ्या रसिक जनांचे सर्वप्रथम आभार मानत, श्रीधर काकांनी कार्यक्रमाचे प्रयोजन; संकल्पना आणि स्वरूप विषद केले. कार्यक्रम दोन चक्रांमध्ये होणार होता. मंचावरील सात कवी (श्रीधर जहागीरदार, उमेश वैद्य, रमेश ठोंबरे, अलकनंदा साने, सारंग भणगे, तुषार जोशी आणि विनायक उजळंबे) प्रत्येक चक्रामध्ये आपल्या दोन कविता सादर करणार, मध्ये कवींची ओळख आणि कवितेविषयीचे अल्प निवेदन असे कार्यक्रमाचे नेटके आणि आटोपते स्वरूप होते.
कार्यक्रमाचा ‘श्रीगणेशा’ ‘सात्विक बंडखोरी’ कवितेत मुरलेल्या ‘विनायक’च्या कवितेने झाला. प्रेम कवितांचे पेटंट मिळू शकेल अशी त्याची ‘पत्रकविता’ त्याने सर्वप्रथम सादर केली आणि प्रेक्षागृह जिंकून घेतलं. खळी, मिठी, मोगरा, गजरा असे त्याचे खास शब्दमोती पेरून त्याने कवितेची पहिली माळ रसिकांच्या गळ्यात घातली आणि तो त्यांच्या गळ्यातला ताईतच झाला. ह्या कवितेच्या तरल अनुभवातून रसिक बाहेर येतायत न येतायत तोच त्यांच्या समोर विनायकने त्याचा खास ठेवणीतला कॉफीचा काव्य-कपच ठेवला. विनायकची कॉफीशॉप कविता म्हणजे हमखास टाळ्या, हशा, खुसखुस आणि कुजबुजहि.
विनायकाच्या कवितानंतर कवितेची गाडी सरकली एका हरहुन्नरी कवीच्या स्टेशनवर. स्टेशनाचे नाव तुषार जोशी, नागपूर. तुषारने त्याच्या प्रेमाचे रंग खुलवणाऱ्या दोन कविता सादर केल्या. ‘पाहिले तुला हळूच’ मधून प्रेयसीचा रुपमोगरा दरवळून आला तर पुढच्या कवितेत तुषारने कवितेची ‘वसंत’ पंचमी साजरी केली. त्याच्या ‘वसंत’ कवितेतून धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनातही आपल्या जीवनसंगिनी बरोबर प्रेमाचे हळुवार क्षण कसे घालवू शकतो, ह्या कृत्रिम जीवनात कविता कशी जगू शकतो ह्याचा प्रत्यय आणला.
प्रेमाचा रंग मैफिलीत गहिरा होत जात होता आणि पुढची प्रेमसूक्ते सादर करण्याची पाळी होती सारंगची. प्रेमाचा गुलाबी रंग आपल्या ‘आठवते का काही’ ह्या कवितेतून सारंगने तरन्नुममध्ये गाऊन पेश केला, तर जन्मभराचा आपला सांगाती सोडून गेल्यानंतर जीवनातल्या संध्याकाळी दाटणारी खिन्न छटा ‘झाली संध्याकाळ’ ह्या कवितेतून सादर केल्यानंतर रसिकांच्या पापण्यांवर टीचभर पाणी खचितच तरळले असेल.
प्रेमाच्या सुटलेल्या भरधाव गाडीला थोडा विराम देत, आपल्या प्रगल्भ लेखनशैलीतून अलकनंदा काकूंनी वैचारिक स्त्रीवादी कवितांची पेशकश केली. पहिल्या कवितेतून स्त्री मधल्या सहनशक्ती आणि आव्हाने पेलण्याच्या; झेलण्याच्या स्वयंभू स्वभावाधर्माचे दर्शन अलकनंदा काकूंनी घडवले. खेळणं मागणाऱ्या मुलीच्या हातावर वास्तवाचे ज्वलंत निखारे दिल्यानंतर ती मुलगी त्यांच्याशी सहजपणे खेळते हे स्त्रीजीवनाचे एक वास्तववादी जीवनदर्शन मनाला अंतर्मुख करून गेले. एकीकडे स्त्रीच्या ह्या शाश्वत जीवनसत्याविषयी बोलल्यानंतर काकूंनी आजच्या स्त्रीच्या, विशेषत: तरूण मुलींच्या आजच्या युगातील व्यवहारावर; आचरणावर सौम्य टिप्पणी करत निरागस मुलींमधील हरवलेल्या अल्लडपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारी त्यांची ‘मुली गेल्या कुठे’ हि कविता सादर केली.
काव्यसादरीकरणाची ‘शमा’ मग पुढे रमेशच्या समोर सरकली. रमेशने त्याच्या खास नर्म विनोदी शैलीत कवितेतील हास्य रंग खुलवला. तरूणवयात आवडलेली एखादी सुंदर मुलगी लग्नानंतरही भेटते आणि मग त्यातून कसले कसले ‘शिक्षण’ मिळते हे त्याच्या ‘शिक्षण’ कवितेतून शिकायला मिळाले. हळुवार कोपरखळ्या मारत अनेकांच्या मनातल्या जुन्या प्रेमाची आठवण रमेशने जागी केली, तर एकदम वेगळ्याच वळणावर जात ‘महात्म्याच्या कविता’ मधील ‘स्वप्नातला भारत’ हि उपहासाच्या अंगाने सरकारी कार्यालयातील कारभारावर टीका करत, गांधीजींना अपेक्षित स्वप्नातील भारत हा केवळ भ्रष्टाचार हा शिष्टाचार केल्यानंतरच येऊ शकतो कि काय असा प्रश्न निर्माण करून जाणारी कविता सादर केली.
आतापर्यंत वैविध्यपूर्ण काव्यवाचन झाल्यावर उमेशदांनी हार्मोनियमवर आपली बोटे सफाईदारपणे फिरवून संपूर्ण सभागृहाला एक सूरमयी सुखद धक्का दिला. हार्मोनियममधून निसटणाऱ्या सुरांमध्ये उमेशदांच्या गळ्यातील मुलायम सूर मिसळले आणि कवितांच्या सुगंधाने भारावून गेलेले सभागृह ह्या सुरावटीत बुडून गेले. पहिल्यांदा ‘जगणे उधाण वारा’ हि तरल; अलवार कविता त्यांच्या तशाच मुलायम स्वरात न्हाऊन रसिकांसमोर उमेशदांनी पेश केली, तर त्यापाठोपाठ एका वेगळ्याच बाजाचे ‘कारभारीन’ हे गीत त्यांनी गायले. कारभारीन मधल्या शेतकरी गड्याचे आपल्या कारभारनीविषयीचे कौतुकाचे ग्रामीण भाषेचा बाज घेऊन लिहिलेले शब्द आणि त्याला तशीच लावलेली उडती ग्रामीण ढंगाची चाल सर्वांना आवडून गेली, हे प्रेक्षकांनी अभावितपणे धरलेल्या तालावरून दिसून आले.
सभागृह असे स्वरमुग्ध झाल्यानंतर पहिल्या चक्रातील शेवटचे कवी श्रीधर काका ह्यांनी एक वेगळाच धागा पकडत त्यांच्या कवितेवरील (म्हणजे कविता हाच कवितेचा विषय असलेल्या) दोन कविता सादर केल्या. आपल्याच कवितेविषयी प्रामाणिकपणे भाष्य करणे आणि तरीही तिच्याविषयी एक सार्थ अभिमान व्यक्त करणारी अशी ‘माझी कविता’ हि कविता श्रीधरकाकांनी सादर केली. शब्दांवरील प्रभुत्व, विचारांवरील पकड आणि अवघड वाटणारा विषय सोपा करून सादर करण्याची त्यांची शैली ह्यामुळे हि कविता सुजाण रसिकांनी खूपच गौरविली. एक कवी सतत कवीपण वागवत असतो आणि त्याचं ते कवीपण घरभर पसरलेलं असतं, म्हणून कवीची बायको त्याला एक माळा बांधून घ्यायला लावते अशी कल्पना करून कवीचं जगण कस असतं ह्यावर आपल्या ‘पसारा’ कवितेत काकांनी प्रकाश टाकला. विनोदाची पेरणी करत, काळजाला चिमटा काढणारी त्यांची हि कविता जितकी श्रोत्यांना आवडली असेल तितकीच सर्व कवी मंडळींना देखील ती जवळची वाटली.
हे पहिले चक्र झाल्यानंतर संस्थेतर्फे डॉ. सौ. स्वाती गोडबोले आणि त्यांच्या मार्गदर्शक सौ. सारिका ठोसर ह्यांचा मराठी भाषेत त्यांनी केलेल्या संशोधन/ PHD साठी सन्मान करण्यात आला. तसेच सर्व कवी मंडळींचाही आपुलकीने गौरव करण्यात आला. काही काळाच्या विश्रांतीनंतर कार्यक्रमाचे दुसरे सत्र सुरू झाले.
पहिल्या चक्राप्रमाणे ह्या चक्रात देखील कवींनी आपल्या दोन कविता सादर करायच्या होत्या. फक्त पहिल्या चक्राला प्रत्येक कवीने कविता सादर करण्यापूर्वी त्या कवीचा अल्प परिचय करून दिला जात होता, तर ह्या दुसऱ्या चक्रामध्ये कुठला वेगाने कविता सादर करायच्या असे त्याचे स्वरूप होते.
दुसऱ्या चक्राची सुरुवात केली श्रीधर काकांनी. पहिल्या चक्रात मुक्तछंदी कविता सादर केल्यानंतर दुसऱ्या चक्रात काकांनी ‘नाते’ आणि ‘चालतो’ ह्या दोन गझल सादर केल्या. दोन्ही कविता ह्या गंभीर आणि आत्ममग्न वाटल्या.
त्यानंतर उमेशदांनी ‘तू जेव्हा कुंकू लावायचीस’ आणि ‘आता मुक्या क्षणांचा मज भार सोसवेना’ ह्या दोन कविता सादर केल्या. भावविहंगम अशा ह्या दोन कवितांनी रसिकसुद्धा भावमुग्ध झाला.
ठरलेल्या क्रमानुसार पुन्हा एकदा रमेशने ‘ओटी आणि ‘अभिव्यक्ती’ ह्या दोन कविता सादर केल्या. शेतकऱ्यांच्या जीवनाचा आणि वस्तुस्थितीचा वेध घेणाऱ्या दोन्ही कविता श्रोत्यांच्या संवेदनांना हलवून गेल्या. ओटीमध्ये पावसाच्या अभावाचीच परिस्थिती जरी चित्रित केली असली तरीही कवितेच्या शेवटला एक सकारात्मक संदेश देणारी अशी ती वेगळीच कविता होती, तर ‘अभिव्यक्ती’ मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी कृत्रिम सहानुभूती दाखवणाऱ्या कवीवर एकप्रकारे ताशेरे ओढले आहेत.
पुन्हा एकदा अलकनंदा काकूंनी दोन चटका लावणाऱ्या कविता सादर केल्या. ‘घरभर आरसे लावून घ्यावे, कोणीतरी सोबतीला आल्यासारखे तरी वाटेल’ अशीच सुरुवात होणारी, मनाला हालवून आणि हेलावून सोडणारी कविता जेव्हा काकूंनी सादर केली तेव्हा सभागृहात कित्येक जणांचे सुस्कारे आणि खंत प्रकट करणारी चुकचुक ऐकू आली. तोच मूड पुढे नेत ‘कळवायचे राहून गेले’ हि कविता देखील रसिकांच्या मनाला चुटपूट लावून गेली.
मैफिलीचा नूर त्यानंतर पालटला तो सारंगच्या दोन कवितांनी. आतापर्यंत सादर झालेल्या कवितांहून निराळी अशी एक वीररसयुक्त ‘तानाजीची शौर्यकथा’ आणि दुसरी भक्तीरसयुक्त ‘भक्त एकादशी’ ह्या कविता आवेश आणि आवेगपूर्ण सादर केल्या. कवितांमधील हे वैविध्य पाहून सभागृह स्तिमित झाले.
भारावून गेलेल्या सभागृहाला पुन्हा आपल्या वळणावर घेऊन येत तुषारने पहिल्यांदा त्याची स्फूर्तीदायी कविता कि जी एखाद्या सुभाषिताप्रमाणे अनेक ठिकाणी अनेक लोक वापरत असतात, ती सादर केली आणि सभागृहात एक चैतन्याची लहर पसरली. ‘मी हरलोय म्हणू नकोस, यावेळी हरलोय म्हण’ अशा ओळीतून जीवनाला उर्मी देणारं तत्वज्ञान तुषारने जेव्हा कवितेतून मांडले तेव्हा प्रेक्षक त्या विचारांची उंची पाहून दिग्मूढच झाले असावेत. त्यापाठोपाठ एक अतिशय सुंदर तरल, हळुवार प्रेमळ भावना जागवणारे गीत त्याने गाऊन सादर केले. ‘तू दिसलीस आणिक माझ्या बघण्याचे गाणे झाले’ अशी एकच ओळ ह्या कवितेमध्ये प्रेमामुळे संपूर्ण जीवन कसे भारावून जाते हे सशक्तपणे दाखवून देते.
करता करता कार्यक्रमाच्या सांगतेची वेळ येऊन ठेपली. ज्या कॉफीशॉप पासून विनायकने कार्यक्रमाची सुरुवात केली त्याच कॉफीशॉप शृंखलेतील पुढची कविता सादर करून त्याने कार्यक्रमाचा समारोपही केला. तत्पूर्वी त्याने आपली ‘उत्तान कविता’ हि एक आत्ममग्न आणि कवितेतील सच्चेपणाचा शोध घेणारी कविता सादर केली. तशी समजायला कठीण कविता, परंतु श्रोतृवर्ग इतका प्रगल्भ होता कि अशी कविता देखील त्यांनी छान समजून त्याला उत्तम प्रतिसाद देखील दिला. समारोपाला कॉफीशॉपची कविता अशी काही लज्जतदारपणे सादर केली कि संपूर्ण सभागृह खुश होऊन गेली. उत्तम मिष्टान्नांचे यथेच्छ जेवण झाल्यावर गरमागरम कॉफीचा स्वाद चाखाल्यासारखे सर्वांना झाले असावे.
सुमारे ७०-७५ प्रगल्भ रसिक, त्यांनी दिलेली मनमुराद सुयोग्य दाद, मधून अधून येणाऱ्या टाळ्या आणि हशा, वाहवा आणि आह, तुरळक आलेले काही once more अशा मस्त वातावरणात मैफल विलक्षण रंगली. सुमारे सव्वादोन अडीच तास कसे निघून गेले ते समजलेच नाही. कार्यक्रमाची सांगता श्रीधरकाकांनी आभार मानून आणि त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. जामदार ह्यांच्या संभाषणात्मक संक्षिप्त भाषणाने झाली.
एक चिरकाल मनात जपणारी आठवण घेऊन आम्ही सगळे आमच्या परतीच्या प्रवासाला सर्वांचा हृद्द्य निरोप घेऊन निघालो. जबलपूर विषयी एक न पुसली जाणारी जागा मनामध्ये आता निर्माण झाली होती.

Tuesday, December 16, 2008

१४ डिसेंबर २००८ - पुणे स्नेहमेळावा.

१४ डिसेंबर २००८ - पुणे स्नेहमेळावा.
(ही तर फ़क्त सुरुवात...........)

"जगणे केवळ जगणे नाही
हे बंध अवीट नात्यांचे
शब्द सारे एक जहाले
गाव वसवण्या कवितांचे"

वृत्तांत काय लिहावा. जे अनुभवायचे ते शब्दात कसे बांधावे! अतिशयोक्ती नाही, जे मनात आले, तेच लिहीतोय.

दुपारची ४ ची वेळ, डिसेंबरच्या गारव्यात खुपच सुखद वाटत होती. एका नवीन विश्वाचा अनुभव घेण्याची हुरहुर घेऊनच पु.ल.देशपांडे उद्दानापाशी पोचलो. सर्वचजण अनोळखी असणार होते. पण ओळखिचे "धागे" ऑर्कुटवर जुळले होतेच. आताचा कार्यक्रम म्हणजे त्या "अमूर्त नात्यांना" "मूर्त स्वरूप" देण्याचाच प्रयत्न होता कदाचित.

प्रथम सुप्रियाशी ओळख झाली. ती 'सह' आली असल्यामुळे मला एक सुखद आश्चर्य वाटलं, सुप्रियाचं नाही; ह्रिषिकेशचं.

बागेचं फ़ाटक उघडून मी आत जाऊन तिकिट खिडकीपाशी उभा राहिलो, आणि योगेश तपस्वीचा फ़ोन आला. फ़ोन ठेवला कि योगेश समोर हजर. खुप जुना मित्र भेटल्यासारखे वाटले. कितीतरी दिवस आम्ही भेटूया असे म्हणत होतो. पण भेटायला वेळच यावी लागते, हेच खरं.

पाठोपाठ समोरुन अविनाशकाका येताना दिसले, हुबेहुब ऑर्कुटमधल्या त्यांच्या फ़ोटोसारखे असल्यामुळे आणि २३ नोव्हेंबरच्या कार्यक्रमात त्यांना पाहिलेले असल्यामुळे मी त्यांना लगेच ओळखले.डोळ्यासमोर माझ्या एका कवितेवर त्यांनी लिहीलेला "खरपूस" "अभिप्राय" आठवला. म्हटले, या माणसाशी पहिली दोस्ती केली पाहिजे. हासत सामोरा गेलो, त्यांनीही ओळखले. प्रत्यक्ष भेटल्यावर कुठेतरी स्पंदन जुळल्यासारखी वाटली. वाटलं, त्यांच ऑर्कुटवरचं वाक्-ताडन म्हणजे फ़क्त वरचा 'चारखण'च आहे. ग-यातला गोडवा अजुन चाखलाच नाहिये. कार्यक्रमात अविनाशकाका खुले दिल बोललेही, 'आम्ही कोणाला सोडत नाही. टीका करायची म्हटली कि सपाटून करायची. सारंगवर नुकतीच केली होती. पण कवितेवर प्रेम करायच.' एकच शिकलो, माणसाला एकच बाजु पाहून पारखु नये.

पाठोपाठ आणखि काही वयस्कर सद्ग्रहस्थ आले. ओळख झाली, पेठेकाका, आणि डोळ्यासमोर सुंदर सुंदर चित्र तरळुन गेली.

मग शशांक, शिरीन आणि प्रसन्ना भेटले. ते बराच वेळ बाहेरच होते. एकेकाशी ओळख होताना मनामध्ये यांच्याशी आपण काय काय कुठे कुठे बोललो याच्या आठवणी जमा होत होत्या.

सगळ्यांच्या चेह-यावर प्रसन्नता दिसत होती, उत्सुकता दिसत होती.

आणि मग या कार्यक्रमाच्या उर्ध्वर्यु 'आदिमाया' सोनालीताईंचे आगमन झाले.

आम्ही बागेतल्या नियोजित ठिकाणी प्रस्थान केले.

बाजुला हिरवळ, छानश्या झ-यासारखे झुळुझुळु वाहणारे पाणी, सुंदर झाडे आणि जपानी पद्धतीची झोपडीतील बैठक, यानी वातावरण हलकं, प्रसन्न वाटत होतं.

'सुरुवात कठिण असते'. कार्यक्रमाची कुठलीच आखणी करायची नाही असेच ठरवलेले होते, त्यामुळे थोडा संभ्रम होता, कि खरोखरच २-३ तास हे सगळे चालेल का? लोकांच्या काय प्रतिक्रीया असतील, बागेत खुप गोंधळ / ऊन असेल का? ई.

पण जशी सुरुवात झाली तशा माझ्या या सर्व शंका दूर झाल्या. आविनाश आणि पेठेकाकांसारखे सिनिअर लोक असल्यामुळे थोडा दिलासाही वाटला.

ओळख करुन घेणे अपरिहार्य होतेच. त्यामुळे सुरुवात ओळखिनेच केली. काही लोकांची आपापसात ओळख आधिपासून होती, पण बरेचसे जण नवीन आणि एकमेकांशी ओळख नसलेले होते.

सुरुवात माझ्यापासून केली. आणि मग एकेकाचं खरं स्वरूप कळु लागलं.

बहुदा शेवटचीच ओळख सुपर्णाची होती. त्यानंतर काहीजण आले, पण तत्पुर्वी ओळखिचा पहिला राऊंड संपलेला होता.

सुपर्णाने ओळख करुन द्यायला सुरुवात केली, तोवर लोक फ़ारसे बोलत नव्हते. पण सुपर्णाने मैफ़िलाचा रंग बदलायला सुरुवात केली.

कधी कल्पनाच नव्हती कि सुपर्णा एव्हढी हरहुन्नरी असेल. बंगाली, गुजराथी, मराठी अशा अनेक भाषा संस्कृतींचा तीचा परिचय आणि विविध क्षेत्रातील तीचा अनुभव हा या पुणेकर कविं मंडळींच्या दृष्टीने एक महत्वाचा दुवा असेल.

एव्हाना लोक छान मुरु लागले होते. ओळख ही केवळ ओळख परेड सारखि न होता हास्यविनोद आणि गप्पांच्या ओघात एक ओघवती ओळख घडून आली. कधीही न भेटलेले सर्वजण गहिरी जुनी ओळख असल्यासारखे वाटू लागले.

आता पुढचा महत्वाचा भाग होता. आज भेटलो, पुढे काय?

पण तो प्रश्नही दिलखुलास चर्चेत चटकन सुटला.

पुढला कार्यक्रम ठरला. लवकरच त्याची माहिती समूहावर तर मिळेलच. पण भविष्यातल्या या कार्यक्रमांची रुपरेषाही ठरली. ती आज इथे जाहीर करताना मला अतिशय आनंद होतो आहे, सार्थकतेचा.

दर महिन्याच्या शेवटच्या रविवार पुणे येथे बैठक होईल. ५ जण त्या बैठकीच्या नियोजनाची जबाबदारी घेतील. कार्यक्रमाची आखणी, जागा, वेळ ई. गोष्टी हीच मंडळी ठरवतील आणि आपल्या समूहावर सर्वांच्या माहितीकरीता कळवतील.

आज जरी अशी सुटसुटीत मांडणी आखली असली तरी पुढे जाऊन आणखि नियोजनबद्ध आणि उपयुक्त कार्यक्रम करण्याचा मानस व्यक्त झाला.

पुढच्या कार्यक्रमांचा आराखडा मुकर्रर झाल्यानंतर......... मग तर खरा कार्यक्रम होता.......

काशीला जाऊन गंगाच पाहिली नाही (किंवा अमेरिकेला जाऊन लास वेगास...) तर काय उपयोग.

पंडितांनी एकत्र यायचं आणि शास्त्रचर्चा नाही (किंवा गाढवांनी एकत्र यायचं आणि लाथांचा सुकाळ नाही) तर मग काय मजा!!!

पहिली कविता मला वाटते पेठेकाकांनी वाचली. (चुकले असल्यास कुणिही दुरुस्त करावे).

आणि मग काव्यांचे घडे रीक्त होऊ लागले. जगदिश, अक्षदा, श्रीकांत, शिरीन, आसावरी, दस्तुरखुद्द....आणि ईतरांनीही अनेक कविता वाचल्या. (माफ़ करा मित्रांनो अजुनही सर्वांची नावे लक्षात येत नाहीयेत). सगळे चिंब चिंब झाले.

आणि जणु श्रावणसरीना कस्तुरीचा सुगंध सुटावा, असा आणखि एक सुखद अनुभव सुपर्णाने दिला.

सुपर्णाने केवळ कविता म्हटलीच नाही, तर ती गायिली...तीच्या मुग्ध गळ्यात अवीट गोडी जाणवली. तीने गायलेले हिंदी शेर (सुपर्णा त्याला काय म्हणतात ठाऊक नाही. योग्य शब्द तु नंतर सांग) हे केवळ काव्य म्हणून अप्रतिम होते असे नाही, तर तीने ते गाऊन दाखवल्यानंतर त्यात वेगळीच मजा आली, त्यातल्या भावर्थ उफ़ाळुन वर आला.

मग सुपर्णाने तीचा पहिलाच (पुन्हा कदाचित मी चुकत असेन) मराठी प्रयत्न वाचून दाखवला.



"हर मुलाकात का अंजाम जुदाई क्युं है" हा प्रश्न कदाचित काही वेळाने मी जेव्हा कार्यक्रम थांबवण्याची विनंती केली तेव्हा कित्येकांच्या मनात येऊन गेला असेल.

मित्रांनो, जीवनातले काही क्षण तुमच्या सहवासात संपन्न झाले. त्याबद्दल व्यक्तीशः अनेक धन्यवाद. धन्यवाद म्हणताना आवर्जुन उल्लेख करेन तो म्हणजे शशांकचा. शशांक खास मुंबईहून या कार्यक्रमास हजर होता.

आणि शेवटी नक्की उल्लेख करेन तो म्हणजे नवीन मित्र श्रीकांतचा. हा मित्र कोपरगाववरुन केवळ कार्यक्रमासाठी आला. फ़क्त आलाच नाही तर उपाशी तापाशी आला. दुर्दैव कि कार्यक्रमाला कसलीच खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती.

श्रीकांत केवळ आलाचा नाही, तर त्यानं मैफ़िलीत वेगळाच उत्साह आणला. एक कविता गाऊन दाखविली, तर दुस-या कवितेवर मनमुक्त दाद मिळविली. त्याचा आयुष्यातला उत्साह पाहून एखाद्या मरगळलेल्याही चेतना मिळावी. मित्रा, तुला वारंवार भेटता येईल अशी आशा करतो.

आणि सर्व कविंमध्ये मुकाटपणे बसलेल्या दोन रसिकांना कसे विसरता येईल.

ह्रिषिकेष चाफ़ेकर आणि अरविंद सहस्त्रबुद्धे. या दोघांनी आम्हा सर्वांना २-३ तास मुकाटपणे सहन केलं. त्यांच्या रसिकतेला मुजरा करणे भाग आहेच, पण सुप्रिया आणि सुपर्णा (अरेच्चा, हा तर 'सु' योग आहे!!) यांना कविता का सुचु शकतात याचं कारणही लक्षात येतं. तुम्हा दोघांना नुसता धन्यावाद नाही, तर आम्हा तथाकथित (स्वकथित म्हणा हवं तर) कविंच्या कविता पुढच्यावेळिही ऐकण्यासाठी हे सस्नेह आमंत्रण.

आणि कार्यक्रमाला न आलेल्या, आणि ही क्षणचित्रे वाचणा-या (जळुन खाक होणा-या) सर्वांनाही या काव्यमेजवानीचं सस्नेह आमंत्रण......आजच.

एक उल्लेख टाळताही येत नाही; आणि करताही येत नाही. ती व्यक्ती कार्यक्रमाला नव्हती, मग उल्लेख कसा करायचा. पण ती कार्यक्रमाची मूळ स्फ़ुर्तीस्त्रोत आहे, त्यामुळे उल्लेख टाळणेही अशक्य.

काही लोकांना "नाम गुम जायेगा" असे म्हणत 'नामानिराळे' राहायला छान जमते. नामकाका येणार म्हणून् बरेच लोक तिथे आले होते. नामकांकडून ते न आल्याबद्दल काय penalty घेणार ते मलाही सांगा रे.


मित्रांनो, जेव्हढं आठवलं तेव्हढं लिहीलं आहे. पावसाचे सारेच थेंब झेलता येत नाही; कि केशराचा दरवळ शब्दात सांगता येत नाही. जेव्हढं आठवलं तेव्हढं लिहील आहे. तुम्ही वेचलेल्या पावसाच्या सुगंधित थेंबांच शब्दांकन करुन या माझ्या तोडक्या-मोडक्या प्रयत्नाला संपन्न करा.

अजय ने काढलेल्या चित्रांकनाची लिंक खाली देतो आहे.

अजुन सुरेशकाका, सुपर्णा ई. च्या चित्रफ़िती यापुढेच जोडाव्यात.

ज्या कविता सादर केल्या गेल्या (आसावरीः तु म्हटलेली सुधीर मोघ्यांचीही), ईथे टाकाव्यात. ते काम ज्याचे त्यानेच करावे, म्हणजे त्या कविच्या ओळखीसकट कविता इथे येईल.

सांगणे न लगे, कि न म्हटलेल्या कविता ईथे टाकू नयेत.

ही आमची "साठा उत्तराची कहाणी, पाचा (खरेतर एकाच) उत्तरी" सफ़ळ आणि संपूर्ण मानावी.

निरोप घेतो.............पुन्हा पुढच्या भेटीपर्यंतच.........पुन्हा लवकरच भेटण्यासाठी व्याकुळ होऊन.

तुमचाच............सारंग भणगे.


http://www.orkut.co.in/Main#Album.aspx?uid=13466013627587130606&aid=1229289059
Related Posts Plugin for WordPress, Blogger...