क्षणाक्षणांचे व्हावे मिसरे आयुष्याची गझल जमावी
रसिका केवळ नको शेवटी हर शेराला दाद मिळावी
सुरेख लिहितो गझला त्याला अपार असते दु:ख म्हणे पण
फसते त्याला दु:खच नसते गैरसमजूत अशी नसावी
आयुष्याच्या मुशायऱ्याला हजर हजारो रसीक श्रोते
हरेक मिसरा जिच्याचसाठी अशी गझल पण हजर नसावी?
असून सारे तिच्या विना हे जगणे वाटे अशी गझल की
शेर कितीही लिहिले तरीही मतल्या शिवाय पूर्ण न व्हावी
बाप होतसे शेर प्रसंगी आणिक होते जमीन आई
मक्ता घेउन त्यांचा आपण गझल मुसलसल पूर्ण करावी
कधी वाटते गझलेला मी जन्म दिला ती माझी मुलगी
पुन्हा वाचता जाणवते की अशीच माझी माय असावी
=============================
सारंग भणगे (१८ मे २०२०)
No comments:
Post a Comment