समुद्रसपाटी
पासून ११,००० ते
१८,००० फूट उंचीवर,
अनेकविध रंगांची रेती; माती; वाळू, दगड; धोंडे; खडक;
डोंगर; पर्वत; आणि बर्फाच्छादित शिखरे;
चिंचोळ्या नद्या; विस्तीर्ण वाळवंटी दऱ्या-खोरे, रंग बदलणाऱ्या निळ्या
रंगांची विशाल सरोवरे, डोंगरांच्या कड्यांवर बांधलेली तिबेटी पद्धतीची घरे; निसर्गरम्य परिसरात
डोंगरांवर बांधलेल्या बुद्धाच्या उंच उंच मुर्त्यांची
बुद्ध विहारे, अत्यंत नम्र; सज्जन; मितभाषी; कामसू; चपट्या नाकाची आणि मिचमिच्या डोळ्यांची
साधी सरळ माणसे, आणि
त्यांनी निर्माण केलेली निर्मळ; निरलस; निसर्ग-प्रेरित संस्कृती.....अशा अनेक प्रकारे
विविधगुणदर्शन घडवून आणणाऱ्या नितांत सुंदर लडाख बद्दल खरेतर
भरपूर काही लिहिता येईल,
लिहायचा प्रयत्नही करेन. परंतु इतक्या सगळ्या सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लडाखभर सतत दिसत राहतात
ते भारतीय लष्कराचे सैनिकी तळ, लष्करी गणवेश
धारण केलेले रुबाबदार सैनिक; हिरव्या रंगाच्या गाड्या; BRO (Border Road
Organisation) ने तयार केलेले गुळगुळीत
रस्ते; जागोजागी BRO च्या कार्याविषयी गौरवपूर्ण
उल्लेख करणारी तडफदार वाक्ये ई. अनेक गोष्टींबरोबर
उल्लेख करणे आवश्यक असलेली
उल्लेखनीय अशी भारतीय लष्कराची
स्मारके!
स्मारक
१ - Hall of Fame, Leh
"When you go home, tell them of us and say, for your
tomorrow, we gave our today."
फक्त
credit card नेच प्रवेश फी स्वीकारण्याची लष्करी
पद्धत आधीच असलेला विश्वास
आणि आदर दृढ करते.
प्रवेश घेतल्याबरोबर असलेल्या छोट्याशा दालनात एक लष्करी अधिकारी
तुमचे स्वागत करतो तेव्हा सर्वप्रथम
लक्ष जाते ते वर
उद्धृत केलेल्या संदेशावर, आणि टचकन डोळ्यात
पाणी उभे राहते. 'कुछ
याद उन्हे भी कर लो,
जो लौट के फिर
ना आये' ह्या कवी
प्रदीप ह्यांच्या अजरामर ओळींची आठवण करून देणारे
ते वाक्य, आपल्या सैनिकांच्या सर्वोच्च निरपेक्ष त्यागाची आठवण करून देते.
त्यानंतर अनेकदा आणि वारंवार डोळ्यात
पाणी येत राहते; गालांवरून
वाहत राहते. सैन्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्याहून अधिक आपण काही
केले पाहिजे, पण एवढी संवेदनशीलता
तरी आपल्यामध्ये असलीच पाहिजे!
तेथील
लष्करी अधिकारी लडाखमध्ये लढल्या गेलेल्या एकूण ५ युद्धांची
(१९६२ - चीन, १९६५ - पाकिस्तान,
१९७१ - पाकिस्तान, १९९९ - पाकिस्तान, २०२० (गलवान) - चीन) संक्षिप्त ओळख
करून देऊन मग १९९९
च्या कारगिल युद्ध्याची तपशीलवार माहिती देतात. जेव्हा ते terrain model वर युद्ध कसे
आणि कुठे घडले हे
सांगतात तेव्हा अनेक चित्रपट, बातम्या,
documentaries मध्ये पाहिलेल्या युद्धाची अधिक स्पष्ट कल्पना
येते. शेरशहा Captain विक्रम बात्राचा निडर स्वभाव, Captain मनोजकुमार
पांडेंचा विलक्षण पराक्रम, १५ गोळ्या खाऊनही
जिवंत राहिलेले सुभेदार योगेंद्र सिंह यादव, ह्यांच्याबरोबरच
सर्वात पहिल्या शोध मोहीम पथकातील
हालहाल करून मारल्या गेलेल्या
सर्वच्या सर्व सैनिकांचा परमोच्च
त्याग, त्यांनी भोगलेल्या यातना ऐकून जीव कासावीस
होतो.
कारगिल
युद्ध्याबरोबरच एकूण भारतीय लष्करातील
परमवीर चक्र, महावीर चक्र आणि इतर
शौर्य पुरस्कारांची आणि त्यांनी सन्मानित
केलेल्या वीर योद्धयांची माहिती
दिली जाते. प्रत्येक वेळी जाणवत राहते
कि आपले आजचे अस्तित्व
हे ह्या शूर योद्धयांच्या
अतुलनीय पराक्रम आणि त्यागामुळेच आहे.
संग्रहालयात
पाहण्यासारखे, वाचण्यासारखे इतर पुष्कळ आहेच.
त्याचा प्रत्यक्ष अनुभव नक्कीच घ्यावा! "Only the best
of friends and the worst of enemies visit us."
स्मारक २ - स्योक युद्ध स्मारक, नुब्रा खोरे, लडाख
सियाचीन
हिमखंडाविषयी आपण सर्वांनी ऐकलेच
असेल. १९८५ साली ह्या
अत्यंत मोक्याच्या हिमखंडाला (glacier) भारताने ताब्यात घेतले. वस्तुतः एवढ्या उंचीवर (समुद्रसपाटीपासून २१,००० फूट)
आणि मानवी वास्तव्यासाठी अत्यंत प्रतिकूल, किंबहुना मानवी वास्तव्य अशक्यच होईल अशा ह्या
हिमखंडावर सैनिकी तळ असण्याची आवश्यकता
नाही असे अलिखित सामंजस्य
भारत-पाकिस्तान मध्ये होते. परंतु चीन आणि पाकिस्तानच्या
संशयास्पद हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी ह्या अशा ठिकाणी
भारतीय लष्कराला गेली ४१ वर्षे
वास्तव्य करावे लागत आहे. खरेतर,
भारताने त्वरित हालचाली करून तिथे लष्करी
तळ उभा केला नसता
तर १९८५ ला पाकिस्तानने
हे मोक्याचे ठाणे काबीज केले
असते.
सियाचिनला
केवळ बर्फ असतो, सर्वत्र
पांढऱ्या बर्फाचे साम्राज्य! तापमान उणे ४० ते
६० अंश इतके अतिप्रचंड
थंड असते. २१,००० फूट
उंचीवर प्राणवायू अत्यंत विरळ असतो. ह्या
आणि अशा अनेक निरतिशय
प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय सैनिक तिथे तळ ठोकून
आहेत.
तिथे
आपल्या सैनिकांना ४ महिन्यांहून अधिक
काळ वास्तव्यास पाठवले जात नाही. त्यांच्या
खाण्यापिण्याची सोय हि नुब्रा
खोऱ्यातील सियाचीन base camp मधूनच होते. ह्यासाठी फार मोठा खर्च
भारतीय लष्कर खर्च करते. पण
४ महिने, अशा अतिप्रचंड थंड
वातावरणात राहून, लष्करी क्रिया पार पडून, सतत
पांढऱ्या शुभ्र बर्फाचेच केवळ दर्शन घेऊन
सैनिकांवर विविध मानसिक परिणाम सुद्धा होतात. अनेकदा तिथे हिमवर्षाव; हिमस्खलन
(avalanches) होते, वातावरण सतत बदलत राहते.
जरी तिथे चीन-पाकिस्तानबरोबर
युद्ध होत नसले तरी
क्रूर निसर्गाशी चाललेल्या निरंतर युद्धात अनेक भारतीय सैनिक
दरवर्षी आपले प्राण गमावतात!
ह्या खंडप्राय देशाचे संरक्षण करण्यासाठी सियाचीनच्या ह्या हिमखंडांच्या टोकांवर
आपले सैन्य सर्वस्वाचा त्याग करत गेले ४१
वर्षे प्रत्येक दिवस एक प्रकारच्या
युद्धाचा सामना करत तगून आहेत.
नुब्रा खोऱ्यातील ह्या स्मारकात १९८५
पासून हुतात्मा झालेल्या ह्या शूरवीरांच्या नावाची
यादी आहे. तसे म्हटले
तर इतर काहीच नाही,
परंतु विशाल डोंगरांनी वेढलेल्या आणि खोल दरीतून
वाहणाऱ्या सिंधू नदीच्या जवळच उभ्या केलेल्या
ह्या स्मारकापाशी जाऊन ह्या वीरांचे
किंचित स्मरण करणे हे देखील
सौभाग्यच आहे!
स्मारक ३ - रेझिंग ला युद्ध स्मारक, अहिर धाम
मेजर
शैतान सिंग ह्यांचे नाव
जर ऐकले नसेल तर
आपल्या एक मुस्काटात मारून
घ्यावी. खरेतर मेजर शैतान सिंग,
Captain विक्रम बात्रा, Captain मनोज कुमार पांडे
ह्या सारख्यांना आपण दैवत म्हणूनच
मानले पाहिजे, त्यांचे पूजन केले पाहिजे,
त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे; आणि त्यांच्या ह्या
स्मारकांना तीर्थस्थळाचा दर्जा दिला पाहिजे. "शहीदों
की चिताओं पर लगेंगे हर
बरस मेले, वतन पर मरने
वालों का यही बाकी
निशां होगा" राम प्रसाद बिस्मिल
ह्यांच्या ह्या ओळी प्रत्यक्षात
यायला हव्यात!
१९६२
च्या चीन युद्धात १८,००० फूट उंचीवरील
रेझिंग ला खिंडीमध्ये मेजर
शैतान सिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली
चिनी सैन्याबरोबर लढत असताना, ११४
भारतीय सैनिकांनी प्राणांची आहुती दिली, परंतु बदल्यात १३०० चिनी सैनिकांना
कंठस्नान घातले, ते देखील तुटपुंजा
दारुगोळा, साहित्य, कपडे, अन्न-पाणी अशा
प्रतिकूल परिस्थितीमध्ये! एखाद्या कल्पित युद्धकथेमध्ये शोभावा असा विलक्षण, अमानवी
पराक्रम गाजवणाऱ्या ह्या ११४ हुतात्म्यांचे
स्मारक चुशुल येथे काहीच वर्षांपूर्वी
बांधले गेले आहे. मे
महिन्याच्या उन्हाळी मौसमात, दुपारी साधारणपणे १२ वाजता ३
sweaters अंगावर चढवलेले असतानादेखील प्रचंड वाऱ्याने झोक तर जात
होतेच, परंतु थंडीने हुडहुडी भरत होती. तर
मग १७-१८ नोव्हेंबरच्या
कडाक्याच्या थंडीत ह्या ११३ वीरांनी
कसे युद्ध लढले असेल ह्याची
कल्पना देखील करवत नाही. ३,००० चिनी सैनिकांशी
१२० सैनिक ४ दिवस अन्नपाण्याविना
लढले. झुंज अशी दिली
कि २ महिन्यांनी जेव्हा
भारतीय लष्कराधिकारी रेझिंग ला ला पोहोचले
तेव्हा ह्या सैनिकांची बोटे
अजूनही बंदुकांवर होती. "दस दस को
एक ने मारा" ह्याचा
प्रत्यय देणारी अहिर जातीची १३
कुमाऊँ रेजिमेंटच्या ह्या सैनिकांच्या विरागाथेचे
वर्णन कवी प्रदीपांनी अक्षरश:
करून ठेवले आहे -
"जब
तक थी सांस लड़े
वो
फिर
अपनी लाश बिछा दी
संगीन
पे धर कर माथा
सो गये अमर बलिदानी
जो शहीद हुए हैं
उनकी
ज़रा
याद करो क़ुर्बानी"
"थी
खून से लथ पथ
काया
फिर
बंदूक उठाके
दस दस को एक
ने मारा
फिर
गिर गये होश गंवा
के"
स्मारकात
ह्या वीर-गाथेची इत्थंभूत
माहिती ऐकताना, अमिताभ बच्चन ह्यांच्या आवाजातील documentary पाहताना मनाची प्रचंड कालवाकालव होत राहते, डोळ्यातून
अश्रूंचा पारा सतत फुटत
राहतो, ऊर अभिमानाने भरून
येतो, गळा आणि डोळे
ओले होत राहतात. इतका
प्रचंड पराक्रम गाजवणारे हे सैनिक अनामिकच
राहतात, त्यांच्या त्यागाविषयी आपण अनभिज्ञच राहतो,
त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यापेक्षा आपण फिल्मी हिरोंकडून
प्रेरणा घेतो, आपले ऐषोआरामातले जीवन
जगताना क्वचितच त्यांची आठवण आपण काढतो
ई. अनेक संमिश्र भावनांनी
आपण भावविवश किंवा भावविव्हल देखील होतो.
ह्या
तीन स्मारकरांनी लडाखची माझी हि ट्रिप
खऱ्या अर्थाने सुफळ संपूर्ण झाली.
प्रवासाच्या आनंदाला एक अर्थपूर्णता लाभली.
सिंधू नदी पाहून, तिला
स्पर्श करून आपण ह्या
नदीतून उगम झालेल्या, फुललेल्या
संस्कृतीचे पाईक आहोत, अविभाज्य
भाग आहोत हि भावना
गदगदत राहिली, पण ह्या लष्करी
स्मारकांमधून लडाखभर पसरलेला, पण डोळ्यांनी न
दिसणारा आपल्या सैनिकांच्या रक्ताचा लाल रंग आणि
त्यांच्या त्यागाचा अदृश्य असा भगवा-केसरी
रंग मन भरून राहिला
आहे! आणि पुन्हा पुन्हा
ते शब्द प्रतिध्वनीत होत
राहत आहेत -
"ऐ
मेरे वतन के लोगों
ज़रा
आंख में भर लो
पानी
जो शहीद हुए हैं
उनकी
ज़रा
याद करो क़ुर्बानी"
स्मारक
४ - छत्रपती शिवाजी महाराज पॅंगॉन्ग लेक
पॅंगॉन्ग
लेकला आपण पोहोचत असतानाच
आपल्याला सर्वात प्रथम Maratha Light Infantry
च्या आवारातील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पूर्ण पुतळ्याचे दर्शन होते आणि ऊर
अभिमानाने भरून येतो. "सप्तसिंधू
यवनांच्या हातून मुक्त करा" ह्या महाराजांच्या स्वप्न
वजा आदेशाची पूर्ती आज झालेली असली
तरीही लडाखच्या दोन बाजूंना आपले
दोन कट्टर शत्रू आजही भारतीय प्रदेश
गिळंकृत करून बसलेले आहेत.
अशा परिस्थितीत महाराजांचा विजयी मुद्रेतील हा पुतळा अत्यंत
प्रेरणादायी स्मारकचं आहे! ह्या उल्लेखाशिवाय
प्रस्तुत लेखाचे प्रयोजन पूर्णही झाले नसते अशी
माझी भावना आहे!
- सारंग भणगे (२० मे २०२६)





No comments:
Post a Comment