Showing posts with label गझल. Show all posts
Showing posts with label गझल. Show all posts

Monday, May 18, 2020

क्षणाक्षणांचे व्हावे मिसरे


क्षणाक्षणांचे व्हावे मिसरे आयुष्याची गझल जमावी
रसिका केवळ नको शेवटी हर शेराला दाद मिळावी

सुरेख लिहितो गझला त्याला अपार असते दु:ख म्हणे पण
फसते त्याला दु:खच नसते गैरसमजूत अशी नसावी

आयुष्याच्या मुशायऱ्याला हजर हजारो रसीक श्रोते
हरेक मिसरा जिच्याचसाठी अशी गझल पण हजर नसावी?

असून सारे तिच्या विना हे जगणे वाटे अशी गझल की
शेर कितीही लिहिले तरीही मतल्या शिवाय पूर्ण न व्हावी

बाप होतसे शेर प्रसंगी आणिक होते जमीन आई
मक्ता घेउन त्यांचा आपण गझल मुसलसल पूर्ण करावी

कधी वाटते गझलेला मी जन्म दिला ती माझी मुलगी
पुन्हा वाचता जाणवते की अशीच माझी माय असावी
=============================
सारंग भणगे (१८ मे २०२०)

Friday, December 20, 2019

सावली मला तुझी सदैव जाळतेच का?

पूर्ण मी असेन जर अपूर्ण वाटतेच का?
उत्तरे मिळूनही सुटेचनात पेच का?

पांढऱ्या ढगा तुला सवाल एक थेट हा
सावली मला तुझी सदैव जाळतेच का?

झोपलीस त्या कुशीवरी सखे निवांत तू
सांगतेस जे तुझे अतीव प्रेम हेच का?

पोरगी विचारते मला खडा सवाल की
सात वाजता घरात मीच हे असेच का?

दु:ख ना तुला तरी कवी कशास व्हायचे?
फाटले नसेल तर उगा शिवायचेच का?
=====================
सारंग भणगे (१७ डिसेंबर २०१९)

Friday, October 12, 2018

इकडे तिकडे कितीही फिरलो तुझ्याचसाठी राखीव मी

इकडे तिकडे कितीही फिरलो तुझ्याचसाठी राखीव मी
तुझाच होतो तुझाच आहे तुझाच राहो आजीव मी

काडतूस मी माझ्यामध्ये दारू भरली ठासून पण
बंदुकीमधे भरले नाही म्हणून आहे निर्जीव मी

काळीज म्हणे दु:खाला की बेट्या छिन्नी आहेस तू
घाव घातले म्हणून झालो सुंदर मंदिर कोरीव मी

भावभावना विचार ह्यांनी ओबडधोबड होतसे मन
अमिबा त्याच्या मनात म्हणतो मनापुढे तर रेखीव मी

युद्ध तसे तर चालू असते शस्त्रे केवळ निरनिराळी
स्वकियासंगे लढण्या धरले पेनस्वरूपी गांडीव मी
===========================
सारंग भणगे (८ आॅक्टोबर २०१८)

Thursday, December 28, 2017

पाने गाळत झाड बोडके रडले होते


पाने गाळत झाड बोडके रडले होते
फांदीवरती प्रेतच केवळ उरले होते

तिची सावली आयुष्यावर पडली तेव्हा
माझ्यावरती उनही थोडे जळले होते

भाग्य टाकते बाऊन्सर मी हूक मारतो
साधे साधे बाॅल परंतु हुकले होते

एकलकोंडा कवी बिचारा मरून गेला
अंत्यविधीला बहुत चाहते जमले होते

धूळ झटकली तेव्हा कळले सोने होते
कुणी कुणी तर पुस्तक त्यांना म्हटले होते

विद्वत्तेवर अहंमन्यता साचत गेली
निर्मळ पाणी शेवाळ्याने भरले होते

लिहिला नाही गझलेमध्ये विठ्ठल कारण
काळिज माझे विठ्ठल मंदिर बनले होते
========================
सारंग भणगे (नोव्हेंबर २०१७)

Wednesday, December 13, 2017

फुलांचा ताटवा आहेस बहुधा

तरही मिसा-यासाठी बेफिजींचे आभार मानून -

फुलांचा ताटवा आहेस बहुधा
जगाला तू हवा आहेस बहुधा

भवाच्या सागराला पार करतो
विठू तू नाखवा आहेस बहुधा

जरा छातीत ये गझले जगव तू
मनासाठी हवा आहेस बहुधा

रुचेना काव्य नाटक चित्रही ना
मनाने नागवा आहेस बहुधा

तुझ्यासाठी झुरे वेश्या निरंतर
तिचाही माधवा आहेस बहुधा
===================
सारंग भणगे (१३ डिसेंबर २०१७)

Friday, November 10, 2017

तुझ्यावाचून मला जराही करमत नाही


तुझ्यावाचून मला जराही करमत नाही
तुला करमते म्हणून मी ते सांगत नाही

घड्याळातले काटे फिरती सतत निरंतर
तुझ्यावाचून काळ पुढे पण सरकत नाही

अवकाशाहुन अपार मोठी आहे कविता
चिमटीमध्ये माझ्या इवल्या मावत नाही

कधी तृणांवर हुळहुळणारा अल्लड वारा

होउ शकतो कसा वावटळ समजत नाही

कुणी न व्हावे उजाड इतके कोळपलेले
काळजातही आता काही उगवत नाही

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
शब्दामधून पाझरतो पण झिरपत नाही
=========================
सारंग भणगे (१० नोव्हेंबर २०१७)

Saturday, November 4, 2017

लग्नानंतर

लग्नाआधी सुखात होतो सुखात आहे लग्नानंतर
आधी होते मुक्तकाव्य जे वृत्तकाव्य ते लग्नानंतर

उगाच पूर्वी जागून रात्री प्रॉडक्टीव्ह ना काही घडले
मधुरात्रीला अधुरात्रीचे स्वप्न उमलले लग्नानंतर

करायचो ज्या कृती बेधडक त्यांची आता चोरी झाली
पोरी बघणे चोरीहूनही पाप जाहले लग्नानंतर

लग्नाआधी वाचन बक्कळ; कविता लिहिल्या असत्या पुष्कळ
‘परी’ बोबडी अल्लड कविता कुशीत येते लग्नानंतर

वृत्त अलामत खूप कवाफी रदीफ होते लग्नाआधी
प्राणप्रियेने प्राण फुंकले गझलियतचे लग्नानंतर
==========================
सारंग भणगे (४ नोव्हेंबर २०१७)

Monday, October 23, 2017

आयुष्याचे सरपण गेले सरणावरती

आयुष्याचे सरपण गेले सरणावरती
कविता सुचते आहे अपुल्या मरणावरती

राम सोबती असता कसला मोह जडाचा
काय नवल की जीव जडावा हरणावरती

तारण असते जीवन त्याचे पाण्यासाठी
जमीन जाते बळी बळीची धरणावरती

तू गेल्यावर श्वास घेतला अखेरचा मी
आता जगतो आहे केवळ स्मरणावरती

निरिच्छ होउन गाव सोडला बैराग्याने
धुळही नव्हती कणभर त्याच्या चरणावरती

डोके भिडले आकाशाला पाय भुईवर
मस्तक माझे झुके अशांच्या चरणावरती

- सारंग भणगे (२० ऑक्टोबर २०१७)

Tuesday, October 17, 2017

आर्तता काव्यात येते दाटुनी

आर्तता काव्यात येते दाटुनी
आत आहे तेच येते आतुनी

कष्टणाऱ्या बांधवांना भाकरी
गोड आहे विठ्ठला नामाहुनी

उंबऱ्यावर जाहली माझी प्रिया
माप येता वेदना ओलांडुनी

बोचरी असहायता पुरुषा तुझी
कृष्णमयता साध्य राधा होउनी

खोल विहिरीतून कविता काढतो 
मोट शब्दांची तिच्यावर बांधुनी
==================
सारंग भणगे (१६ ऑक्टोबर २०१७)

Friday, September 8, 2017

मशाल हाती घेऊन तर पहा

मशाल हाती घेऊन तर पहा
शेर एखादा लिहून तर पहा

दुरून डोंगर साजरे दिसतात
जवळ जरासे जाऊन तर पहा

पाची बोटं वेगळी असतात
बोटांची मूठ करून तर पहा

फटफटेल बघ आत तुझ्यासुद्धा
दु:खाने आधी फाटून तर पहा

तीही जिवंत होऊन जगतील
स्वप्नास श्वास देऊन तर पहा
     
कर्माचे फळ टाकले तरी पण
कर्माचे फळ चाखून तर पहा
======================
सारंग भणगे (५ सप्टेंबर २०१७)

Wednesday, June 17, 2015

जरी उभा मी उन्हात आहे

जरी उभा मी उन्हात आहे
वसंत माझ्या मनात आहे

उगाच शोधी इथे तिथे का
तुला हवे ते तुझ्यात आहे

न दुःख ज्याला न हर्ष काही
तया कशाची ददात आहे

असे सुखाचा परीघ छोटा
जगायचे वर्तुळात आहे

भरून येता नभात पाणी
जमीन उडते ढगात आहे

जळून गेलो तरी न चिंता
फिनिक्स माझ्या तनात आहे

न विठ्ठलाची करेन भक्ती
विलीन आत्मा तयात आहे

नसेल ज्याच्या मनात प्रिती
उगाच वेडा जगात आहे
================
सारंग भणगे. (१७ जून २०१५)

Monday, May 12, 2014

कृष्णा

घेत आहे सारखे ती नाव कृष्णा
द्रौपदीला वाचवाया धाव कृष्णा

खेळणे झाले पुरे हा माणसांशी
आंधळ्या कोशिंबिरीचा डाव कृष्णा

यादवीला टाळणे ना शक्य झाले
वाचण्याचा काय आम्हा वाव कृष्णा!

भारताला धर्म ग्लानी गाढ आली
अन् तुझाही झोपल्याचा आव कृष्णा

नाम-भक्ती सोड आता युद्ध कर तू
काय नाही हा अहिंसा-भाव कृष्णा!

सारंग भणगे. (2 मे 2014)

Saturday, January 11, 2014

इशारे


आले मिळून सारे
माझे तुझे किनारे


शब्दात काय सांगू,
वाचा नं हे शहारे.


तू चुंबणे जणू कि,
ओठांवरी निखारे.


देतेस माझिया का,
स्वप्नावरी पहारे.


त्या लाघवी स्वरांनी,
घुमती मनी नगारे.


आली उषा कपोली,
हेही पुरे इशारे.


तुज पाहतो बनूनी
मी सूर्य चंद्र तारे
----------
सारंग भणगे. (डिसेंबर २०१३)

Sunday, December 22, 2013

लिलाव

मैत्रीत भेटल्याचा जो हावभाव केला
घेता मिठीत त्यांनी पाठीत घाव केला

माझ्या घरात आले होऊन पाहुणे ते
मजलाच काढण्याचा त्यांनी ठराव केला

मी जिंकलो तरीही राहून शल्य गेले
माझेच दोस्त होते ज्यांनी उठाव केला

आमंत्रणे कशाला देता कलेवराला
'गेल्या'वरी प्रितीचा खोटा बनाव केला

मागावयास आले ते सर्व देत गेलो
सारे विकून आता माझाहि  भाव केला

माझ्या विरोधकांचा त्यांनी विरोध केला
राहीन एकटा हे जाणून डाव केला

कंगाल पार झालो देऊन मी उधाऱ्या
देणेकरीच माझे ज्यांनी लिलाव केला
--------------------------
सारंग भणगे. (22 डिसेंबर 2013)

Saturday, December 21, 2013

आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

माझे सवंगडी ते हा दूर भास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

ह्या गोल जीवनाचा आहे परीघ मोठा
जो ‘आत’ शोध घेतो त्याचाच ‘व्यास’ झाला

होता सभोवताली सारा कुटुंब-कबिला
वाटे तरी ‘अखेरी’ अज्ञातवास झाला

श्रीमंत दालनांच्या दारी उभा भिकारी
ह्या इंडियात ऐसा नंगा-विकास झाला

प्यादे गरीब साधे छळतात त्यास सारे
झालो वजीर जेव्हा त्याचाहि त्रास झाला
========================
सारंग भणगे. (२१ डिसेंबर २०१३)

Tuesday, December 17, 2013

आता असेच व्हावे

सारेच कोसळावे आता असेच व्हावे
कोणास ना टळावे आता असेच व्हावे

माझ्या कलेवराला जाळून त्या झळांनी
थोडे तुम्ही जळावे आता असेच व्हावे

ह्या एकटेपणाची शिक्षा दिली जयांनी,
त्यांना हि ते छळावे आता असेच व्हावे

वैषम्य हेच की ते माझ्याच आतड्याचे
हे त्यांसही कळावे आता असेच व्हावे

ना मारले कि त्यांनी मज तारलेहि नाही
निष्क्रिय पाघळावे आता असेच व्हावे

(आहे पतंग वेडा माझ्याच मी दिव्यांचा
माझ्यात मी जळावे आता असेच व्हावे)
---------------------------------------------

सारंग भणगे (१६ डिसेंबर २०१३)

Wednesday, November 13, 2013

एकटी मी

काळजाचे काठ मोडू पाहते
दुःख ओसंडून गाली सांडते
 
ह्या जगाने बंध सारे तोडले
एकटी मी सावलीशी भांडते
 
वेदनांच्या पाहुण्यांचा राबता
आसवांच्या सोबतीने राहते
 
मज पुरावे वेदनांचे मागती
मी कुठे काही कुणाला मागते?
 
कोरडे आभाळ आहे फाटले
पापण्यांशी स्वप्न धागे जोडते
 
प्रेयसी की भोगदासी ना कळे
नागव्या दुःखासवे मी झोपते
 
लाभले ना सौख्य देवाजी मला
तेच दिधले तू मला जे झेपते
 
आप्त अस्तित्वासही नाकारती
जीवनाचे मीच थडगे बांधते
 
गाव माझ्या भावनांचा जाळला
वेस आयुष्या तुझी ओलांडते
------------------------------------
सारंग भणगे (ऑक्टोबर २०१३)

Sunday, October 27, 2013

दुःख


ऐकण्या पुरतेच त्याला चाहते,
दुःख माझे मूक होऊ पाहते.

काळजामध्ये कट्यारी खोवल्या,
भावना रक्तात माझी नाहते.

गर्भ माझा वेदनांनी अंकुरे,
आसवांचे मूल डोळी वाहते.

दु:ख आहे पोरके माझ्यापरी,
प्राण माझा होऊनी ते राहते.

द्रौपदीचा वारसा माझ्याकडे,
पंचप्राणांच्या चुकांना साहते.
------------------------------------
सारंग भणगे (ऑक्टोबर २०१३)
 

Sunday, June 16, 2013

केतकीचे अंग माझे गंधवेडा नाग तू

केतकीचे अंग माझे गंधवेडा नाग तू
मार्ग तो मी ज्यास नाही थांग त्याचा माग तू
 
जेवढा तू राधिकेचा गोपिकांचा तेवढा,
मी फुलांचा ताटवा अन ताटव्यांची बाग तू

गुंतलेले केस माझे सोड रे तू मोकळे,
छेड तारा कुंतलांच्या आळवूनी राग तू

पाहते मी स्वप्न ज्याचे मी तयाची चंद्रिका
एकमेका पाहण्याला झोपते मी जाग तू.

घे सुखाचा घास तू अन मी उपाशी दु:खिता
ताट माझे जेवताना पाहिजे तर माग तू.
==========================
सारंग भणगे. (२ मार्च २०१३)

Friday, December 21, 2012

एकदा तरी

पडेल का हवे तसेच दान एकदा तरी?
जमेल का कधी गझल महान एकदा तरी?
 
सखे, तुझ्या मनास जिंकण्या विडाच घेतला,
तुझ्या मुखात रंगु देत पान एकदा तरी.
 
पिऊन रूप चांदणे अवीट लाघवी तिचे,
अता तरी मिटेल का तहान एकदा तरी.
 
प्रदीर्घ रात्र वाटते तुझ्या विना मला प्रिये,
कुशीत ये नि वाटु दे लहान एकदा तरी.
 
अखेर रंगलीस तू कवेत माझिया सखे,
घडेल का असे खरे निदान एकदा तरी.
==========================
सारंग भणगे. (२० डिसेंबर २०१२)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...