Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Saturday, July 23, 2022

एकांताचा ध्यास असावा एकाकीपण सोडून द्यावे

असू दे देव्हारा शब्दांचा गाभारी पण मौन असावे


प्रेम नसावे कुणावरही प्रेमावरती प्रेम करावे

आनंदावर सारे करती दुःखावरही खूप करावे


देण्यासाठी जन्म आपला दातेपण पण देऊन जावे

देणे म्हणजे गतजन्मींच्या थकीत ऋणांचे बस् परतावे


कधी व्हावे शहर आपण कधी परंतु अरण्य व्हावे

बंध जुळावे अनेकांशी तरी अंतरी अनन्य रहावे


कुणीच आपले नसेल तेव्हा आपण कुणाचे होऊन जावे

धरा-नभाने दूर सारता क्षितीजवासी होऊन जावे


असेल भंगुर क्षणेक जीवन इंद्रधनुसम दिसून जावे

असे जगावे कि जगण्याने मरणालाही अश्रू फुटावे.

============================


  • सारंग भणगे (२६ जून २०२२)

Sunday, May 17, 2020

जीवनधारा

किती दूरचा प्रवास आहे
नदीस माहित नाही
सारे अंतर पळे निरंतर
शेवट शोधत नाही

दोन किनारे फुलवित जाणे
असा ध्यासही नाही
पांथस्थांची तृषा भागवू
अशी आसही नाही

शुष्कपणाचे दु:ख तिला ना
तरी ‘कोरडी’ नाही
जिते बुडवते; प्रेत तारते
म्हणून ‘तिरडी’ नाही

‘वाहत जाणे’ इतके करते
नदधर्माचे पालन
‘जीवन’धारा म्हणजे असते
निजकर्माचे वाहन
============
सारंग भणगे (१७ मे २०२०)

Tuesday, April 14, 2020

जागृती


अंतरात ज्ञानाला आरपार शोधावे
कोपरे नि कंगोरे तास तास तासावे
आतल्या निनादांचे शांत सूर ऐकावे
धाडतील स्वत्वाचे देवदूत सांगावे

बाह्यरूप विश्वाचे मोहलिप्त छायेचे
पांघरूण आत्म्याला नाशवंत कायेचे
पारतंत्र्य देहाचे जाणताच तू होशी,
मुक्त दूर जावोनी रागरंग मायेचे

दे मला अशी भक्ती दूर सार आसक्ती
ना अहं असूया वा वासना कि अतृप्ती
अमृतस्य पुत्रोऽहं हेच ब्रीद गुंजावे
आत्मलीन होण्याची दे असीम तू शक्ती
========================
सारंग भणगे (१४ एप्रिल २०२०)

Sunday, March 29, 2020

शांत तेवते मनात वात एक मंदशी

शांत तेवते मनात वात एक मंदशी
आत सांडता प्रकाश होय हर्ष मानसी
शांतता निनादता मनास स्थीरता मिळे
विश्व जाणते अशा नरोत्तमास तापसी

ज्ञान ग्रंथ वेद वाक्य ज्ञात त्यास देव ना
वेसणात बांधतो तरी विकार वासना
वेष्टनात बांधले शरीर तुच्छ मानतो
साधना उपासनेत खर्च सर्व चेतना

चित्त फाटते कधी बघून दीनदु:खिता
काळजातुनी फुटे अपूर्व काव्यसंहिता
सार साधनेतले सुबोधवाक्य सांगतो
शब्द त्यास की म्हणू जणू अमोघ अमृता

वाढताच व्यग्रता अलिप्त होउनी बसे
कूर्मतत्व बाणुनी सुषुप्त तृप्त होतसे
आत्मभान जागतां अनेक दीप पेटती
अंतरातला प्रकाश सर्वदूर जातसे
======================

सारंग भणगे (२९ मार्च २०२०)

Saturday, February 9, 2019

काळीज वीणा राग आळवे प्रसन्नतेचे भल्या पहाटे

काळीज वीणा राग आळवे प्रसन्नतेचे भल्या पहाटे
फूल उमलते मनात माझ्या उरात जरीही काही काटे

कधी तंडलो सुह्रदांसोबत ह्याची आहे मनात खंत
क्षण जाता तो मनात बघतो सर्वांठायी पण भगवंत
रुसव्या फुगव्यांना मग देतो दूर दिशांचे विभिन्न फाटे

कधी काळजी कधी व्यग्रता कधी असूया कधी कामना
रोजच होतो ह्या सर्वांशी अटीतटीचा व्यर्थ सामना
नियती आणि आनंदाचे जमवून देतो साटेलोटे

कितीही खावे तरीही असतो अजून जाणे कसा उपाशी
आसक्तीची सक्ती असली खावे वाटे फक्त तुपाशी
भरल्या पोटी प्रयत्न करतो भरण्याचा मी इतरांची पोटे

विराट व्हावे; कलाम व्हावे; व्हावे वाटे कुसुमाग्रजही
बरीच स्वप्ने पहात जातो जरा ओढता रात्री रजई
त्या स्वप्नांना ध्येय मानूनी चालू लागतो भल्या पहाटे
———————————————

सारंग भणगे (९ फेब्रुवारी २०१९)

Friday, February 8, 2019

नसेल माझ्या शब्दात आज
कवितेची ताकद
किंवा
नसेल माझ्या कवितेला
आशयाचा गर्भ
किंवा
नसेल माझ्या आशयात
प्रतिभेचे वीर्य,
पण
मी आजही आहे
वेदनांनी प्रेग्नंट

- सारंग

Tuesday, November 27, 2018

मी पोहत पोहत गेलो

मी पोहत पोहत गेलो ती वहात वहात गेली
मी अंतर कापत गेलो ती निवांत नहात गेली

मी खोलीत रहात होतो
ती खोलात रहात होती
मी सुखात दु:खी होतो
ती दु:खात सुखी होती

मी वाटेत पहात गेलो, ती वाट पहात गेली
मी अंतर कापत गेलो ती निवांत नहात गेली

मी बाहेर शोधत होतो
ती माझ्याच आत होती
मी तिला आळवित होतो
ती मलाच गात होती

मी तिच्यात बुडून गेलो ती मला तारून गेली
मी अंतर कापत गेलो ती निवांत नहात गेली
========================


सारंग भणगे (२६ नोव्हेंबर २०१८)

Friday, November 23, 2018

गेली कुठे कळेना

मी शोधले तिला पण गेली कुठे कळेना
खोदूनही स्वत:ला माझ्यात ती मिळेना

वाहे प्रवाह त्याचे का कोरडे किनारे
बर्फाळ होत गेले का पेटते निखारे
आक्रोश हा कसा कि अश्रूही ओघळेना

अस्ताचलास गेला अंधार फार झाला
नाही उजाडले पण जाळून काळजाला
जात्यात चंद्र आहे पण चांदणे गळेना

गेली युगे परंतु शिशिरास अंत नाही
झडलो अपार तरीही मातीत ऊब नाही
आयुष्य पेरले पण माझ्यात ती रुळेना

शब्दाविना मी रंक अर्थाविना भिकारी
खात्यात दु:ख वाढे अश्रूंची अन् उधारी
अगणित ती मी शून्य बेरीज ही जुळेना
=====================
सारंग भणगे (२३ नोव्हेंबर २०१८)


Monday, November 19, 2018

कधी कधी खूप खूप ओकंबोकं वाटतं

कधी कधी खूप खूप ओकंबोकं वाटतं
मोठ्या मोठ्या खोलीमध्ये छोटं छोटं वाटतं
कंदीलाची काचदेखील काळी काळी होते
मनामध्ये दाट दाट धुकं बिकं दाटतं

पागोळ्यातून डोळ्यांच्या थेंब थेंब गळतात
उंबऱ्याकडे ओठांच्या भराभरा पळतात
गालावर दु:खाचे शेवाळे वाळत जाते
ओले होऊन देखील ओठ गाल डोळे जळतात

काळंनिळं होतं मन वळबिळ उठतात
आतड्याचे पीळ सारे घट्ट घट्ट होतात
मन मात्र अजूनही मऊ मऊ असते
आठवणींचे काटे त्यात खोल खोल रुततात

कुणी कुणी नसावं एकटं एकटं असावं
आठवणीत कुणाच्या उगा कुढत बसावं
एकांताच्या सुईत एकाकीपण ओवून
थोडं थोडं उसवावं थोडं थोडं शिवावं
=======================
सारंग भणगे (१९ नोव्हेंबर २०१८)





Thursday, October 4, 2018

मन देखील चिरता येतं

पोळलेलं असतं खूप
कुणी फुंकर मारणारंही नसतं जवळ
तेव्हा...
रडू सुद्धा येत नाही आजिबात

काळीज फाटलेलं असतं
आभाळाहून अधिक
एकटं बसून रहातं खोपटामध्ये
जवळ गेलं तर फिस्कारतं
दुरून पाहिलं तर...
ओक्साबोक्शी रडतं,
एकांतात

विळीवर कांदा चिरावा सहज
मन देखील चिरता येतं तसं
पाकळी पाकळी वेगळी होते
पाणी येतंच तेव्हा डोळ्यातून

एकदा भांडीकुंडी मांडायची 
मनाच्या साऱ्या वेडगळ स्वप्नांची
खूप वेळ खेळून
मग लाथाडून मोडून टाकायची
त्याला कळतं तरी...
मांडायचं ते सारं मोडायचं असतं

शेवटी होडी करून मनाची
द्यायची सोडून
पावसाच्या...आसवांच्या पाण्यात
आणि पहात बसायचं तिला वहात जाताना
ओली होऊन.... मोडून जाईस्तोवर

- सारंग भणगे (२ ऑक्टोबर २०१८)

Saturday, July 7, 2018

वैराण उन्हाळा होता


वैराण उन्हाळा होता पाऊसही मुबलक होता
मी पीक घेतले तेव्हा तो ढगाळ नुसता हसला
हे ऋतूत रुतून बसणे का ह्याला म्हणती जगणे
मी फुलवीत बक्कळ गेलो तो सुकवीत सगळे बसला
व्यापारी व्यापामध्ये मधसंचय झाला किंतु
जगण्याचे झाले पोळे, पोळ्याचा बैल मी झालो
वस्तूंशी सलगी माझी दरवेळी वाढत गेली
मी फुग्यास फुगवीत गेलो कि तुरुंग सजवीत गेलो

अभ्यास मी भरपूर केला पदवीच्या सुरळीसाठी
जीवनही गमले नाही मन कशात रमले नाही
वाल्मिकी नाही कळले चार्वाकही नाही रुचला
वेदांशी जुळले नाही देवांशी जमले नाही

दु:खाशी जडली प्रीती मग लिहल्या गयाळ कविता
शब्दांच्या गुंत्यामध्ये आनंद साजरा केला
माझ्यातच गुरफटलेलो ते सोडवण्यातच रमलो
जे सोडवले त्याचाही मी पुन्हा कासरा केला

दूरस्थ दिव्यांच्या संगे आयुष्य एकटे सरले
सरणावर चढल्यावरती रडण्यास्तव जमले सारे
मी जगण्यावरती रुसलो अन् आकाशाला फसलो
प्रेमाने जगलो असतो तर भूवर असते तारे
===========================
सारंग भणगे (७ जुलै २०१८)

Sunday, May 6, 2018

शहर

लांब हात करून
Pout काढून
चेहऱ्यावरचे स्माईल ताणून
जेव्हा त्या शहराने एक सेल्फी काढला
तेव्हा ते गाव त्याच्यावर लट्टू झालं!
कसलं cute दिसत होतं ते शहर

त्या उंच इमारती
ते चकचकीत माॅल्स
देवळांची झगमगीत रोषणाई
कॅफेज-रेस्टो-बारस् मधली चहल-पहल
काळे निगरगट्ट रस्ते
रस्त्यावर तशीच माणसे; माणसेच माणसे...
धूर ओकणाऱ्या मोटरगाड्या
हाॅर्नचा गोंगाट
सिगारेटची थोटक
पानाच्या लालभडक पिंका
दारूच्या फुटलेल्या बाटल्या
आणि दारूड्यांची फुटलेली नशीबं
उंची पोशाख; त्यातली पोकळ शरीरं
शरीरांचे बाजार; बाजाराच शरीर
नोटांची बंडलं; चिमुरड्यांचे भुकेले हात
ओला कचरा, सुका कचरा
कचराच कचरा; नुस्ता कचरा....

आणि सर्वात शेवटी दिसला
तट्ट पोट फुगलेला, फॅब इंडियाचा कुर्ता घालून
एका कलादालनाच्या मंचावर
एक मनस्वी कवी
शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कविता ऐकवत होता
टाळ्या, वाहवा, मुकर्रर once more घेत
तेव्हा...

तेव्हा त्या गावाला शिसारी येऊन
ओकारी झाली,
आणि त्याच्या त्या ओकारीतून निर्माण झालं


एक नवीन सुबक शहर!!!
  • सारंग भणगे (५ मे २०१८)

Monday, March 12, 2018

एकाकी पिंपळावरचे



एकाकी पिंपळावरचे
आयुष्य जाहले मुंजा
आनंद फुलोरा झडला
मागे दु:खाच्या गुंजा

निर्वृक्ष अरण्यामध्ये
आकांत मुक्या जखमांचा
निर्हेतुक पण चुरगळला
पाचोळा आनंदाचा

निष्पर्ण मनाने जेव्हा
स्वप्नात पाहिले पाणी
आनंदघनाला फुटली
दु:खाची केविलवाणी

सोशिक मुळांना वाटे
आता न जरा थांबावे
मातीत स्मृतींच्या आता
हळुवारपणे पांगावे
==============
सारंग (८ मार्च २०१८)

Thursday, January 18, 2018

"वसुधैव कुटुंबकम"

हमादच्या सीरियान वाळवंटातली वाळू
आता भिजू लागली आहे,
लाल भडक रंगाचे पाणी पुरवल जातंय
रियाधहून; तेहरानहून; दोहाहून; 
अंकारा; बगदाद; काबुल आणि अगदी वाॅशिन्गटनहून सुद्धा

आणि ह्या तांबड्या सिंचनातून
तिथे उगवली आहेत 
आलेप्पोच्या संस्कृतीला हडप करणारी
लसलसत्या जिव्हांची वारेमाप रोप

अदेनच्या आखातात धुमसत आहेत
रक्त-मांस गिळंकृत करायला अधीर असलेले कैक भस्मासुर
पेटलेले बगदाद, मोसूल; श्रीनगर आणि राखाईन 
राख राख होण्यासाठीच जणू आ वासून बसलेले;

आणि सोमालिया आणि वेनेझुएलाचे भूकबळी 
मृत्युच्या जातक भुकेचे बळी होण्यासाठी आसुसलेले....

गोलन टेकड्यांवर विखुरले आहे 
आभाळाने दिलेला हिरवा रंग पुसून
मानवाने दिलेल्या अमानवी लाल भडक रंगाचे कुरण

सोल आणि टोक्यो धरून बसलेत जीव मुठीत
प्योंगयांगने त्यांच्यावर नेम धरून
धनुष्यावर चढवलेला आण्विक तीर 
कधी सुटेल ह्याचा नेम नाही, ह्या भीतीने

चंगेझ; तैमुर; तुघलक; खिल्जी पासून 
हिटलर; स्टालिन; माओ; गद्दाफी; इदी अमीन 
ओसामा; बघदादी आणि अल असद पर्यंत
पृथ्वीच्या पाठीवर उमललेल्या संस्कृतींना
मृत्युच्या कराल दाढात ढकलणाऱ्या
विकृतींवर मात करत,

हिमाचलच्या उत्तुंग कड्यावर
एक निर्वस्त्र योगी ध्यानमग्न अवस्थेत
उच्चारण करत बसला आहे;
"वसुधैव कुटुंबकम"  
"वसुधैव कुटुंबकम"
=====================
सारंग भणगे (७ जानेवारी २०१८)

मन बैरागी

कुटुंब कबिला नको काफिला मस्त जगावे आनंदाने
गगनाखाली जगणाऱ्यांवर प्रेम करावे प्राणपणाने

मन बैरागी माझा कोणी ना नात्याचा ना गोत्याचा
मायबाप त्या फांद्या बुंधा जिथे झोपलो त्या झाडाचा

कुटुंब होऊन जाते माझे पळभर घेतो आश्रय ज्यांचा
मी तर आहे ह्या प्राण्यांचा त्या पक्ष्यांचा फुलाफळांचा तृणपात्यांचा

ओढा व्हावे आयुष्याने ओढ नसावी वहात रहावे
तुडुंब पाणी पितात त्यांचे नकळत आपण कुटुंब व्हावे

अंतर जरीही कितीही असले तरी नसावे मनात अंतर
दिगंतराचा होऊन जा तू ह्या विश्वावर माया अंथर
================================

सारंग भणगे (१८ जानेवारी २०१८)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...