"मराठी कविता" समूहाच्या 'प्रसंगावरून गीत' या उपक्रम अंतर्गत
(रोमा)
नदी सागराची गळाभेट घेते; पुन्हा वेगळे न होते कधी ती I
जरी खारटा हा संसार होतो; अंतरी तरीहि असतात मोती II धृ II
आकाश भेटी आतुर झाले; अहंकार ओढी पतंगास मागे,
स्वप्नात माझ्या दिसशी जरी तू; डोळे रहाती उद्दाम जागे.
मी एकटी या वैराण वाटी; जरी सोबती ते असती सभोती II १ II
(आशुतोष)
नदी सागराची गळाभेट घेते; पुन्हा वेगळे न होते कधी ती I
जरी खारटा हा संसार होतो; अंतरी तरीहि असतात मोती II धृ II
बुडत्यास असते आधार काडी-, -मोडून; आलो अंधारवाडी,
मी काजळीचा सम्राट झालो; अंधार मजला बुडवून काढी.
पेल्यातल्या मी वादळी बुडालो; मी फाडले शीड माझ्याच हाती II २ II
(दोघे)
नदी सागराची गळाभेट घेते; पुन्हा वेगळे न होते कधी ती I
जरी खारटा हा संसार होतो; अंतरी तरीहि असतात मोती II धृ II
=============================================
सारंग भणगे (५ जुलै २०११)