निबीड वनातून कोण चालले काजळ भरल्या अपरात्री
लगिन लावण्या कोंढाण्याचे मर्द निघाले शुभरात्री
धडधडणा-या ह्र्दयरवाला संगत भणाण वा-याची
ढोलीमधले घुबड सांगते काळरात्र ही वै-याची
भिरभिर फ़िरते पाकोळी अन् पाल चुकचुके शंकेची
दूर आरडे टिटवी वाटे थापच पडली डंक्याची
उभा ठाकला कभिन्न कातळ मृत्यूघळ ही खोल दरी
डोळ्यामधल्या अंगाराने लख्ख उजळल्या
समशेरी
सरसर चढले अवघा कातळ घोरपडीच्या कसबाने
स्वातंत्र्याचा वन्ही घेऊनि चेतविला जो शिवबाने
'हरहर हरहर महादेवची' सिंहगर्जना दुमदुमली
तलवारीची निर्भीड पाती ढालीसोबत
खणखणली
झपकन् फ़िरले खड्ग उडाली गर्दन निर्दय यवनाची
श्रीरामाचे कपीकटक हे लंका जाळी रावणाची
फ़णका-याने फ़ुत्कारीत आला शत्रुदेखिल त्वेषाने
फ़णा काढूनी फ़ुसफ़ुसले ते फ़ुरसे फ़ुसके द्वेषाने
भिडले गजवर मत्त प्राशूनी मदिरा विजयोन्मादाची
तलवारीच्या स्फ़ुल्लिंगातूनी चाळण उडते देहाची
शेल्यावरती झेलून घेतो खड्गाचा जो घाव पडे
भानुसंगे वैर मांडले युद्ध पेटले चोहीकडे
थडथडणा-या धमन्यांमधुनी डोंब उसळले रक्ताचे
प्राण चढविले वेदीवरती स्वातंत्र्याच्या भक्ताचे
रूधिर आता अधीर झाले चिळकांड्यातूनि फ़ुटण्याला
प्राणपाखरू सिद्ध जाहले कायाकोटर सुटण्याला
वर्मी बसला घाव घणाचा बुंधा चिरला वृक्षाचा
देवदार तो कोसळताना शब्द मागतो लक्ष्याचा
अस्मानाचे ह्र्दय फ़ाटले काळिज उलले धरतीचे
सागरह्र्दयी उधाण आले अश्रू उठले भरतीचे
फत्ते केला किल्ला त्यावर भगवा झेंडा फ़डफ़डला
'सिंह देऊनि गड मिळविला' अवघा मावळ गदगदला
=======================================
सारंग भणगे. (जानेवारी-फ़ेब्रुवारी 2009)
No comments:
Post a Comment