Wednesday, January 8, 2014

छंद आणि वृत्तबद्ध कविता


हे सर्वमान्य आहे कि कविता लिहित असताना, किंबहुना कुठलेही लेखन करत असताना, त्याचा मुख्य गाभा हा त्याचा आशयच असतो. कवितेपुरते विचार करायचे झाले तर आशय अर्थात काव्य हेच कवितेमध्ये आवश्यक आहे. एकदा कवितेमध्ये काव्य आले; आशय आला कि ती कविता म्हणून मान्य होते; झालीच पाहिजे.

 

परंतु जसे प्रत्येक कलेला एक शास्त्र आहे तसेच काव्य ह्या कलेला देखील आहे. कुणी गाणे शिकला नाही म्हणून त्याने गाऊ नये असे मुळीच नाही. पण जर खरोखर रीतसर गाणे गायचे असेल तर गायनकलेच्या शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. तसेच नृत्याचे आहे, चित्रकलेचे आहे. तद्वतच कवितेचे देखील आहे. अर्थात मला असे म्हणायचे आहे आणि ते माझे मत देखील आहे कि कुणी छंद - वृत्त यांचा अभ्यास न करता कविताच करू शकत नाही किंवा करू नये असे नाही. परंतु एखादी कला परिपूर्ण उतरवायची असेल तर स्वाभाविकपणे त्या कलेच्या शास्त्राचा अभ्यास करून, ते आत्मसात करून शास्त्रोक्त पद्धतीने ती कला सादर केली गेली तर ते अधिक उत्तम.

 

हे लिहित असताना आणखी एक पैलू किंवा विचार मनात आला. इतर कालांहून काव्य ह्या कलेचा मानवी मनाशी अधिक जवळचा सबंध आहे. मुळातच काव्य, गद्याहून देखील अधिक, अभिव्यक्ती (केवळ व्यक्तता नव्हे!) म्हणून निर्माण झालेली कला आहे. त्यामुळे काव्य हे निव्वळ कलेपेक्षा देखील अधिक काहीतरी आहे. हा पैलू विचारात घेता जर काव्य हे केवळ आपल्या मनातील भावना किंवा व्यक्त करण्यासाठी वापरलेले असेल तर मी म्हणेन ते उत्स्फुर्तपणे हव्या त्या पद्धतीने येऊ द्यावे. परंतु कुठल्याही गोष्टीला 'व्यक्त होणे' असे लेबल लावून काव्यशास्त्राकडे दुर्लक्ष करणे मात्र चुकीचे आहे. अशा प्रकारे व्यक्त होत असताना आपण खरोखर किती प्रामाणिक असतो ह्याचे आपण आत्मपरीक्षण करणे जरुरी आहे. एवढेच नाही, तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा व्यक्त व्हायचे असेल आणि त्यासाठी कवितेचा आधार घेतला असेल, तर ती कविता जगासमोर मांडलीच पाहिजे का ह्यावर बारकाईने विचार करून मगच ती तशी जगासमोर मांडवी; अन्यथा ती व्यक्तता केवळ आपल्यापुरती सीमित ठेवली तरी काय हरकत आहे!

 

छंद आणि वृत्त यांच्यामध्ये एक अंगभूत सौंदर्य असते. माझ्या मते ते सौंदर्य कवितेचे सौंदर्य फुलवायला पूरक असते. मग मुळातच सुंदर असलेली कविता जर छंद-वृत्तांचे सौंदर्य घेऊन येत असेल तर मग आपल्या कवितेला ह्या शास्त्रोक्त सौदार्यापासून वंचित का ठेवायचे! मध्यंतरी विचार करत असताना माझ्या मनात ह्या विषयावर असा विचार आला कि कविता हि एखाद्या सुंदर स्त्रीसारखी आहे असे मानले तर छंद-वृत्त हे त्या कवितेची वस्त्रे आहेत, अलंकार अर्थातच त्या स्त्रीने परिधान केलेले दागदागिने आहेत. म्हणजे कविता पूर्ण नटवायची झाली तर त्या कवितेमध्ये आशयाचा आत्मा, काव्याचे शरीर, छंद-वृत्तांची वस्त्रे, अलंकारांचे दागदागिने हे सर्वच पाहिजे. (पूर्वी कुठेतरी असेही लिहिले होते कि कवितेला भावनांचे अन्न; शब्दांची वस्त्रे; आणि कल्पनेचा निवारा लागतो, असो!) हा विचार माझाच असला तरी मला अतिशय समर्पक वाटतो. अर्थातच आशयाविना कविता म्हणजे मृत शरीर! आशयाकडे सर्वप्रथम ध्यान दिलेच पाहिजे. परंतु आशयाने समृद्ध अशी कविता जर छंद-वृत्त ह्यांच्या शिवाय असेल तर ती अनावृत्त माणसासारखीच असेल असे वाटते. अनावृत्त; अर्थात वस्त्रहीन किंवा नग्न माणूस हा काही मनुष्य नसतो का? असतोच, तद्वतच वृत्तविहीन कविता हि देखील कविता असतेच, परंतु ज्याप्रमाणे आदिम काळात कदाचित अनावृत्त राहणाऱ्या मनुष्याने वस्त्रांचा केलेला स्वीकार हा सांस्कृतिक विकासाचे लक्षण मनाला जातो, तद्वतच कविता जर छंद-वृत्त यासहीत असली तर ती अधिक सुसंकृत होईल असे म्हणणे आज घडीला थोडे धारिष्ट्याचे होईल, पण वावगे ठरणार नाही, असे वाटते!

 

छंदोक्त काव्य लिहिताना एक वेगळाच आनंद मिळतो हे मी स्वानुभवाने सांगतो. मी सुरुवातीपासून छंदमुक्त लिहित आलो कारण माझा वृत्त-छंद यांचा अभ्यास नव्हता. परंतु जसे जसे वृत्त समजू लागले आहे तसे काही वृत्तांमध्ये लिहिताना एक वेगळा आनंद मिळू लागला आहे. हा आनंद एखाद्या काव्याच्या निर्मितीहून अधिक मोठा नाही, परंतु काव्यनिर्मितीच्या स्वानंदाबरोबरच शास्त्रोक्त काव्यनिर्मिताचा आनंद देखील मिळत असेल तर तो निश्चितच केशर-कस्तुरी योग म्हटला पाहिजे आणि असा दोन्हीचा आनंद घेण्याचा प्रयत्न सर्वांनी निश्चित केला पाहिजे.

 

कला हि उपजत असते. ती प्रत्येकाच्या प्रतिभेतून निर्माण होते. परंतु शास्त्र हे अभ्यासावे लागते, अंगी बाणवावे लागते; आत्मसात करावे लागते. अर्थात, शास्त्र आत्मसात करणे ह्यासाठी प्रयत्न लागतात, कंटाळ्यावर मत करावी लागते, ती एकप्रकारे साधनाच असते. हि साधना काही एका दिवसात किंवा महीन पंधरा दिवसात साध्य होत नाही, त्यासाठी महिनोन महिने, वर्ष; कैक वर्ष द्यावी लागतील. ती देण्याची आपली तयारी सहसा नसते. ह्या साधनेच्या कंटाळ्यानेच आपण आपण तशाच कविता करत राहतो.

 

ह्या अनुषंगाने एक मुद्दा आणखी स्पष्ट करावा वाटतो कि छंद-वृत्त हे एकप्रकारे शास्त्र असल्याने कविता करण्यामध्ये त्यांचा अनेकदा अडथळा होतोच. कितीही अभ्यास केला, साधना केली, तरीही छंद-वृत्ताचे भान पाळत केलेली कविता हि कुठेतरी किंचितमात्र का होईना तडजोड स्वीकारूनच होते. अर्थात ह्या काव्यशास्त्राच्या नियमांनुसार कविता लिहिणे हि देखील एक कलाच आहे किंवा काव्य ह्या कलेचेच एक अंग आहे. परंतु जेव्हा शास्त्र आणि कला ह्यात निवड करायची वेळ येईल तेव्हा मी तरी कलेची निवड करेन. म्हणजेच जिथे एखाद्या विषयाची किंवा एखाद्या वेळी अभिव्यक्तीमध्ये हे शास्त्र अडथळा निर्माण करत असेल आणि त्यातून त्या अभिव्यक्तीचा मूळ आशय, विषय, विचार, भाव-भावना ह्याच हरवून जात असतील; किंवा ते काव्य कृत्रीम किंवा रसहीन होत असेल, तर त्या शास्त्राला अनुसरूनच कविता लिहिली जाणे ह्याचा पुरस्कार करणे चुकीचेच ठरेल, अशी ठाम खात्री मला वाटते. तसेच ह्या शास्त्राच्या पाठीमागे लागल्याने आपल्यातील काव्यकला हरवत जात आहे असे वाटले तर वृथा त्याच्या मागे लागावेच असेही नाही. परंतु असा निर्णय घेण्याआधी अनेकवार त्याची सखोल परीक्षा घेतली पाहिजे आणि जर मूळ कलेला; कलेच्या गाभ्यालाच धक्का पोहोचत असेल, तरच ह्या काव्यशास्त्राचा अभ्यास सोडता येईल. परंतु हे म्हणत असतानाच जो सच्चा कवी असतो त्याला हे शास्त्र आत्मसात करून आपल्यातील काव्य जपता येईल किंवा आलेच पाहिजे असेही वाटून जाते.

 

ह्या सर्वाचा अर्थ हा कि कवितेचे हे शास्त्र हे कवितेहून अधिक मोठे नसून, ते कवितेला केवळ पूरक आहे; असले पाहिजे. अन्यथा ज्याप्रमाणे पंतकवितेची सामान्यजनाशी नाळ साधली गेली नाही, तद्वतच कदाचित शास्त्र आणि नियमांच्या आग्रहाने कवितेशी असलेली नाळ तुटू शकते. म्हणजेच कवीने एखादी कविता हि कुठल्या प्रकारे लिहिली गेली पाहिजे, किंवा लिहिली तर योग्य ठरेल ह्याचा देखील बारकाईने विचार केला पाहिजे, असे वाटते.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...