आजपासून खूप
वर्षानंतर
जेव्हा तू आणि मी
खूप म्हातारे होऊत
कातडी सुरकुतलेली, खरखरीत
झालेली असेल
डोक्यावरचे केस पांढरे, विरळ झालेले असतील
मागचे पाश बरेचसे सुटलेले असतील, आणि
मनातल्या इच्छा कदाचित विरघळल्या असतील.....
तेव्हा आपण भेटू..... कुठेतरी एखाद्या कॅफेमध्ये
आभाळात दोन पांढरे ढग एकमेकांना भेटतात तसे
अगदी नि:संकोच, विनाकारण आणि निरुद्देश
बोलायचे खूप असेल मला
कित्येक वर्षांचे साठलेले
मनाच्या माळावर बेफाम माजलेले
मनाच्या सहाणेवर कित्येकदा उगाळून पुसून टाकलेले
उफाळून वर येऊ पाहील...
पण थरथरणाऱ्या वयस्कर ओठांचा क्रेटर
त्या उद्रेकाला सांभाळू शकणारा नसेल.....
ओलसर डोळ्यांनी, कापणाऱ्या ओठांनी
मी अस्पष्टसं तुझ नाव पुटपुटेन,
कापरं भरलेल्या बोटांनी
तुझ्या बोटांना स्पर्श करेन,
डोळ्याच्या कडातून ओघळ गालांवर सांडतील
मी त्यांना आवरणार नाही, पुसणार नाही,
पुरूष असल्याचे कुठलेही अभिनिवेश न बाळगता!
कित्येक वर्ष डोळ्याआड लपून बसलेले अश्रू;
कि ओठांआड दडून बसलेले शब्द,
त्यांच्यावर मी लादलेल्या मर्यादा सोडून; तोडून
आवेगात धावतील
अन
पागोळ्यातून पाणी टपटपावे तसे
गालावरून वहात वहात
टेबलावरच्या कॉफीच्या कपात पडतील.
दोन घोट कॉफी मी घशाखाली घेईन
क्षणभर डोळे मिटेन
डोळे उघडेन
हलकेच तुझी हातात धरलेली बोटं
प्रेमभाराने दाबेन, आणि...
आल्या पावली
तुझ्या आयुष्याच्या फुलबागेतून
माझ्या आयुष्याच्या अरण्यात
अंतर्धान पावेन....
पुन्हा कधीही न भेटण्यासाठी
पुन्हा कधीही न भेटण्यासाठी!!!