आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची ५१ वी पुण्यतिथी.
सकाळी उठलो तेव्हा ह्याची सुतराम कल्पना नव्हती. WhatsApp वर एका मित्राचा सावरकरांवरचा एक अप्रतिम
लेख वाचला आणि मन थोडे अस्वस्थ होत गेले.
आजवर बरे-वाईट असे थोडेफार लिखाण माझ्याकडून
घडले. त्यात विशेष उल्लेख करावा आणि किंचित का होईना अभिमान बाळगावा असे
शिवरायांवर काही कविता रचल्या गेल्या आहेत.
परंतु सावरकरांविषयी आजवर माझ्याकडून खचितच
काही लिखाण झाले आहे. नाही म्हणायला कित्येक वर्षांपूर्वी 'सागरा प्राण तळमळला' ह्या सावरकरांच्या अतुल्य अजरामर गीतावर मला एक गीत सुचले होते, तेवढेच. हा एक प्रमादच जणू माझ्याकडून घडला आहे अशी खंत
मनात दाटली. अर्थात, सावरकर हे माझ्या सीमित
प्रतिभासामर्थ्याच्या कितीतरी पलीकडचे आहेत ह्याची प्रामाणिक जाण निश्चित मला आहे, परंतु तरीही ह्या तेजस्वी स्वातंत्र्यवीराविषयी असे आतून
काहीच फुटू नये; उफाळून येऊ नये हा
खेद मनाला अस्वस्थ करत राहिला.
गेल्या वर्ष - दोन वर्षात तसेही उल्लेख करावे
असे फारसे लेखन काहीच घडलेही नाहीये. मनातल्या शब्दा-भावनांचा झराच जणू पार आटून
गेला आहे अशी काही विचित्र स्थिती आहे.
आणि अशाच त्या स्थितीमध्ये आज स्वातंत्र्यवीर
सावरकरांविषयी काहीतरी लिहून मनातील त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करावा अशी खरोखर
इच्छा निर्माण झाली. विचार करता करता बरेच
शब्द मनात वाहूनही गेले, परंतु काही लिहायला बसता
मात्र पुन्हा एक शुष्कता, एक उत्स्फूर्त लेखनासाठी
आवश्यक अश्या प्रतिभा स्रोताचा अभाव
प्रचंड खुपू लागला. पण तरीही आज काहीतरी लिहावेच असा निश्चय करून लिहायला बसलोच!
वस्तुतः अपार प्रतिभा लाभलेल्या शब्दप्रभूंचे
साहित्य यत्न देखील थिटे पडावेत येवढ्या विलक्षण उंचीचे हे व्यक्तित्व! एखाद्याची
प्रतिभा सागराएवढी विशाल, असीम आणि सखोल गहन असली
तरीही फेसाळणाऱ्या रौद्र वादळी सागराच्या उत्तुंग लाटा ह्या भूमीवरील यच्चयावत
स्थिराचाराला कदाचित गिळंकृत करू शकतील, परंतु आकाशाच्या पोटात घुसणाऱ्या एखाद्या अडग पर्वतशिखराचे पायच फारतर त्या धुवू
शकतात, तर मग माझी प्रतिभा तर एखाद्या साचलेल्या
डबक्यासारखी, मी त्यांच्याविषयी काय
लिहावे! पण त्या डबक्यात सूर्याचं प्रतिबिंब काही क्षण कधी तरळून जातं, किंवा किमान एखादा कवडसा, अगदी नाहीच तर एखादा किरण त्या डबक्याच्या शेवाळल्या पाण्याला स्पर्श करून
जातो, आणि ते पाणीही उजळून जाते, तेवढा वेळ सोनेरी दिसते आणि मग त्यातून देखील काही
प्रकाशाचे उज्वल कण परावर्तीत होतात...... तेच काही हे वेचलेले कण ....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्यागाची पराकाष्ठा;
अपार अपार अपरिमित असीम निस्सीम निरपेक्ष
निस्वार्थ नि:संग निरंतर त्याग, त्याग आणि त्याग! हेच
त्यांच्या आयुष्याचं सहज वर्णन होऊ शकेल, पण समग्र वर्णन करण्यासाठी कदाचित अनेक ग्रंथ लिहावे लागतील. पण त्याग ह्या त्यांच्या
आयुष्यातील एका पैलूवर आज बोलण्याची गरज आहे. आजूबाजूला दाटत चाललेल्या गंभीर घन
काळोखातून जेव्हा मन निराशेनं घेरलं जातं तेव्हा ज्यांचं आयुष्य म्हणजे एक ज्वलंत
निखारा होतं, आणि ज्यांनी आयुष्यावर
देखील जळजळीत निखारा नि:शंकपणे ठेवला त्या सावरकरांसारख्या मोजक्या
स्वातंत्र्यवीरांमुळे मन पुन्हा एकदा ऊर्जस्वल होतं, मनाला पुन्हा चेतना मिळते; उत्तेजना मिळते.
राष्ट्रप्रेम वगैरे
सारख्या 'मागास' वाटू लागलेल्या आणि चैन-चंगळवादाने बोजड
झालेल्या; गोठून गेलेल्या आपल्या
आयुष्यांना ह्या निखाऱ्याची धग पुन्हा एकदा वाहायला प्रवृत्त करते.
शहीदो कि मज़ारो पर लगेंगे
हर बरस मेले
वतन पर मिटने वालो का यही
बाकी निशां होगा
जन्मठेप मध्ये देखील
सावरकरांनी असेच काहीसे लिहून ठेवले आहे कि त्या अंदमानला लोक तीर्थस्थानासारखे
भेट देतील!
असली काही तरी वेडी
स्वप्न ज्या स्वातंत्र्याच्या वेदीवर हसत मृत्यूला कवटाळणाऱ्या वीरांनी पाहिली.
वेडेच होते ते! देशवासियांना स्वातंत्र्य मिळवून द्यायच्या वेडाने झपाटलेले,
आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण देशवासी
त्यांच्या थडग्यांना तीर्थस्थान मानूत वगैरे स्वप्न पाहण्याचं वेड. देश तुम्हाला
केव्हाच विसरला सावरकर! अहो जिथे थिल्लर विषयांवर चित्रपट काढायला शेकडो निर्माते
एका पायावर तयार असतात, तिथे तुमच्यावर काढायच्या
चित्रपटासाठी देखील केवढा उपद्व्याप करावा लागावा! तुमचं नाव घ्यायला देखील इथल्या
कित्येकांना लाज वाटते. त्यांची मतं कमी होतील ह्याची भीती वाटते. तुमच्यावरचे
भित्तिलेख देखील तुमच्या अंदमानच्या भूमीवरून हलवले जातात, तुमच्या नावाचे इथे अजून राजकारण होते!
तुमचं केवळ आयुष्यच नाही,
तर त्यानंतर आज ५१ वर्ष झालीतरी तुम्हाला तुमचं
स्थान मिळालं नाहीये, मिळणार नाही. एखाद्या
शापित यक्षासारखं तुम्ही जगलात, त्याला उ:शापही नसावा हि
काय दारूण करुण कहाणी आहे हो!
स्थितप्रज्ञतेचे दिव्य
वरदान लाभलेल्या तुम्हाला कदाचित ह्या सर्वांची अपेक्षाही नसेल, परंतु ह्या देशातील मोजक्या लोकांच्या मनात
तुमच्या स्वातंत्र्यकाळातील दधिची त्यागाचे स्मरण चिरंतन राहील, आणि तुमच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्याची
ज्योतही तेवत राहील! असा आशावाद व्यक्त करून तुमच्या पुण्यस्मृतीला आज अभिवादन
करतो!!!
Sarang Bhanage