Wednesday, February 28, 2018

मकस अजिंक्यतारा मेळावा


२००९ सालापासून मकसचे झालेले पुष्कळ मेळावे म्हणजे आम्हा संचालकांसाठी एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो, आणि म्हणूनच मेळाव्याची तारीख जवळ येत जाते तशी उत्सुकता वाढत जाते, तसाच उत्साहही! दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी किमान २-३ मेळावे तर सहजच होऊन जात असत. परंतु, ह्यावेळी जवळपास दोन-अडीच वर्षांच्या खंडानंतर मेळावा आयोजित होत होता.

२५ फेब्रुवारी २०१८, रविवारचा दिवस; ठिकाण कास पठार, सातारा! प्रथमच एवढ्या खंडानंतर होणारा मेळावा; तो ही साताऱ्यासारख्या शहरात जिथे अजून मकसचा एकही कार्यक्रम झालेला नाही, आणि त्याहून म्हणजे तो प्रत्यक्ष शहरात नाही तर कुठे तरी डोंगर-झाडांनी वेढलेल्या परिसरात, आणि आयोजन पाहणारा संचालक देखील नवीन, अननुभवी. सगळंच नवीन आणि वेगळ. अर्थातच मनात एक धागधुग होती कि मेळाव्याला किती कवी हजार राहतील, कार्यक्रम कसा होईल, काही अडचणी येतील का ई. ई.

पण २५ फेब्रुवारीच्या पूर्वसंध्येलाच सुमारे २० लोकांनी मेळाव्याच्या ठिकाणी हजेरी लावली, आणि ह्या सर्व शंका दूर झाल्या. तरीही मेळाव्याच्या मुख्य दिवशी फारतर ५-७ मंडळी अजून येतील अशी अपेक्षा असताना, जेव्हा एकूण संख्या ३७ एवढी उत्साहवर्धक झाली तेव्हा झालेला मनस्वी आनंद एक आयोजकच समजू शकेल. विषयाच्या अनुषंगाने म्हणून इथेच नमूद करू इच्छितो कि जरी आयोजकांनी कितीही सद्भावनेने आणि प्रेमाने एखादा कार्यक्रम आयोजित केला असला तरीही कवींचा सहभाग हा तो कार्यक्रम यशस्वी होण्यातील सर्वात महत्वाचा भाग असतो, हे मान्य केलेच पाहिजे. त्या अर्थाने मकस संचालक मंडळ सहभागी कवींचे खरोखर आभारी आहे!

२४ फेब्रुवारीची पूर्वसंध्या अत्यंत रम्य गेली हे सांगणेच नको! पुष्कळ कालावधीनंतर झालेली परिचित-अपरीचीतांची सहृदय भेट; गप्पांना आलेला उत; अपरिचित देखील काही क्षणातच आपलेसे वाटू लागण्याचा आलेला आनंददायी अनुभव; निवासाचे अत्यंत रम्य असे ठिकाण; जिभेवर कायम चव रेंगाळत रहावी असे चविष्ट जेवण; आनंदने (पेंढारकर) इतक्या लांबून आणलेल्या म्युझिक सिस्टमने वर गायलेल्या सुरेल गीतांनी सुरू झालेली रात्र मैफल; रात्रीबरोबरच चढत गेलेली कवितांची धुंदी; साडेतीन वाजता झोपूनही पहाटे ७ ला उठताना जाणवलेला आल्हाद; सकाळच्या गप्पा, फोटो सेशन आणि मग आवरत आवरत मेळाव्याच्या स्थानाकडे केलेले कूच हे सगळे लिहिण्यासाठी एक स्वतंत्र वृत्तांत लिहिला पाहिजे, पण मुख्य वृत्तांत मेळाव्याचा, म्हणून हा खूप काळ स्मरणात राहील अशा रात्रीचा संक्षिप्त आढावा!

साताऱ्याकडून कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर डॉ. संदीप श्रोत्री ह्यांचे फार्म हाउस आपल्या मेळाव्याचे सुनिश्चित केलेले ठिकाण होते. कास पठार ही आता World Natural Heritage site असल्याने खूपच नावाजली आहे. जरी आत्ता कारवीच्या फुलांचा मौसम नसला तरीही एकूणच संपूर्ण कास पठार परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. एका छोट्या दरीच्या काठी बांधलेली नीटस अशी ती बंगली हे एखाद्या कवी संमेलनासाठी सुयोग्य असेच ठिकाण आहे. आजूबाजूला झाडे-झुडपे; जवळच दरी; चहुबाजूला डोंगर-टेकड्यांनी वेढलेले, असे कुठल्याही कलावंताच्या कलेला स्फूर्ती किंवा चालना देणारे असे सुरेख चित्रमय वातावरण, आणि त्यामध्ये उभी असलेली ती प्रसन्न वास्तु. अंगण ओलांडून गेले कि असलेल्या पोर्चमध्ये बसायची व्यवस्था, समोर २-३ पायऱ्या चढून गेले कि जुन्या पद्धतीचा दरवाजा, त्यातून आत गेल्यावर एक गोलाकार दिवाणखाना; त्याचे उंच सिलिंग आणि सिलिंगच्या मधोमध प्रकाश येण्यासाठी ठेवलेला मोठ्ठा गोल झरोका; दिवाणखाण्याच्या दरीकडील बाजूला दोन पायऱ्या खाली उतरून बसायची अर्धवर्तुळाकार जागा आणि तिथे असलेल्या ३ मोठाल्या खिडक्या, असा एकूण दिमाखदार डामडौल, आणि अशा त्या दिवाणखान्यात भरणारा आपला मेळावा!

नावनोंदणी बरोबर चहा-नाश्ता ह्यांचा आस्वाद घेतल्यानंतर बरोब्बर १०.३० वाजता मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला. विनायकने माईकचा ताबा घेऊन सर्वप्रथम दीपप्रज्वलन आणि गणेशपूजन समूहातील ज्येष्ठांच्या हस्ते झाले. त्यानंतर विनायकने मेळाव्याची रूपरेषा थोडक्यात सांगून पुढील सूत्रे राजेशकडे सुपूर्त केली.

पहिला कार्यक्रम हा मंचीय काव्यसदरीकरणाचा होता. राजेशने सूत्रसंचालन केलेल्या ह्या बहारदार कार्यक्रमात सहभागी झालेले कवी होते – तुषार जोशी, पूजा भडांगे, मिता लोणकर; मिनिष उमराणी; आणि प्रीतम गाडगीळ. प्रत्येकी दोन कविता एकापाठोपाठ सर्व सहभागी कवींनी सादर केल्या. तुषार संचालक असूनही इतके वर्षात प्रथमच मेळाव्यातील मंचीय कार्यक्रमात दिसला, तर प्रीतम; मिता ह्या प्रथमच कुठल्याही काव्यमंचावरून कविता सादर करत होत्या. सकाळच्या उत्साही वातावरणात कवितांचे तुषार अंगावर पडू लागले ते तुषारच्याच ‘ओठांवर तीळ कसला’ ह्या तरल प्रेमाकाव्यातून, कि जे त्याने त्याच्या खास तुष्की शैलीत गाऊन सादर केले. श्रोत्यांची मने त्यावर डोलू लागली, कि पाठोपाठ ‘काळोखाचे अस्तर लावून रात्र विणूया आपण’ किंवा ‘शिकून घेऊ सूर्यफुलांची अल्लड भाषा’ अशा प्रासादिक काव्यमय निसर्गवर्णनाने भरलेल्या पूजाच्या कवितेने सभागृह भारावून गेले. तिच्या जवळपास प्रत्येक ओळीला वाह मिळत गेली. त्यानंतर मिताच्या ‘सावळ्या मेघातळी मी पेरलेले बीज आहे’ किंवा ‘कोरड्या रेतीत अश्रू गाळणे हे ठीक नाही’ अशा ओळी रसिकांची दाद घेतानाच त्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेल्या. ‘सहजच फांदीवर बसले काही तसे शब्द सुचले’ किंवा ‘वाट हरवले कुणी तान्हुले, तसे शब्द कवितेस बिलगले’ अशा हळव्या ओळीतील ओल मनामनांना स्पर्शून गेल्या, तर प्रितमच्या ‘इरकली कंचुकी बघ दंडात रुतते बघ तुझ्याचसाठी’ सारख्या ओळी रसिकांना रिझवून गेल्या.

ह्याच कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागातही ‘तुझ्या स्मृतींचा सुगंध उत्कट प्रजाक्ताहून दाट (तुषार); ‘बाभळीचा जन्म तुझी बोचरी कहाणी, तरी कशी गाते बाई आनंदाची गाणी’ (पूजा); ‘ही मिठी कशी अलवार अंगात वीज झंकारते’ (मिता); ‘देहभर फुललेले वारूळ मन सैरभैर’ (मिनिष); प्रितमची ‘विद्रोह’ कविता, अशा सुगंधी, उत्कट, घनदाट, तरल, हळव्या, रोमांचक, शृंगारिक, गहिऱ्या कविता आणि काव्यपंक्तींनी रसिक न्हाऊन निघाले.

ह्या सर्व कवी मंडळींच्या कविता जितक्या बहारदार होत्या तितकेच उत्कृष्ट सहज आणि उत्स्फूर्त सूत्रसंचालन राजेशने केले. दोन कवितातील दुवा जोडत, त्या कवितातील रस हलकेच वेचत, कुठे हसवत; कुठे मनाला स्पर्श करत संपूर्ण कार्यक्रमाची सूत्र त्याने सक्षमपणे सांभाळली.

मेळाव्यातील एवढा एकच मंचीय कार्यक्रम सुफळ संपन्न झाल्यानंतर सर्व मान्यवर कवींनी आपापली एक काव्यरचना पुढे येऊन सादर करण्याचा मेळाव्याचा मुख्य भाग सुरू झाला. ह्या कार्यक्रमात सादर झालेली प्रत्येक कविता म्हणजे वेगवेगळ्या रंगांचा गडद असा पोत घेऊन आलेली होती, आणि प्रत्येक कवी एखाद्या ब्रशसारखा रसिकांच्या मनाच्या कॅनव्हासवर त्या त्या रंगाचा स्ट्रोक काढत गेला आणि शेवटी जे चित्र निर्माण झाले त्यात सर्व रंग; सर्व आकार उमटले होते. ‘अजून थोडे चालीन म्हणतो, आभाळाला गाठीन म्हणतो’ (मनोहर जाधव), ‘आकाशातील ताऱ्यालाही माझ्यासाठी निखळ म्हणालो’ (हेमंत राजाराम), ‘झालेत सरळ रस्ते माणूस नागमोडी’ (जयंत कुलकर्णी), ‘मजबूत हातांनी आणि छत्रीने बाबा आभाळ तोलून धरायचे....घरचे आणि बाहेरचेही’ (विलास अधिकारी), ‘अजूनही त्या फुलांना बरी किंमत येते’ (डी एस कुलकर्णी), ‘हसतानाही जगण्यावर मी जरा रडलो होतो’ (विशाल कुलकर्णी), ‘एक गोळी झाडावी जुन्या साऱ्या आपल्या कवितांवर’ (विनायक उजळंबे), ‘दु:ख हलके होत असते बोलण्याने’ (शिवाजी सावंत), ‘मनाला निळे पंख लावून गेले’ (रश्मी मार्डी)....अशा कितीतरी ओळींच्या लाटा मनाच्या किनाऱ्याला धडका देत ओलावत राहिल्या. ‘जगा’ (देवकुळे सर), ‘प्रेमाचा वर्षाव कधीच नव्हता’ (जान्हवी शिराळकर), ‘कवितेविरुद्ध फिर्याद’ (शैलजा किंकर), ‘खळी विरुद्ध पाकळी’ (उमेश वैद्य), ‘रुपगर्विता’ (आकाश बिरारी), मेघना राजे ह्यांची कविता, ‘मंथन केले आयुष्याचे’ (जयप्रकाश खळदकर), ‘संध्येच्या पारावरती’ (कामिनी केंभावी), ‘बेण हरवलं आहे’ (मयूर ढोबळे), ‘मेघ सरले’ (स्वप्ना अमृतकर), आनंद पेंढारकरांची हिंदी-मराठी मिश्र गझल, ‘मी राधा आहे’ (संतोष वाटपाडे), ‘राधेस लागली आज’ (विभावरी बिडवे), ‘मनाचे घनदाट जंगल’ (दीपा वाकडे), ‘सोनपरी’ (मानसी चिटणीस), ‘आली कशी कळेना गोत्यात जिंदगी’ (वसंत शिंदे), ‘लग्न झालेले बॅचलर’ (विनायक अनिखिंडी), ‘मन कावरे बावरे’ (अमर शिंदे), ‘आकाश निळे’ (राजेश गुरव), ‘कवी व्हावं वाटलंय का’ (सारंग भणगे) अशा कवितांच्या गलबतांनी मनाच्या बंदरात लंगर कधी टाकले ते कळलेच नाही. प्रत्येक कवितेत पुष्कळ काही सांगण्यासारखे होते कि जसे खाली वि पाकळीची अभिनव कल्पकता, रुपगर्विताची पार्श्वभूमी, संध्येच्या पारावरतीची गहनता, बेण हरवलं आहे मधील सोप्या भाषेतून आजच्या मुलांविषयी व्यक्त झालेली तळमळ, आनंद आणि अमरच्या गायलेल्या कवितांवर धरलेला ताल, वसंत शिंदेंचे जोरकस सादरीकरण, लग्न झालेले बॅचलर मधला नर्मविनोद ई.

पोटभर कविता ऐकून, पोटभर दाद देऊन मग पोट भरायची वेळ झाली आहे ह्याचे भान पोटातल्या कावळ्यांनी साद घातल्यावर सर्वांना झाले. जवळपास दोन वाजत आले होते आणि बाहेर जेवणाची तयारी झालेली होती. बगिच्यामध्ये एका उंचवट्यावर टेबल मांडून त्यावर सुग्रास जेवण सर्वांची वाट पहात होते. सातारी पाहुणचारात चमचमीत रस्सा आणि म्हाद्या हे दोन चविष्ट पदार्थ जेवणाच्या पंगतीची रंगत वाढवून गेले.

जेवणानंतर पुन्हा आपल्या सभागृहात घेऊन जाण्यासाठी संचालकांची जरा घाईच चाललेली. कारण त्यांच्यासाठी पुढच्या सत्रातला पहिला कार्यक्रम हा विशेष महत्वाचा होता. क्षुधाशांती झालेली मंडळी शांतपणे स्थानापन्न झाल्यावर विनायकने माईक सारंगच्या हातात सुपूर्त केला. पुढचा कार्यक्रम आधी जाहीर केलेल्या रुपरेषेप्रमाणे सन्मानसोहळ्याचा होता, पण कसला सन्मान; कुणाचा सन्मान; कशाबद्दल ई. माहिती अर्थातच गुलदस्त्यात होती.

सारंगने सर्वप्रथम मकस ही जरी इतर अनेक काव्यमंडळांप्रमाणे कार्यरत असली तरीही मकसचे काही वेगळेपण मांडले. मकस हा कवींमधील सौहार्द वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध असलेला समूह आहे, आणि पारंपारिक संमेलने, सत्कार, पारितोषिक ह्यांना छेद देत आजवर काम करत आलेला समूह आहे, असे सांगितले. त्यानंतर आज मकसच्या त्या परंपरेच्या विरुद्ध मकस एक आत्मियता किंवा कृतज्ञता भेट एका व्यक्तीला देणार आहे असे नमूद करून श्रेष्ठ कवी आणि गझलकार श्री. जयंत कुलकर्णी (अर्थात जयंतकाका) ह्यांचे नाव जाहीर करताच इतर श्रोत्यांबरोबरच त्यांच्या स्वत:च्या चेहऱ्यावर एक हर्षमिश्रित आश्चर्य उमटले.

त्यापाठोपाठ जयंतकाकांना मंचावर बोलावून सारंगने मकस आणि जयंतकाका ह्यांच्यातील ऋणानुबंध विशद केला आणि ह्या आत्मियता भेटीची भूमिका देखील स्पष्ट केली. त्यानंतर विभावरीच्या हस्ते जयंतकाकांना पुष्पगुच्छ, शिवाजींच्या हस्ते स्मृतीचिन्ह (ज्यावर जयंतकाका ह्यांची आवडती गझल आणि त्यांचं प्रसन्न चेहरा छापलेला आहे), राजेशच्या हस्ते पुणेरी पगडी आणि तुषारच्या हस्ते शाल प्रदान करून यथाचित सन्मान केला. तसेच जयंतकाकांविषयी काही आठवणी आनंद आणि हेमंतजी ह्यांनी सांगितल्या, आणि जयंतकाकांनी भारावल्या शब्दात त्यांचे मनोगत व्यक्त केले. सर्व प्रेक्षक देखील ह्या हृद्य सोहळ्याने भारावले असावेत निश्चित, हे त्यांनी केलेल्या टाळ्या आणि कौतुकोद्गारातून स्पष्ट जाणवले. पगडी घातलेली, शाल पांघरलेली, हातात स्मृतीचिन्ह धरलेली जयंतकाकांची (आनंदच्या शब्दात) ‘जिंदादिल’ मूर्ती कृतार्थ वाटत होती. ती मूर्ती खरोखर मनात ठसली आणि मनातून अनेकांच्या camera मध्येही जाऊन बसली!

जयंतकाकांप्रमाणेच श्रीधरकाकांचाही असाच आत्मियता भेट देण्याचा निर्णय सारंगने संचालक मंडळातर्फे जाहीर केला.

त्यानंतरचा कार्यक्रम पुन्हा एकदा काव्यमैफलीचा होता. पहिल्या सत्राप्रमाणेच सर्व कवींनी (संचालक सोडून) एकामागून एक कविता सादर केल्या. पुन्हा एकदा कवितांच्या फैरी झडल्या आणि त्यांचं आनंद सर्वांनी खूप मनापासून लुटला.

प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच. कवितांची अशी मेजवानी झोडल्यानंतर पोट जरी भरले नसले तरीही काळाचा वेग आपल्या हाती नसतो. घड्याळाचे काटे फिरत राहिले आणि मैफल शेवटास आली. आभार प्रदर्शनाचा औपचारिक भाग अनौपचारिक रित्या संपवून मेळावा संपुष्टात आला. निरोपाच्या गाठी भेटीत मंडळी गुंतली. निरोप घेतले ते पुन्हा भेटण्याच्या वायद्यानेच!

मकस अजिंक्यतारा मेळावा संपन्न झाला तो सर्वांच्या सहभागाने. राजेशचे उत्कृष्ट नियोजन आणि त्याला मिनिषने दिलेली साथ, आनंदने आणलेले म्युझिक सिस्टम, संतोष वाटपाडेसारखा गाजत असलेल्या कवीचा सहभाग, पूजा आणि रश्मी ह्या नव्या पिढीतील दमदार कवयित्रींच्या प्रगल्भ कविता, विशाल, मनोहर, देवकुळे सर, हेमंतजी, कामिनीजी ई. सर्वांचा उत्साही सहभाग, वसंतजी, मयूर, स्वप्ना  ह्यांच्या दमदार कविता, मिता, प्रितम, दीपा, अमर ह्यांची पदार्पणातीलच उत्तम काव्यपेशकश, विशालजी, जान्हवीजी ह्यांच्या मनस्वी कविता, विनायक अनिखिंडी, मानसीजी, शैलजाजी ह्यांच्या वेगळ्या शैलीच्या कविता ह्या साऱ्या गोष्टींचा उल्लेख पुन्हा एकदा करणे क्रमप्राप्त आहे.

इथे भेटलात..........पुन्हा पुन्हा भेटत रहा, असे म्हणून थांबतो!

ता.क. कुणाचे नाव चुकीचे लिहिले गेले असेल, कविता किंवा कवितेच्या ओळी चुकीच्या लिहिल्या गेल्या असतील, कुणाचा उल्लेख राहिला असेल तर ह्या अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल माफ करा

आपला,
सारंग भणगे

मकस संचालक
Related Posts Plugin for WordPress, Blogger...