(हा वृत्तांत नाही, उत्स्फूर्त मनोगत आहे. पूर्ण वाचावे अशी कळकळीची विनंती)
--
गेल्या वर्षभरात निर्माण केलेली अत्यंत वेगळी परंपरा पुढे चालू ठेवत करम अर्थात कविता रसिक मंडळाने रविवारी 'बाल शोषण' ह्या विषयावर कविसंमेलन आयोजित केले होते. ह्यापूर्वी अगदी 'लग्न केले नसते तर' पासून 'वीरांगना' ते 'वारांगना' अशा विविध सामाजिक विषयांवर संमेलने घडवून आणल्यानंतर आता ह्या वर्षात 'जागृती' ह्या सदराखाली सुरु केलेल्या संमेलनात 'बाल शोषण' सारखा अत्यंत संवेदनशील विषय हाताळण्याची हिंमत करमने दाखवली.
जर कवी म्हणजे संवेदनशील मन असे असेल तर समाजात घडत असलेल्या दाहक वास्तवापासून कवी आणि त्याच ते so-called संवेदनशील मन दूर राहू शकत नाही ह्या, तसेच कवितेच्या माध्यमातून ह्या ज्वलंत प्रश्नांना पुन्हा एकदा हवा देणे अशा स्वच्छ भूमिकेतून स्वखर्चाने आणि स्वकष्टाने हि संमेलने आयोजित केली जात आहेत. एरव्ही बहुतेक प्रत्येक आठवड्यालाच कुठे ना कुठे तरी कलासक्त मंडळींची काव्यसंमेलने होत आहेतच, परंतु एवढे समाजाभिमुख राहून केवळ 'आमचे कवितेवर प्रेम आहे', असा डंका न पिटता, कवितेतून समाजातील प्रश्नांचे वास्तव समाजापुढे मांडू, स्वत:च्या आतील कवितेच्या विस्तूला, केवळ काव्यात्मक नव्हे तर वास्तववादी व्यथा - वेदनांची ठिणगी पडून चेतवू, असा पवित्रा घेणारे आणि तो यशस्वी करण्यासाठी आटापिटा करणारे काव्यगट माझ्यातरी पाहण्यात नाहीत.
करमच्या कुठल्याही कार्यक्रमाचे स्वरूप हे केवळ कवितावाचन नसून, किंवा केवळ विषयाच्या अनुषंगाने कुणा पर्यंकपंडितांना पाचारण करून केवळ पुस्तकी चर्चा घडवून आणणे असेही नसून, त्या त्या प्रश्नाने पोळलेल्या; त्या चटका लावणाऱ्या विषयाच्या मातीत; नव्हे नव्हे चिखलात लोळलेल्या आणि त्या त्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम केल्याने अस्सल जिवंत अनुभव असलेल्या अ-साहित्यिक मंडळींना बोलावून त्या प्रश्नाविषयी / विषयाविषयीचे अनुभव, चिंतन, चर्चा हे आधी घडवून मग कवींना कवितेतून त्या प्रश्नाच्या अनेक नकसकंगोऱ्यांवर आपल्या शब्दांचे लेणे चढवण्याची संधी दिली जाते. म्हणजे आवर्जून नमूद करायची गोष्ट अशी कि इथे केवळ कविसंमेलन आणि केवळ साहित्यिक चर्चा नाही घडत, तर घडतो माणुसकीचा सजीव सोहळा! अगदी सामाजिक कार्यकर्त्यांपासून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांना करमच्या साहित्यिक मंचावर स्थान दिले गेले आहे, प्रसंगी प्रचंड टीका सहन करून! लिहावे तेवढे त्याचे महत्व कमी होते, आणि लेखकाचे वाढते, म्हणून आवरते घेणेच योग्य!
'बाल शोषण' ह्या सारखा अत्यंत गंभीर विषय, ज्यावर नुसत्या गप्पांमध्ये देखील बोलणे; ऐकणे हे हेलावून टाकणारे असते; 'देवाघरची फुले' म्हणून धरतीवर आलेल्या निष्पाप जीवांवर; त्यांच्या अबल असण्याचा गैरफायदा घेत किती अनंत प्रकारे त्यांचे शोषण चालते, हे किती विदारक आहे; हादरवून टाकणारे आहे ह्याचा अनुभव संमेलनात आला. सामान्य कवी आणि श्रोत्यांबरोबर करमचा सहगट 'सुवानिती' हा ज्या विविध गरजू शाळा - आश्रमांबरोबर काम करतो तेथील ८-१५ वयोगटातील मुले मुली देखील ह्या संमेलनात सामील झाली होती. अर्थातच, ह्या विषयातील मानसोपचार तज्ञ आणि कवयित्री नूतन शेटे, तसेच पोद्दार शाळेच्या प्राचार्या अनघा घोलपजी ह्या सहभागी होत्या.
नूतनजींनी चटका लावणारे बाल शोषणाचे काही प्रसंग श्रोत्यांना सांगितलेच, परंतु तिथे उपस्थित असलेल्या मुलांना आणि पालकांनाही असा स्पष्ट संदेश ठासून दिला कि 'आपले शरीर हि केवळ आणि केवळ आपली मालकी आहे', 'त्याच्या रक्षणासाठी जर कुणी अतिप्रसंग करत असेल तर जीवाच्या आकांताने ओरडले पाहिजे; प्रतिकार केला पाहिजे', 'गप्प बसता कामा नये; प्रतिकार हा आपला अधिकार आणि जबाबदारी देखील आहे' ई., तर अनघाजींनी शाळांमध्ये मुलांना कशा प्रकारे सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यासाठी तंत्रज्ञानापासून ते प्रशिक्षणापर्यंत सर्व मार्ग कसे वापरले जातात, ज्या शाळांकडे आर्थिक पाठबळ मुबलक नाही त्या शाळादेखील कशाप्रकारे मुलांच्या सुरक्षेसाठी दक्ष राहू शकतात ई. पैलूंवर प्रकाश टाकला. त्यानंतर प्राध्यापक सोनाग्रासरांनी थोडक्यात जे त्यांचे विचार मांडले त्यात 'अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्याची वेळ ज्या समाजात येते त्या समाजाकडून कुठलीही आशा ठेवता येणार नाही' असा चाबूक ओढला तेव्हा अक्षरश: अंगावर काटा आला.
ह्या सन्माननीय व्यक्तींबरोबर आश्रमशाळेतून आलेली एक मुलगी, तिनेही आपले मनोगत व्यक्त केले. पुढे जाऊन अशाच प्रश्नांसाठी जीवन वेचायचे आहे असा वेडा ध्यास व्यक्त करणारी ती मुलगी कदाचित सर्व कवींच्या गालावर एक चपराक ओढून गेली असावी.
ह्या विचार मंथनात मनात काय काय विचार वाहत गेले, एका विषयाला किती बाजू आहेत, किती पैलू आहेत, कंगोरे आहेत, ह्याचे जे दर्शन झाले ते गोंधळात टाकणारे होतेच, परंतु विचार करायला लावणारे होते. कवींमध्ये 'जागृती' आणतानाच समाजाला सजग करणारे होते. घरातील सर्व प्रकारच्या नातेवाईकांकडून होणारे छोट्या छोट्या मुलांचे लैंगिक शोषण हादरवणारे आहेच, परंतु खरोखर कुठलेच नाते विश्वासार्ह राहिले नाही हि दारूण खंत मनात दाटवणारे होते. हे मुळांना सांगून आपण त्यांना जागरूक आणि सावध करतो आहोत कि त्यांच्यात एक कायमस्वरूपी भयगंड निर्माण करतो आहोत अशी दुविधा मनात निर्माण करणारे होते. मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेत जागोजागी CCTV Surveillance आणि पहारा देणारे शिक्षक हवेत कि विश्वास निर्माण करणारे; प्रेमादर निर्माण करणारे शिक्षक आणि वातावरण हवे..........असे कितीतरी प्रश्न उभे राहिले, ज्यावर विचार करत राहिला पाहिजे! आणि तो ही एक उद्देश ह्या कार्यक्रमातून आहेच अर्थात.
हे लिहून मी कार्यक्रमाचा वृत्तांत लिहिण्याचा किंवा आढावा घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर ह्या संमेलनातून नक्की काय घडत ह्याची झलकमात्र दाखवण्याचा यथाशक्ती प्रयत्न तेवढा करतो आहे.
त्यानंतर कवी संमेलन तर झालेच आणि त्यात एकाहून एक कविता सादर झाल्याच, पण त्या कविता अगदी लहान मुलांना ऐकायला भाग पाडून त्यांचे तिथेच काव्य-शोषण केले गेले नाही (:) ) तर त्या मुलांना नूतनजी आणि आरती देवगावकर ह्यांनी एका वेगळ्या खोलीत छान गप्पा=गोष्टीमार्फत अधिक उपयुक्त अशी माहिती दिली, संवाद साधला; त्यांना बोलते केले! मुलांचे ते चिमुकले विश्व उलगडताना धन्यता वाटली, परंतु अशाच कुणा निष्पाप मुलांचे जेव्हा शोषण होत असेल तेव्हा त्यांची काय अवस्था होत असेल ह्या विचाराने मनात अपार खिन्नाताही दाटली!
कवितांविषयी अधिक लिहित नाही, तो माझ्या ह्या उत्स्फूर्त लेखनाचा विषयही नाही. पण त्या कविता देखील खूप काही बोलून गेल्या हे सांगणे न लगे!
ह्या अशा कार्यक्रमांना उचलून धरणे, ह्या एका किमान जबाबदारीची जाणीव माझ्या ह्या तोडक्या-मोडक्या शब्दातून काही जणांना तरी होईल एवढी अशा; इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करून थांबतो!
कुणाचेही वैयक्तिक आभार मी इथे व्यक्त करत नाही, परंतु ह्या कार्यक्रमांना यश यावे; त्यांचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे ह्यासाठी त्यांच्या हातांना बळ द्या असे आवाहन जरूर व्यक्त करेन!
सारंग भणगे (१९ मार्च २०१८)