Saturday, October 12, 2019

वृत्तबद्ध कविता

वृत्तबद्ध कविता प्रत्येक कवीने लिहायचा प्रयत्न केलाच पाहिजे असे माझे आग्रही मत आहे. वृत्त हे कवितेचे व्याकरण आहे, अर्थात शास्त्र आहे. कविता हि मुळात कला आहेच, परंतु प्रत्येक गोष्टी मध्ये कला आणि शास्त्र ह्यांचा संगम हा प्रतिभेचा उच्चांक ठरतो. विज्ञानामध्ये जितके शास्त्र असते तितकीच कला पण असते. वैज्ञानिकाला देखील प्रतिभेची आवश्यकता असते. त्या प्रतिभेमुळे; सृजनशीलतेमुळे एकच विज्ञान शिकणारा कुणी एक शास्त्रज्ञ बनतो तर दुसरा कुणी केवळ एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत राहतो.

तर मला असे म्हणायचे आहे कि जर कविता करायची असेल तर कवितेचे व्याकरण समजणे; त्याचा अभ्यास करणे, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी अभ्यास; सराव आणि साधना करणे हे सारे एक परिपूर्ण कवी होण्यासाठी आवश्यक आहे.

हे लिहीत असताना गायन कलेचा विचार मनात आला, आणि स्वाभाविकपणे किशोर कुमार समोर आला. किशोर कुमार हा शास्त्रीय संगीत न शिकलेला, परंतु असामान्य प्रतिभा लाभलेला गायक! त्याने त्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर पार्श्वगायन क्षेत्राचे शिखर गाठले. परंतु तरीही जर भीमसेनजींची तुलना किशोरशी केली तर भीमसेनजींच्या गायन प्रतिभेविषयी अधिक आदर वाटतो. खरेतर अशी तुलना योग्य नाही, परंतु मला असे वाटते कि गायनकलेचे शास्त्र शिकून त्याचे शिखर गाठणारा, हा पार्श्वगायनाचे शिखर गाठणाऱ्यापेक्षा अधिक उजवा वाटून जातो. अर्थात हे वैयक्तिक मत असू शकते!

तर मूळ मुद्दा हा कि कवीने वृत्त आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. कवी कवितेविषयी किती गंभीर आहे ह्याचा वृत्तबद्ध कवितेचा अभ्यास आणि  सराव करणे हा एक महत्वाचा घटक होऊ शकतो.

अर्थात ह्याचा अर्थ केवळ वृत्तामध्येच कविता लिहिली पाहिजे, हा अट्टाहास मला हास्यास्पद आणि अतिरेकी वाटतो. वृत्तांच्या सरावाने वृत्तबद्ध वृत्ती (हे स्वामी निश्चलानंद ह्यांच्या काव्यसंग्रहाचे शीर्षक देखील आहे) तयार झाल्यावर कवीला अमुक एक कविता हि कुठल्या आकृतिबंधामध्ये जन्मली पाहिजे ते देखील उत्स्फूर्तपणे यायला हवे. मग त्यामध्ये केवळ वृत्तामध्येच कविता जन्म घेणार नाही, तर ती कविता उपजत असताना स्वतः:चा आकृतिबंध ठरवून येईल. जर वृत्तबद्ध वृत्ती शक्य असेल तर कवितेच्या सृजनाची हि उत्स्फूर्त प्रक्रिया देखील शक्य आहे. त्यामुळे कविता हि केवळ वृत्तातच असावी असे मत एकांगी वाटते.

वृत्त हे निश्चितपणे कवितेचा आकृतिबंध ठरवते. आकृतिबंध हे बाह्यरूप आहे, तर कवितेचा आशय हे त्याचे आंतररूप किंवा आत्मरूप आहे. आशय अधिक महत्वाचा कि आकृतिबंध हा खरेतर वादाचा मुद्दा असूच शकत नाही. आशयाशिवाय कविता अशक्यच आहे. त्यामुळे तो अत्यावश्यक आहे. आकृतिबंधाची अट हि त्यामानाने दुय्यम आहे.

अर्थात, केवळ आशय आहे म्हणून कुठल्याही आकृतिबंधामध्ये पसरटपणे गद्यप्राय कविता मांडणे, हे मलाही अजिबात पटत नाही, मान्य नाही. अशी कविता लिहूच नये अशा मी मताचा नाही, परंतु अशी कविता हि केवळ आणि केवळ स्वानंदासाठी किंवा स्वान्त सुखाय लिहावी, ती प्रसिद्ध करून त्यावर आपले कवित्व मिरवणे हे मला 'पाप' वाटते! जर अशा मुक्त कवितेला प्रसिद्धी मिळाली नसती तर मराठी कवितेचा दर्जा खूप अधिक चांगला टिकला असता असे मला तरी वाटते.

ह्याचा अर्थ पुन्हा सर्व मुक्त कविता ह्या गद्यप्रायच असतात असे नाही, किंवा त्या अगदीच अप्रसिद्धच राहिल्या पाहिजेत असेही नाही. काही अत्यंत दर्जेदार असे मुक्तकाव्य वाचले आहे आणि ते वाचल्यावर रटाळ वृत्तबद्ध काव्य वाचण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगले असेही वाटले आहे.


कवितेबाबत दोन दुराग्रह मला दिसले आहेत, जाणवले आहेत. एक हा कि वृत्तबद्ध कवितेत व्यक्त होता येत नाही म्हणून मुक्तच्या नावाखाली सतत वाट्टेल ते लिहीत राहणे! ह्याने कविता-विश्वाचे साहित्यिक नुकसान होते, तर त्याच्या दुसऱ्या टोकावर मुक्त कविता हि कविताच नाही आणि केवळ वृत्त किंवा छंदबद्धच कविता रचली पाहिजे ह्याने देखील नुकसान होते.

मला कवितेसाठी मध्यममार्ग अधिक योग्य वाटतो, ज्यात वृत्तांचा योग्य अभ्यास आणि शक्यतो वृत्तांमध्ये कविता रचण्याचा प्रयत्न कवींनी केला पाहिजे, पण क्रिकेटमध्ये जसा प्रत्येक फटका हा पुस्तकात लिहिल्याप्रमाणेच मारून चालत नाही, तर त्यामध्ये काही अंशी मुक्तता हवी, तशीच काही कविता हि थोडी सैलपणे लिहिल्यास हरकत नसावी.

हे म्हणत असताना आपण लक्षात ठेवले पाहिजे कि वृत्तांच्या पाठोपाठ छंद रचना ज्या आहेत त्यामध्ये आवश्यक ती मोकळीक दिलेली आहे. ओवी, अभंग, अष्टाक्षरी ई. छंदांमध्ये नियम गणवृत्तांप्रमाणे जाचक नाहीत, आणि कवीच्या व्यक्ततेला मोकळेपणा त्यात मिळतो. कवींनी अशा छंदांमध्ये तरी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

वृत्तामध्ये लिहिलेली कविता ह्यामध्ये स्वाभाविक 'बद्धता' येतेच. त्यामुळे वृत्तबद्ध लिहिण्यासाठी शब्दसंपदा अधिक हवी हे बऱ्याच अंशी बरोबर आहे. परंतु वृत्तात लिहीत असताना सहज येणारे शब्द सोडून जर जड, क्लिष्ट, अपरिचित शब्द वापरले तर ते रसभंगाला कारण होऊ शकते, हा स्वानुभव देखील आहे. वृत्तात सहज लिहिण्यासाठी केवळ सराव आवश्यक नाही तर आपण त्या कवितेवर खूप काम करणे आवश्यक आहे, खूप विचार करणे, कविता सुचून गेल्यावरही खूप काळ त्यामध्ये आवश्यक ते बदल करत जाणे, वारंवार ती कविता वाचून त्यात सुधारणा करत राहणे, हे सारे खूप आवश्यक आहे. पण आजकाल आपल्याकडे तेवढा वेळ, तेवढा संयम राहिलेला नाही. त्यामुळे जशी आहे तशी कविता पोस्ट करून मोकळे व्हायचे हि वृत्ती बळावलेली आहे. कवींनी कविता प्रसिद्ध करण्याच्या मोहापासून स्वतः:ला वाचवले पाहिजे, हे अत्यंत आवश्यक होत चालले आहे.

ह्या प्रक्रियेवर उत्स्फूर्तता गमावण्याचा आरोप स्वाभाविकपणे केला जातो. जो काही अंशी जरी मान्य केला, तरीही उत्स्फूर्तता हि केवळ कविलाच ठाऊक असते. ज्या कवितेत उत्कृष्ट आशय असतो, शब्दरचना आकर्षक असते, आणि मांडणी देखील उत्तम असते ती कविता रसिकांना अधिक भावते, अधिक काळ लक्षात राहते. मग त्यामध्ये उत्स्फूर्तता होती कि नव्हती हा मुद्दा रसिकांच्या, वाचकांच्या दृष्टीने संपूर्णतः गौण असतो. जोपर्यंत मूळ सुचलेल्या कवितेतील आशयाशी तुम्ही तडजोड करीत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या कवितेत करोडो बदल केले तरी त्यातील उत्स्फूर्तता काकणभर देखील कमी होत नाही. उलट काही वेळा विचार करता करता कवितेच्या आकृतिबंधाबरोबरच आशय देखील समृद्ध होऊ शकतो. हे सर्व अकृत्रिमपणे कसे घडवून आणायचे हि देखील कवीची प्रतिभाच आहे. केवळ कविता सुचणे हीच नव्हे तर कविता संस्कारित सालंकृत करणे हा देखील प्रतिभाविष्काराचाच भाग आहे.

लिहिता लिहिता खूपच प्रदीर्घ लिहीत गेलो. सहज सुचेल तसे लिहिले आहे. हि माझी मते मांडली आहेत, पण ह्यावर देखील पुनर्विचार करणे आवश्यक असेल हे निश्चित!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...