पूर्ण मी असेन जर अपूर्ण वाटतेच का?
उत्तरे मिळूनही सुटेचनात पेच का?
पांढऱ्या ढगा तुला सवाल एक थेट हा
सावली मला तुझी सदैव जाळतेच का?
झोपलीस त्या कुशीवरी सखे निवांत तू
सांगतेस जे तुझे अतीव प्रेम हेच का?
पोरगी विचारते मला खडा सवाल की
सात वाजता घरात मीच हे असेच का?
दु:ख ना तुला तरी कवी कशास व्हायचे?
फाटले नसेल तर उगा शिवायचेच का?
=====================
सारंग भणगे (१७ डिसेंबर २०१९)