Sunday, February 14, 2010

प्रकाशप्रेत

व्याकुळ सांजवेळी डोंगरमाळ रडते;
हिरव्या पाण्यामध्ये खिन्न छाया पडते.

सुर्य क्षितीजापाठी जराजर्जर दडतो;
राऊळकळसावरती अंधार गर्द पडतो.

डोंगरसरणावरती प्रकाशश्वास मेला;
रीत्या रांजणामध्ये अंधार खोल गेला.

बंद दिशांचे पिंजरे भरले अंधाराने;
उजेड पळुन गेला मावळत्या दाराने.

जीवंत झाल्या पुन्हा गूढ उदास छाया;
गावकूसात शिरली भयजर्द काजळमाया.

अवघा आसमंत काळ्या पुरात भिजला;
वृक्षांच्या अंगोपांगी अंधार पुरता थिजला.

विश्व स्मशान झाले पुरला उजेड आहे;
प्रेतास जाळणारा उरला उजेड आहे.
==================
सारंग भणगे. (१४ फेब्रुवारी २०१०)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...