अभेद्य आहे अमचा किल्ला
अजिंक्य आहे अमची सेना
शत्रु कुणीही उभा राहता
उडवून टाकू त्याची दैना
काळालाही भिणार नाही
पाऊल अमुचे पुढेच राही
अशा गर्जु दे विजयगर्जना
दुमदुमती त्या दिशात दाही
उत्तुंग असती अमुची स्वप्ने
क्षितीजाच्याही पल्याड शोधू
कभिन्न काळ्या काळ-कातळी
विजयाचे अन लेणे खोदू
दणकट अमुच्या छातीवरती
घाव घणाचे सोसून घेतो
पराक्रमाच्या कसोटीवरती
बळकट बाहु घासून घेतो
कधी वादळे उभी ठाकती
किती संकटे वाट रोखती
उलथूनी त्यांना अमुचि सेना
विजय-यशाचे मंत्र घोकती
जिंकणे केवळ ध्येय नसूनी
जिंकणे अमुचे जीवन आहे
जिंकण्यासाठी वेचतो आम्ही
सदैव अमुचे तनमन आहे
विश्वविजयाचा हा वारू
त्रिखंड जिंकूनी अजिंक्य झाला
घराघरातुन गुढी उभारू
अश्वमेध हा यशस्वी झाला.
=============
सारंग भणगे. (४ एप्रिल २०११ - चैत्र शुद्ध प्रतिपदा)
No comments:
Post a Comment