Thursday, May 26, 2011

जंगलामध्ये सारं उमगलंय

जंगलामध्ये सारं उमगलंय; कळलं आहे
चड्डी घालून फुल उमललंय; फुललं आहे.

जंगलामध्ये सारं उमगलंय;
चड्डी घालून फुल उमललंय (२)

एक कबूतर होतं नंगू रांगत होतंSSS
अंड्यामध्येच बरं होतं सांगत होतंSSS
अंडं सोडून उगाच बाहेर आलं आहे.....
चड्डी घालून फुल उमललंय; फुललं आहे.

जंगलामध्ये सारं उमगलंय;
चड्डी घालून फुल उमललंय (२)
===================
सारंग भणगे. (२४ मे २०११)

Sunday, May 22, 2011

जरा जरा

न तू कधीच बोलता कळायचे जरा जरा
तुझे कटाक्ष सारखे छळायचे जरा जरा

खळी कपोल गोड गोड लाजणे मधाळसे
म्हणे, नभात चांदणे जळायचे जरा जरा

उठे हळूच पापणी फुटे मनात तांबडे
मिटे तसे; अरूण मावळायचे जरा जरा
(मऊ उन्हात मेघही गळायचे जरा जरा)

मिठास भासते सखे मिठातही अता मला
मिठीत मोक्षसौख्य ते मिळायचे जरा जरा

फुटायची जळात लाट केस ते तुझे तसे
ललाटभाग झाकूनी रुळायचे जरा जरा

तहान चातकासही हवीहवीच वाटते
ढगात पाहण्या तुला पळायचे जरा जरा

रती परी विलोभनीय सुंदरी तु कामिनी
तुला बघून बुद्धही चळायचे जरा जरा

उडे हवेत ओढणी विवेक ढासळायचा
अशा क्षणास ध्रूवही ढळायचे जरा जरा
==================
सारंग भणगे (२१ मे २०११)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...