आता पुन्हा जगावे माझ्या मनात आहे;
शब्दातुनी वहावे माझ्या मनात आहे.
पाषाण पावलांचा होता पडून गोळा,
आता पुन्हा उठावे माझ्या मनात आहे.
ही आग प्रेरणांची गोठून बर्फ झाली,
ज्वालामुखी बनावे माझ्या मनात आहे.
हे श्वास थांबलेले लाकूड अंग झाले,
ते चंदनी बनावे माझ्या मनात आहे.
जिंकायचे कशाला हारून जिंकताना,
काव्यापुढे हरावे माझ्या मनात आहे.
ब्रह्मांड हे मनाचे माझ्यात साचलेले,
चैतन्यरूप व्हावे माझ्या मनात आहे.
मेलो; जळून गेलो; मी खाक राख झालो,
राखेतुनी उठावे माझ्या मनात आहे.
===================
सारंग भणगे. (५ जुन २०११)
No comments:
Post a Comment