Tuesday, July 23, 2013

ती येते आहे



गंध फुलांचे रंग ऋतूंचे घेऊन गेली होती,
वाटेवरती काटे गोटे ठेऊन गेली होती,
अत्तर शिंपत वाऱ्यावरती तरळत येते आहे
मधाळ ओठांमधून गाणे निथळत येते आहे….

ती येते आहे, ती येते आहे……

वादळवारा घोंघावू दे,
सागरलाटा रोरावू  दे,
प्राणांची मी करून होडी धावून येईन सजणी,
पंख जीवाचे लावून सखये झेपावीन मी गगनी,

प्राणपाखरू प्राणप्रियेला शोधत येते आहे,
ती येते आहे, ती येते आहे……

डोळे माझे शिणले आता,
स्वप्नांनाही चिणले आता,
क्षितिजावरती लुकलुकणारा तारा बनून ये ना!
चकोरास या तहानलेल्या अमृतदर्शन दे ना!

हातामध्ये चांदण-मोती उधळत येते आहे,
ती येते आहे, ती येते आहे……

रंग उषेचे गालांवरती घेऊन येते आहे;
यौवन-मदिरा गात्रांमधुनी सांडत येते आहे;
तिच्या सयीने वसंतवैभव नाचत येते आहे;
जमिनीवरती जणू तारका चालत येते आहे.

 
ती येते आहे, ती येते आहे……
-----------------------------------------------
सारंग भणगे (23 July 2013)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...