Saturday, June 27, 2015

"सुंदर मी होणार" - पु. ल.



काही काही लोक माझ्यासारखे कमनशिबी असतात. वयाची निम्मी वर्ष गेल्यानंतर सुंदर मी होणार सारखे त्रिखंड सुंदर नाटक पाहायचा योग येतो. मराठी साहित्य क्षेत्रातले परीस म्हणजे पु. ल. आपल्या परीस प्रतिभेने त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रातील कित्येक अंगांना स्पर्श करून त्याचं अक्षरश: सोन करून टाकल आहे. पु.लं.च्या बावनकशी सुवर्णखाणीतील काही आभूषण वाचायचा; अनुभवायचा योग पूर्वी आला होता. शाळेत असताना आणि नंतरही पु.लं.ची पुस्तके वाचली होती. बहुतेक सर्व विनोदी, एक 'जावे त्यांच्या देशा' (आणि कान्होजी आंग्रेही, पण ते गणतीत धरणार नाही मी तरी) हा अपवाद वगळता.

आणि आज तू सुवर्णयोग कि मणिकांचनयोग आला जेव्हा पु. लं.सारख्या असामान्य प्रतिभेच्या कलावंताचा; साहित्यिकाचा विलक्षण कलाविष्कार 'सुंदर मी होणार' पहिले.

चित्रपट पाहणे हा माझा छंद आहे असे सांगितले तर लोक एक निकृष्ट पातळीची अभिरुची असलेला माणूस असे समजतात. 'सुंदर मी होणार' पाहण्याच्या आधीपर्यंत मी देखील असेच बहुधा असाच दृष्टीकोन बाळगणारा असेन, पण हे अद्वितीय नाटक पाहिल्यानंतर माझा वाचनाचा छंद मागे पडल्याचे फारसे दु:ख मला ह्या क्षणी होत नाहीये.

ह्या नाटकाचे अंतरंग समजून घेण्यासाठी हे नाटक पाहण्यापेक्षा वाचणे जरूर आहे असे वाटते, कारण वरपांगी दिसणारे त्यातील प्रसंग; त्यातून होणारा भावाविष्कार इतकेच त्याचे मर्यादित आणि ढोबळ स्वरूप नाही वाटत. सामान्यत: साहित्याची निर्मिती हि भाव-भावनांचा अविष्कार आणि व्यक्ततेसाठी होते, परंतु पु.लं.च्या ह्या लिखाणाला काही इतरही बरेच पदर असावेत असे वाटून जाते. ते केवळ भावनिक प्रसंगांचे नाट्य नाही, कि काही नाते संबंधांवर प्रकाश टाकणारे, त्यांचे पदर उलगडणारे; मानवी जीवनातील काही विचार किंवा तत्वे प्रकट करणारे असे सामान्य स्वरूप त्याचे वाटत नाही. ह्या क्षणी मी त्यावर लिहिण्याइतपत ते मला समजले नाही आणि तेवढे माझे विचार परिपक्वही झाले नाहीत, पण पुन्हा वाचून लिहीन.

पण हे नाटक पाहिल्यानंतर एक लोकविलक्षण, असामान्य कलाकृती पहिल्याचा आनंद मिळाला. पु.लं.च्या संहितेबद्दल माझ्या क्षमतेप्रमाणे लिहिलेच, परंतु दिग्दर्शन आणि मुख्य म्हणजे अभिनय ह्या बाबतीत इतकी उत्कृष्ट कलाकृती आजवर पहिली नाही.

वंदना गुप्ते हि कसलेली अभिनेत्री, तिच्या अभिनयकौशल्याविषयी नवीन सांगायला नकोच, फक्त तिच्या अभिनयात नेहेमीच मला मध्येच फार casual पणा आल्यासारखा वाटतो. क्वचित काही ठिकाणी ते ह्या नाटकात देखील जाणवले. काही ठिकाणी नक्की कसा अभिनय केला पाहिजे हे तिला कळले नसावे असे वाटून जाते.

रवि पटवर्धन ह्यांनी त्यांची व्यक्तिरेखा अत्यंत शिताफीने रंगवली आहे. उत्तम अभिनय क्षमतेला अनुभवाची जोड जाणवते, पण त्या भूमिकेच्या स्वरूपामुळे असेल कदाचित, ती भूमिका फारच एकसुरी वाटते, केवळ शेवटचा प्रसंग सोडला तर. अखेरच्या प्रसंगात मात्र रवि पटवर्धन यांनी जीव ओतला आहे. अत्यंत उत्कट अशा अभिनयाच दर्शन त्यांनी ह्या प्रसंगात घडवल आहे, पण तरीही तो अभिनय वाटतोच.

प्रशांत दामले ह्या माणसाला तोड नाही. अभिनयाची शिखर त्याने पादाक्रांत केली आहेत. छोट्या भूमिकेत कितीतरी रंग आणि छटा त्याने भरल्या आहेत कि तो भारावून टाकतो. त्याच्या गायकीचा देखील एक नमुना नाटकात पाहायला; नव्हे ऐकायला मिळतो. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक हावभाव अत्यंत ताकदीन आणि विलक्षण अचूकतेन त्यानं सादर केल आहे. एक छोटी पण परिपूर्ण भूमिका त्याने पेश केली आहे.

गिरीश ओक हे देखील असेच एक उत्तम कलाकार. बहुतेक सर्व नाटके, चित्रपट ई. मधून त्यांनी अतिशय सहजतेने आणि कुशलतेने अभिनय केला आहे. पण ह्या नाटकातील त्यांची भूमिका वेगळी आहे. तसे पाहता एखाद्या कवीची भूमिका हे काही वेगळे नाही. पण ह्यातला कवी वेगळा आहे. सामान्यत: कवी म्हटले कि अस्ताव्यस्त, सतत चिंतातूर असलेला आणि सतत अगम्य तत्वज्ञान झाडणारा किंवा अतिशय आत्ममग्न असा, अशी व्यक्तिरेखा दिसते. अगदी हृषीकेश मुखर्जींच्या 'अनुपमा'मध्ये देखील हृषीदांना वेगळा विचार करता नाही आला, त्यांनी दाखवलेला धर्मेंद्र मी वर म्हणतो तशाच प्रकारचा कवी होता. 'सुंदर मी होणार' मधला कवी हा नाटकाच्या शीर्षकाला शोभेसा आहे. जीवनात सौंदर्य, प्रकाश आणि जिजीविषा ह्यांच्या उत्कट विलासाचा उद्घोष करणारा कवी आहे. त्यांनी हि भूमिका अतिशय सुरेख नैसर्गिक रित्या वठवली आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे त्यांनी ह्या व्यक्तिरेखेसाठी लिहिलेले लांबलचक पल्लेदार, काव्यात्मक आणि बोलायला कठीण असे संवाद इतके सहजतेने आणि प्रभावीपणे म्हटले आहेत कि खरोखर ते संवाद त्यांच्या तोंडातून उत्स्फुर्तपणे बाहेर पडत आहेत असेच वाटते. अविश्वसनीय सुरेख असा अभिनयाविष्कार!

श्रीराम लागू यांनी त्यांच्या नेहेमीच्या सफाईने काम केले आहे. ते नाट्य क्षेत्रातील दिग्गज आहेत, त्या त्यांच्या बिरुदाला शोभेलस काम त्यांनी सहज केले आहे. एक दोन प्रसंगात त्यांनी कमाल केली आहे. त्यांच्या वयामुळे काही ठिकाणी त्यांना मर्यादा असल्या सारख्या वाटतात, पण काही ठिकाणी ह्या व्यक्तिरेखेसाठी त्याचाच त्यांना उपयोग झाल्यासारखा वाटतो.

इतर व्यक्तिरेखांमध्ये वंदना गुप्तेंच्या चुलत बहिणीचा रोल केलेली अभिनेत्री सुद्धा अतिशय गुणवान वाटली. एक प्रसंग कि ज्यात ती रवि पटवर्धनला त्याची जागा दाखवून देते तो तिने अत्यंत ताकदीने केला आहे. कोण आहे ती माहित नाही, पण निश्चित एक गुणी अभिनेत्री आहे असे स्पष्ट जाणवते.

बाकी इतरांचा काही उल्लेख करण्यासारखे नाही, पण.......

जर ह्या नाटकात कुणी अभिनयाचे परमोच्च शिखर गाठले असेल तर ते कविता लाडने. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक रंग, छटा, प्रत्येक भाव, मुद्रा, वाचिक अभिनय, मुद्राभिनय, stage वरच्या वावरामधील सहजता, हावभावातील सहजता आणि नैसर्गिकता, अभिनयाची जी काही सारी अंग असतील ती कदाचित अत्यंत अचूक आणि आदर्श पद्धतीने तिने सादर केली आहेत. प्रशांत दामलेची छोटी भूमिका असून त्याने जो विलक्षण अभिनय केला आहे, तसाच लोकविलक्षण अभिनय कविता लाडने केला आहे. तिच्या समर्थ अभिनयावर जी काही शक्य असतील ती सारी विशेषणं उधळावीत इतका समग्र, सहज, सर्वंकष, समर्थ अभिनय तिने केला आहे. पहिल्या तिच्या entry पासून ते शेवटच्या तिच्या exit पर्यंत अभिनय उंचावत उंचावत तिने शेवटचा प्रसंग पराकोटीच्या सहजतेने केला आहे कि ती तो प्रसंग प्रत्यक्ष जीवनात जगत असल्यासारखे वाटते. माझे शब्द तिच्या अभिनयनैपुण्याच्या वर्णनासाठी इथे तोकडे पडतात.....

[उर्वरित काही अनुभव पुन्हा कधीतरी.....]

Wednesday, June 17, 2015

जरी उभा मी उन्हात आहे

जरी उभा मी उन्हात आहे
वसंत माझ्या मनात आहे

उगाच शोधी इथे तिथे का
तुला हवे ते तुझ्यात आहे

न दुःख ज्याला न हर्ष काही
तया कशाची ददात आहे

असे सुखाचा परीघ छोटा
जगायचे वर्तुळात आहे

भरून येता नभात पाणी
जमीन उडते ढगात आहे

जळून गेलो तरी न चिंता
फिनिक्स माझ्या तनात आहे

न विठ्ठलाची करेन भक्ती
विलीन आत्मा तयात आहे

नसेल ज्याच्या मनात प्रिती
उगाच वेडा जगात आहे
================
सारंग भणगे. (१७ जून २०१५)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...