Wednesday, June 17, 2015

जरी उभा मी उन्हात आहे

जरी उभा मी उन्हात आहे
वसंत माझ्या मनात आहे

उगाच शोधी इथे तिथे का
तुला हवे ते तुझ्यात आहे

न दुःख ज्याला न हर्ष काही
तया कशाची ददात आहे

असे सुखाचा परीघ छोटा
जगायचे वर्तुळात आहे

भरून येता नभात पाणी
जमीन उडते ढगात आहे

जळून गेलो तरी न चिंता
फिनिक्स माझ्या तनात आहे

न विठ्ठलाची करेन भक्ती
विलीन आत्मा तयात आहे

नसेल ज्याच्या मनात प्रिती
उगाच वेडा जगात आहे
================
सारंग भणगे. (१७ जून २०१५)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...