Friday, September 16, 2016

तुझे अबोल हासणे



तुझे अबोल हासणे, मला बघून लाजणे
मनात माझिया तुझी निनादतात पैंजणे

निशानभात तारका
तुझ्यावरी रुसून का
निशांत शांत भाळला
तुझ्यावरी म्हणून का
समीर गाई मोहुनी
बिहाग राग साजणे

निःशब्द मंद मारवा
निनादशून्य गारवा
तुझ्यात लाभतो मला
सुमामधील गोडवा
हसून मुग्ध लाघवी
मनात प्रीत पिंजणे

परीसस्पर्श होऊ दे
तनू सितार गाऊ दे
सुरेल स्पंदने उरी
मधूर मंद वाजू दे
निरव जीवनी जणू
प्रणयवेणू वाजणे
===========
सारंग भणगे (१५ संप्टेंबर २०१६)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...