त्या रात्रीत तिच्या माझ्यात झालेल्या चॅटचा धुंद पाऊस
मी घनचिंब भिजलेलो, आणि ती बरसून मोकळी झालेली
निथळणारं शरीर नि निवणारं मन माझं, अन निवांत ती
निर्वात अलबत नाही, तरीही दोघात एक पोकळी झालेली
शब्दांचा मोरपिसारा मिटलेला, मौनाच्या केका घुमल्या
अव्यक्त अभिव्यक्तीचा तानपुरा पुरिया आळवू लागलेला
अंधारात अवघ्या वेध तिच्या पावलांचा लागत असताना
नि:शब्द मी, नि स्तब्ध ती असा निर्व्याज संवाद जागलेला
ती गेली तरीही मी तिच्या निरामिष अस्तित्वात तल्लीन
आयुष्याच्या वक्र वलयांमध्ये एका सरळ रेषेच्या शोधात
सावधपणाला बेसावध करून ‘स्व’त हरविण्याची अनुभूती
मला ती देऊन गेली, ती नसताना ती असल्याच्या बोधात
===================================
सारंग भणगे (२६ जून २०१७)