इकडे तिकडे कितीही फिरलो तुझ्याचसाठी राखीव मी
तुझाच होतो तुझाच आहे तुझाच राहो आजीव मी
काडतूस मी माझ्यामध्ये दारू भरली ठासून पण
बंदुकीमधे भरले नाही म्हणून आहे निर्जीव मी
काळीज म्हणे दु:खाला की बेट्या छिन्नी आहेस तू
घाव घातले म्हणून झालो सुंदर मंदिर कोरीव मी
भावभावना विचार ह्यांनी ओबडधोबड होतसे मन
अमिबा त्याच्या मनात म्हणतो मनापुढे तर रेखीव मी
युद्ध तसे तर चालू असते शस्त्रे केवळ निरनिराळी
स्वकियासंगे लढण्या धरले पेनस्वरूपी गांडीव मी
===========================
सारंग भणगे (८ आॅक्टोबर २०१८)