Saturday, February 28, 2009

दुःखपूर

अंतस्थ वादळाची मी लिहू काय कविता
पुरात कोसळताना सुचतील काय कविता

ती वादळे कशाची; ते पूर कोणते
अंतरात नाचते ते क्रूर कोण ते

मी फ़क्त प्रश्न पुरात वाहतो; अंतरी साहतो
तो निश्चल निर्लेप तांडव निरंकुश पाहतो

कधी रुदनाला असतात काय दिशा
पाण्यात आसवांच्या बुडते हरेक निशा

मी शब्दपुर लोटतो दुःख कुणास सांगू
मी माझ्याच कवितेला सांगा काय मागू
===========================
सारंग भणगे. (28 फ़ेब्रुवारी 2009)

Sunday, February 22, 2009

हर्षदा

निरागसतेचे वन घनदाट
नवसृजनाची सुंदर वाट
भावतरलता हळव्या लता
बेटावरती या तल्लीनता

प्रगल्भतेचे वाहती वारे
प्रतिभेचे ते शिंपले सारे
शांत शीतल छायेखाली
हिरवळ माया मखमाली

बेट हे सारे निसर्ग सुंदर
काव्यजलाचा वाहे निर्झर
या बेटाच्या अंतरी विमळ
फ़ुले हर्षदा विशुद्ध कमळ
==================
सारंग भणगे. (21 फ़ेब्रुवारी 2009)

Saturday, February 21, 2009

तानाजीची शौर्यकथा

निबीड वनातून कोण चालले काजळ भरल्या अपरात्री
लगिन लावण्या कोंढाण्याचे मर्द निघाले शुभरात्री

धडधडणा-या ह्र्दयरवाला संगत भणाण वा-याची
ढोलीमधले घुबड सांगते काळरात्र ही वै-याची

भिरभिर फ़िरते पाकोळी अन् पाल चुकचुके शंकेची
दूर आरडे टिटवी वाटे थाप पडली डंक्याची

उभा ठाकला कभिन्न कातळ मृत्यूघळ ही खोल दरी
डोळ्यामधल्या अंगाराने लख्ख उजळल्या समशेरी

सरसर चढले अवघा कातळ घोरपडीच्या कसबाने
स्वातंत्र्याचा वन्ही घेऊनि चेतविला जो शिवबाने

'हरहर हरहर महादेवची' सिंहगर्जना दुमदुमली
तलवारीची निर्भीड पाती ढालीसोबत खणखणली

झपकन् फ़िरले खड्ग उडाली गर्दन निर्दय यवनाची
श्रीरामाचे कपीकटक हे लंका जाळी रावणाची

फ़णका-याने फ़ुत्कारीत आला शत्रुदेखिल त्वेषाने
फ़णा काढूनी फ़ुसफ़ुसले ते फ़ुरसे फ़ुसके द्वेषाने

भिडले गजवर मत्त प्राशूनी मदिरा विजयोन्मादाची
तलवारीच्या स्फ़ुल्लिंगातूनी चाळण उडते देहाची

शेल्यावरती झेलून घेतो खड्गाचा जो घाव पडे
भानुसंगे वैर मांडले युद्ध पेटले चोहीकडे

थडथडणा-या धमन्यांमधुनी डोंब उसळले रक्ताचे
प्राण चढविले वेदीवरती स्वातंत्र्याच्या भक्ताचे

रूधिर आता अधीर झाले चिळकांड्यातूनि फ़ुटण्याला
प्राणपाखरू सिद्ध जाहले कायाकोटर सुटण्याला

वर्मी बसला घाव घणाचा बुंधा चिरला वृक्षाचा
देवदार तो कोसळताना शब्द मागतो लक्ष्याचा

अस्मानाचे ह्र्दय फ़ाटले काळिज उलले धरतीचे
सागरह्र्दयी उधाण आले अश्रू उठले भरतीचे

फत्ते केला किल्ला त्यावर भगवा झेंडा फ़डफ़डला
'सिंह देऊनि गड मिळविला' अवघा मावळ गदगदला
=======================================
सारंग भणगे. (जानेवारी-फ़ेब्रुवारी 2009)

Thursday, February 19, 2009

अजून एक सुनी मैफ़ल

अजुनही सुन्या मैफ़लीत गाते
भरुन लोचनी आंत रीक्त रहाते

गोठलेत अश्रू नेत्रातले परी
किती दुःखझरे झरती उरी

श्रृंगार लावणीही वाटते विराणी
एकांत आळवू भरल्या स्वरांनी

अशी आर्त गाते कुणीतरी झुरावे
हे गीत माझे मुक्याने विरावे
=======================
सरंग भणगे (19 फ़ेब्रुवारी 2009)

Thursday, February 12, 2009

राम

राम शब्दाभोवती मोठी जादू आहे
माझ्या मते राम म्हणणारे सारेच भोंदू आहे ॥1॥

'राम नाम सत्य है' आपणच ओरडून सांगायचं
मृतांच्या सख्यांनी ते रडून रडून सांगायचं ॥2॥

जीवनात 'राम' नसूनही आपण जगत राहतो
राम न म्हणणाराही शेवटी बरा 'राम म्हणतो' ॥3॥

जसे आपण भेद पाडले कुणी 'खास' कुणी 'आम'
कुणी बरे बांधल्या भिंती एक अल्ला एक राम ॥4॥

जे फ़ोडतात मशिदी ओरडून आरडून 'राम राम'
पेड क्यूं गिनते हो तुम खाओ सिर्फ़ आम ॥5॥

हेच सूत्र हेच मित्र हाच त्यांचा कृष्ण नि राम
'आम'ला बॉंबची लाही अन् 'खास'ला ए.सी.चा आराम ॥6॥

ज्याच्या मुखी मरतानाही शब्द होते "हे राम"
त्याला उडवणाराही अखेर निघाला न(तु)थुराम ॥7॥

'राम' म्हणून सा-य़ांचेच स्वप्न असते फ़क्त दाम
दामापायी दलाल होऊन विकून टाकला त्यांनी राम ॥8॥

या सा-या लांडग्यांची जातच आहे 'हराम'
राम विकून काढला त्यांनी आता विकायला 'शाम' ॥9॥

भारत प्यारा आपला सारा वेडा आहे
कारण ईथे राम अन् शाम यातही बखेडा आहे ॥10॥

सत्तेमध्ये ईथला एक 'राम'-विलास मग्न आहे
सत्ता नाही म्हणून 'लाल' अन् कृष्णही भग्न आहे ॥11॥

नरसिंहानं हिरण्यकश्यपूचा म्हणे केला होता निःपात
कलयुगी रामासाठी त्यानं एक भुई केली सपाट ॥12॥

नरसिंह जेव्हा एकाचा रामापायी बळी घेतो
शंकर त्याची चार वर्षानी आत्ता कबुली देतो ॥13॥

शंकर देव नरसिंहही देव देवच आहेत राम नि शाम
आपल्याला काय कळतंय, बडे लोगोंका बडा काम ॥14॥

कृष्ण अयोध्येत असताना 'जीवाची' झाली मुंबई
रामापायी दुष्मन झाले कधी काळचे भाई भाई ॥15॥

रामनामाचा पहा जनहो आहे कसा महिमा
रामहि आक्रोशू लागला 'त्राहि मां त्राहि मां' ॥16॥

मुलं पुरूष कापले गेले बायंची लुटली गेली अब्रु
खुप साठवून ठेवले होते त्यांनी डोळ्यात नक्राश्रु ॥17॥

रामा तुझ्यापायी केव्हढे रे झाले हे रणकंदन
'वसंतपुत्र' जाऊन मग पडलं 'शरदा'चं चांदणं ॥18॥

चांदणच ते; त्यानं शेवटी 'प्रकाश पाडला'
भगवा झेंडा हाती घेऊन मग उषेनं सूर्य प्रसवला ॥19॥

'गोपींचा नाथ' त्याची 'मनोहर' कहाणी
'किणीकिणी' वाजत आल्या मागून 'गोपींच्या पैंजणी ॥20॥

चोरीमारी याच कृष्णलीला त्यात सामिल 'शशीचा-कांत'
निळा कशानं झाला रे बाबा तुझा कंठ? ॥20॥

महादेव नि शशिकांत एक सिक्का खरा एक सिक्का खोटा
नाव एक देव एक, मग कसा एक मोठा एक छोटा ॥21॥

एकाची म्यॉंव दुस-याची काव; कुठय 'वाघा'ची डरकाळी
म्हाता-या सिंहाला कशाला बांधली सिंहाची मुंडावळी ॥22॥

एवढ्या भगव्या पहाटेखाली सगळेच बोलणारे भाट
पाच वस्तूंच्या किंमतीत मात्र आमचं हरवलं ताट ॥23॥

आता वेळ अशी आली कि धरावी रेल्वेची पटरी
निघालो तर पहातो काय् गल्लोगल्ली लॉटरी ॥24॥

लोकं तरी अजब किती पोटात नाही भाकरी
फ़क्त झुणका खावून मात्र विकत घेतात लॉटरी ॥25॥

सारा हा महाराष्ट्र पहातो आहे कधीची वाट
कधीतरी येईल का शिवशाहीची अपूर्व पहाट ॥26॥

का म्हणायचे आम्ही नेहेमीच 'वो भारत कहॉं खो गया'
अन् 'रामा हो रामा भारत में हंगामा हो गया ॥27॥
==========================================
सारंग भणगे. (1996/97)

Tuesday, February 10, 2009

ती गेली

ती गेली
जवळूनी
प्राण वायु
कवळूनी

ती गेली
वेडावूनी
बटा बटा
वेळावूनी

ती गेली
पेटवूनी
गोड धुनी
चेतवूनी

ती गेली
भांबावूनी
मज;ठोके
थांबवूनी

ती गेली
हे सांगूनी
रंगात मम
घे रंगूनी
==========
सारंग भणगे. (10 फ़ेब्रुवारी 2009)

दोनाक्षरी

पान पान
गाई गान
दे धरेस
तोय दान

थेंब थेंब
चिंब चिंब
झाकोळून
सूर्य बिंब

धुंद धुंद
मंद मंद
स्मित करे
पुष्प गंध

भाव लुब्ध
शब्द शुद्ध
काव्य रचि
कवि प्रबुद्ध
========
सारंग भणगे. (10 फ़ेब्रुवारी 2009)

Saturday, February 7, 2009

सुन्या सुन्या मैफ़लीत माझ्या....

सुन्या सुन्या मैफ़लीत माझ्या....

तु शब्दात रडला
मी अश्रुत रडलो
तुझ्या अभिनयाने
मी अश्रुत बुडलो

तु अश्रु ते पुरले
मी अश्रुत पुरलो
तु दिगंतात उरली
मी अखंड झुरलो

तु दुःख गाईलेस
सुन्या मैफ़लीत
मी नव्याने रडतो
जुन्या मैफ़लीत

तु गाऊन गेला
अश्रुंचे तराणे
अन् सोडून गेला
अश्रुंचे बहाणे

तु शब्दभार
सांभाळलेस
सुन्या मैफ़लीत
मला भाळलेस

तु गर्ददुःखे
छेडून गेला
ऋण आसवांचे
फ़ेडून गेला

मैफ़लीतून भरल्या
तु उठून गेला
सुन्या मैफ़लीचे
दुःख लुटून गेला

सुन्या मैफ़लीत
गीत गाऊन गेला
सुन्या मैफ़लीची
ओढ लाऊन गेला.
=============
सारंग भणगे. (7 फ़ेब्रुवारी 2009)

Friday, February 6, 2009

षंढ

पुरुषत्व माझे षंढ झाले
आज उडल्या चिंधड्या
क्रुरतेला झाकणा-या
आज उसवल्या गोधड्या

अंधपणाने षंढ पाहतो
धृतराष्ट्रचि मी आंधळा
चोपताना बालतनु ते
जीव केवढा कोवळा

उडूच का नयेत धमन्या
रक्त असे का गोठावे
क्रुर पशूंना निर्दय पाहून
पौरूष का न पेटावे

शब्द झाले कोरडे सारे
भावना जरी भळभळल्या
जीथे कृतीची जोड हरपली
कविता सा-या व्यर्थ गळल्या
=======================
सारंग भणगे. (डिसेंबर 2008)

Thursday, February 5, 2009

निळाई

निळ्या पहाटे
निळे चांदणे
निळ्या क्षितीजा
निळी आंदणे

निळे पर्वत
निळेच पक्षी
निळ्या आकाशी
निळीच नक्षी

निळेच पाणी
निळेच बिंब
निळी कमळे
निळ्यात चिंब

निळ समुद्र
निळ्या लाटा
निळे डोंगर
निळ्या वाटा

निळ्या वनात
निळी शांतता
निळ्या झ-याची
निळी संथता

निळी वर्षा
निळेच मोर
निळी संध्या
निळी विभोर

निलमण्याची
निळी प्रभा
निळ्या ज्योती
निळी आभा

निळाच शंभू
निळा माधव
निळा धनंजय
निळे राघव

निळी संपदा
निळी नवलाई
निळ्या शब्दात
काव्य निळाई
===========
सारंग भणगे. (5 फ़ेब्रुवारी 2009)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...