Thursday, February 12, 2009

राम

राम शब्दाभोवती मोठी जादू आहे
माझ्या मते राम म्हणणारे सारेच भोंदू आहे ॥1॥

'राम नाम सत्य है' आपणच ओरडून सांगायचं
मृतांच्या सख्यांनी ते रडून रडून सांगायचं ॥2॥

जीवनात 'राम' नसूनही आपण जगत राहतो
राम न म्हणणाराही शेवटी बरा 'राम म्हणतो' ॥3॥

जसे आपण भेद पाडले कुणी 'खास' कुणी 'आम'
कुणी बरे बांधल्या भिंती एक अल्ला एक राम ॥4॥

जे फ़ोडतात मशिदी ओरडून आरडून 'राम राम'
पेड क्यूं गिनते हो तुम खाओ सिर्फ़ आम ॥5॥

हेच सूत्र हेच मित्र हाच त्यांचा कृष्ण नि राम
'आम'ला बॉंबची लाही अन् 'खास'ला ए.सी.चा आराम ॥6॥

ज्याच्या मुखी मरतानाही शब्द होते "हे राम"
त्याला उडवणाराही अखेर निघाला न(तु)थुराम ॥7॥

'राम' म्हणून सा-य़ांचेच स्वप्न असते फ़क्त दाम
दामापायी दलाल होऊन विकून टाकला त्यांनी राम ॥8॥

या सा-या लांडग्यांची जातच आहे 'हराम'
राम विकून काढला त्यांनी आता विकायला 'शाम' ॥9॥

भारत प्यारा आपला सारा वेडा आहे
कारण ईथे राम अन् शाम यातही बखेडा आहे ॥10॥

सत्तेमध्ये ईथला एक 'राम'-विलास मग्न आहे
सत्ता नाही म्हणून 'लाल' अन् कृष्णही भग्न आहे ॥11॥

नरसिंहानं हिरण्यकश्यपूचा म्हणे केला होता निःपात
कलयुगी रामासाठी त्यानं एक भुई केली सपाट ॥12॥

नरसिंह जेव्हा एकाचा रामापायी बळी घेतो
शंकर त्याची चार वर्षानी आत्ता कबुली देतो ॥13॥

शंकर देव नरसिंहही देव देवच आहेत राम नि शाम
आपल्याला काय कळतंय, बडे लोगोंका बडा काम ॥14॥

कृष्ण अयोध्येत असताना 'जीवाची' झाली मुंबई
रामापायी दुष्मन झाले कधी काळचे भाई भाई ॥15॥

रामनामाचा पहा जनहो आहे कसा महिमा
रामहि आक्रोशू लागला 'त्राहि मां त्राहि मां' ॥16॥

मुलं पुरूष कापले गेले बायंची लुटली गेली अब्रु
खुप साठवून ठेवले होते त्यांनी डोळ्यात नक्राश्रु ॥17॥

रामा तुझ्यापायी केव्हढे रे झाले हे रणकंदन
'वसंतपुत्र' जाऊन मग पडलं 'शरदा'चं चांदणं ॥18॥

चांदणच ते; त्यानं शेवटी 'प्रकाश पाडला'
भगवा झेंडा हाती घेऊन मग उषेनं सूर्य प्रसवला ॥19॥

'गोपींचा नाथ' त्याची 'मनोहर' कहाणी
'किणीकिणी' वाजत आल्या मागून 'गोपींच्या पैंजणी ॥20॥

चोरीमारी याच कृष्णलीला त्यात सामिल 'शशीचा-कांत'
निळा कशानं झाला रे बाबा तुझा कंठ? ॥20॥

महादेव नि शशिकांत एक सिक्का खरा एक सिक्का खोटा
नाव एक देव एक, मग कसा एक मोठा एक छोटा ॥21॥

एकाची म्यॉंव दुस-याची काव; कुठय 'वाघा'ची डरकाळी
म्हाता-या सिंहाला कशाला बांधली सिंहाची मुंडावळी ॥22॥

एवढ्या भगव्या पहाटेखाली सगळेच बोलणारे भाट
पाच वस्तूंच्या किंमतीत मात्र आमचं हरवलं ताट ॥23॥

आता वेळ अशी आली कि धरावी रेल्वेची पटरी
निघालो तर पहातो काय् गल्लोगल्ली लॉटरी ॥24॥

लोकं तरी अजब किती पोटात नाही भाकरी
फ़क्त झुणका खावून मात्र विकत घेतात लॉटरी ॥25॥

सारा हा महाराष्ट्र पहातो आहे कधीची वाट
कधीतरी येईल का शिवशाहीची अपूर्व पहाट ॥26॥

का म्हणायचे आम्ही नेहेमीच 'वो भारत कहॉं खो गया'
अन् 'रामा हो रामा भारत में हंगामा हो गया ॥27॥
==========================================
सारंग भणगे. (1996/97)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...