Friday, May 29, 2009

प्रथा

दुःखानं भरलेला मळवट घेऊन

ती श्वेतवस्त्रधारा निघालीये...

त्या श्रृंगारलेल्या कलेवराशी,

मृत्युचा समागम करायला...


चपापलेला वारा निस्तःब्ध

तीच्या पदराला स्पर्श होऊ नये म्हणून,

आभाळही रडू कोसळण्याच्या

उंबरठ्यावर तिष्ठत,

अन् मृत्युची निर्लज्ज गिधाडं

क्षितीजावर उभी; आशाळभूतपणे..

मृत्युच्या नोंदवहीत...आणखि एका..

जीवंत मृत्युची नोंद करायला.


आता त्या निर्गुण निर्जीव लाकडांवर,

एक शरीराचा ओंडका...

आणि

प्रथेच्या ज्वाळांची वासना भागवण्यासाठी...

तितिक्षेची अग्निपरीक्षा द्यायला सिद्ध असलेली...

सती!


मानवाSSSS

अशा अमानवी प्रथा निर्मिताना

तुला कारूण्याचा

एकही टाहो न फ़ुटावा?
==================
सारंग भणगे. (27 मे 2009)

Wednesday, May 20, 2009

जाग अनावर होतीये

शब्दाशब्दांची नक्षत्र
कविता; निशानभात कोरतीये,

आणि डोळ्यावर झापडणा-या
झोपेचं सावट झुगारून,

मित्रांनो,
'जाग अनावर होतीये'
=========================
सारंग भणगे. (19 मे 2009)
--------------------------

गडद काळ्या तमाचीही

तमा न करता;

फ़टफ़टणारी उषा...

तांबड्या क्षितीजाच्या गर्भाला ढुशा देतीये,

पहाटवा-यात गुंगलेल्या झोपेच्या शांत डोळ्य़ात...

उगवत्या प्रभेची...

'जाग अनावर होतीये'

===========================
सारंग भणगे (19 मे 2009)
---------------------------

त्या किशोर लोभस...

अस्तित्वाच्या मोरपिसानं

बाला; काळजाच्या रूपेरी वाळूत...

प्रणयचित्र रेखाटतीये..

अन् नुसत्या दिसण्यानं स्पंदनांच्या संवेदनांना...

'जाग अनावर होतीये'
=====================
सारंग भणगे (19 मे 2009)
---------------------

रस्त्याकडेच्या लाचार लुत भरलेल्या जगण्याला,

अस्तित्वाच्या लोपलेल्या जाणीवांची...

जाणीव होतीये...

अन् भूकेच्या मुलभूत हकासाठी,

मूठ उभारण्याची मूक....

'जाग अनावर होतीये'
=========================
सारंग भणगे. (19 मे 2009)
--------------------------

दारिद्र्याचा अविरत संग्राम,

दुर्भाग्याची वैभवी गणितं..

आता कुठे मांडतीये..

अन् या जातक प्रश्नांची

असणारी उत्तरं मागण्याची..

'जाग अनावर होतीये'
=======================
सारंग भणगे. (19 मे 2009)
------------------------

धुक्याचं पांघरूण दूर सारून,

पहिल्या कोवळ्या पिवळ्या किरणानं पहाट;

हिरव्या कच्च पानाच्या कानात कुजबुजतीये,

अन् मंद वा-याच्या हलक्या स्पर्शानं...

चाळवलेल्या भरगच्च वनात...

'जाग अनावर होतीये'
==============================
सारंग भणगे. (22 मे 2009)
------------------------------

काळाच्या अविरत चक्रावर

निसर्गाच्या हातांची किमया...

मातीच्या भांड्याला...

रेखीव आकार देतीये,

अन् शैशवाच्या ऊत्तर प्रहरातुन

तारूण्याच्या पहाटेला........

'जाग अनावर होतीये'
====================
सारंग भणगे. (23 मे 2009)
------------------------

पंचमहाभुतांची त्रिगुणबद्ध..

शरीराची नश्वर कुडी

पंचतत्वात विलीन होतीये,

अन् चैतन्याला चिरंतन कैवल्यमुक्तीची,

'जाग अनावर होतीये'
=====================
सारंग भणगे. (31 मे 2009)
-------------------------

नितळ रात्रीच्या ऊत्तरप्रहरी,

निळ्या चांदण्याला बिलगुन..

निजलेली लाजरी मोगरी..

पहाटेच्या मंद समीराला..

मोहवतीये,

अन् ढोलीतल्या खोप्यात पहुडलेल्या..

भारद्वाजाच्या निद्राधीन डोळ्यात,

सुर्याच्या पहिल्या सालस किरणांची..

'जाग अनावर होतीये.'
=====================
सारंग भणगे. (21 जुन 2009)
------------------------

थिजलेल्या काळजावर

भितीचं सावट,

दहशतीच्या अंधारविश्वात

सलोख्याची सर्द ज्योत...

वारंवार थरथरतीये...

अन हिरवी-भगवी रंगभिन्नतेची संवेदना..

काळ्यापांढ-या डोळ्यात,

धुसर करणा-या..

रंगांधळेपणाची..

"जाग अनावर होतीये"
==================
सारंग भणगे. ७ जुलै २००९
--------------------

अल्लड हिरवाईच्या देठातुन फ़ुटून

अलगद उमलु पाहणा-या कळीला,

यौवनाची गुलाबी छटा खुणावतीये..

अन उत्फ़ुल्लित शरीरात उफ़ाळणा-या..

डौलदार सौष्ठवाला...

"जाग अनावर होतीये"
==================
सारंग भणगे. २१ जुन २००९
--------------------
सरीवर सरी झेलत
सरलेल्या जीवनाच्या सरीतुन
एकेक कवडी गळत
सरणाकडे सरकतीये,

अन जीवनाला मरणाची...
"जाग अनावर होतीये"
===========
सारंग भणगे. (२३ मार्च २०१०)

Tuesday, May 19, 2009

माणूस

टोचणा-या पावसाच्या सुयांनी झोडपलस,

कोळपून जाऊस्तोवर ग्रीष्माचे दाह दिलेस,

बोचणा-या थंडीत पानापानांना ओरबाडत राहिलास...

पण मी अजुन उभाय,

येणा-या - जाणा-याला सावली देत,

अन् सा-याच निर्वासितांना..

माझ्या खांद्या-फ़ांद्यांचा आसरा देत...


अन् म्हणे तुच चालवतोस सा-यांचा योगक्षेम!!


अरे तुलाही केव्हाच बसवलाय तुझ्याच भक्तांनी,

माझ्याच बुंध्याच्या सावलीला...




शेंदुर फ़ासून!!!
========================
सारंग भणगे. (18 मे 2009)

Monday, May 18, 2009

बेमुर्वत

तोडून टाकले मी उद्दाम पाश सारे
भोगू देत मजला हे अवकाश सारे
उरावरी कोसळावे नभांगण अवघे
पिऊन आज आलो आहे प्रकाश सारे

प्रत्येक भैरवीला मी साथ देत गेलो;
माझ्यावरीच आले माझे विनाश सारे

क्षितीज फ़ेकले सीमान्त आभाळासाठी
पंखास साद देती अवघे दिक्काश सारे

सोडून कौपीनाला झालो निर्वस्त्र जोगी
पसरून आज व्हावे पूर्ण निराकाश सारे
==================================
सारंग भणगे. (18 मे 2009)

Sunday, May 10, 2009

ऋषी पराक्रमाची परिक्रमा

महाकोपिष्ट या दुर्वासाने नीरसिंधु प्राशिला,
परजुनि परशु भार्गावाने खलक्षात्र नाशिला

महातपस्वी वसिष्ठांनी कामधेनुही तोषविली,
प्रतिभाभास्कर वाल्मिकीने रामभुषणे भूषविली.

व्यासंगाने व्यासमुनीने अवघे विश्वचि उष्टविले,
नारायणनामे नारदाने निखिल चराचर तुष्टविले.

वीतरागी विश्वामित्रे विश्व पुनश्च निर्मियले,
आचार्यांनी सनातन या संस्कृतीस तारियले.
==================================
सारंग भणगे. (फ़ेब्रुवारी 2009)

Sunday, May 3, 2009

डायरी

लिहील्या खुप कविता तरी कोरीच डायरी
स्पर्शून भावनास गेली आटून ओली डायरी

प्रत्येक तारखेची पाने सारखीच तरीही
सारख्याच तारखात गेली हरवून डायरी.

गेली भरून पाने दूरध्वनि किती लिहून
नाती कशी जुळावी अशी भरून डायरी.

चाळताना सहज मिळावे जीर्ण पिंपळपान
आणि मिळून यावी जणू जुनीच डायरी.

होत्या मनात तशाही सुकलेल्या आठवणी
प्रत्येक पान झाले स्मृतींची एक डायरी.

किती लिहावे शब्दांना मग येतो कंटाळा
भरून तरी उरे रिकामी हमखास ही डायरी.
============================
सारंग भणगे. (3 मे 2009)

पुन्हा एक वादळ...

माजलेले काहूर होते; अंधार होता चपापलेला,
ऊर रान-सावल्यांचा भयाणतेने धपापलेला.

मेघाळल्या नभी होता आक्रोश लुप्त चांदण्याचा,
वादळाचा छंद असतो शांततेशी भांडण्याचा.

फ़ुल-पाखरे बुजून गेली; निपचित पडली मऊ लव्हाळी,
भणाणलेल्या वा-याने अन् दणाणलेली अरण्यजाळी.

खोल दरीच्या कंदरातून सुसाट वारा झपाटलेला,
उंच गिरीच्या छाताडावर आदळणारा पिसाटलेला.

ते पहा फ़ुफ़ाट आले लोट विराट वादळाचे,
व्योम-अवसुधा सिंधु-सरिता कवळ केवळ वादळाचे.

धरा कापे थरथरा; जर्जर करण्या सृष्टी जंरा,
गिळून टाकण्या चराचरा; यमजबडा वाजे करकरा.

वावटळीच्या सपाट्याने सपाट झाले विशाल तरूवर,
धूळधाण ही अलोट झाली; जंगम झाले सारे स्थावर.

शंख दुंदुभि आनक शिंगे गर्जती सारी रणवाद्ये,
मृत्युॠचांचा उद्घोष घुमला या वादळ यज्ञामध्ये.

भेसूर उठले मत्त आसूर सुरा प्राशूनि बेधुंद,
बेसूर सुरावट वादळाची भैरव तांडव बेबंध.

गर्वीष्ठ भव्य प्रासादांचे उंच इमले कुलंथले,
संतापाने वादळाच्या विश्वचि अवघे मंथले.

ऐसे बरसे प्रपात अवनि गगनचि अवघे कोसळले,
आघाताने प्रचंड त्यांच्या दुर्गकडेही कोसळले.

घुसळलेल्या उदधिमध्ये ऊसळती उंच अजस्त्र लाटा,
भीषण थैमानाने पुसल्या युगायुगांच्या सुरम्य वाटा.

किती फ़ुटावे; शब्दचि थटले; थकले नाही आंतर वादळ,
स्वस्थतेला ध्वस्त करूनि व्यस्त पुन्हा वादळी दळ.
=========================================
सारंग भणगे. (2 मे 2009)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...