Friday, July 24, 2009

तळे


उंच सुंदर डोंगर होते
तळास त्यांच्या तळे होते
आभाळाच्या प्रतिबिंबाने
पाणी तळ्याचे निळे होते

सभोवताली झाडे हिरवी
रंगीत पक्षी नभात मिरवी
गालांवरती अवखळ वारा
हात, तळ्याच्या अलगद फ़िरवी

उठे शिरशिरी जळावरती
गोड लहरी तळ्यावरती
हसू उमलते ओठांमध्ये
भान उरे ना ताळ्यावरती

मऊ लव्हाळी हळवी काठी
पानफ़ुलांची सुरम्य दाटी
प्रतिबिंबातुन तळे घेते
आकाशाशी गाठीभेटी

नभी अचानक मेघ जमले
गगन मंदिरी म्रुदंग घुमले
तळ्यामधल्या जळासंगे
जळथेंबांचे नाते जमले

तळ्यात काही जळचर होते
दर्शन त्यांचे पळभर होते
नितळ निळ्या पाण्यावरती
स्फ़टिक शुभ्र ते दहिवर होते

कमळफ़ुलांची पुष्करिणी
तळ्यात फ़ुलली कुमुदिनी
मोहक रमणी रूपवती
जणू पाहे निळ्या दर्पणी

नभी अवतरे शशांक रात्री
हळुच ऊतरे निलजलपात्री
अंग झाडता गळे चांदणे
तळे शहारे पुलकित गात्री

नि:शब्द रात्रीच्या ऊत्तर प्रहरी
ऊभा पाहुनि ध्यानस्थ गिरी
वरती ऊठती चंचल लहरी
निश्चल होते तळे अंतरी

निश्चल होते तळे अंतरी
========================
सारंग भणगे. (जुलै २००९)

1 comment:

सारंग भणगे said...

सारंगाचा शब्द कुंचला
सामर्थ्याने निसर्ग टिपला
कविता वाचुन भान गळाले
काठ तळ्याचा डोळा दिसला

सारंग...
कविता अ....फा.....ट आहे !!

सारंग,
एक नक्की...! तुझी कविता वाचताना या धाग्यावर दोघातिघांना बालकविंची आठवण व्हावी, यातच तुझ्या या कवितेचं मोठेपण आहे.
१) "नाम" म्हणाले त्याप्रमाणे हा निखळ शान्तरसाचा उत्कृष्ट नमुना आहे.
२) निसर्गाच्या नाजुक रूपाचं वर्णन करताना वापरलेला शब्दसंचय खरोखरच अद्भुत..!
३) निसर्गाच्या स्वाभाविक गतिप्रमाणे कवितेत सुध्दा गतिमान लयबद्धता आहे.
४) अवखळ वारा तळ्याच्या गालावर हात फिरवतो, लहरींच्या रूपात तळ्यावर शिरशिरी उठते, प्रतिबिंबातून तळे आकाशाशी भेटगाठ करते, मेघ हे गगनमंदिरातले मृदंग, नितळ निळ्या पाण्यावर शुभ्र दहिवराचे स्फटिक, तळ्यात फुललेली कुमिदिनी म्हणजे जणु निळ्या दर्पणात चेहरा पाहणाऱ्या रमणी, रात्री नभात शशांक अवतरतो, अंग झाडता चांदणे हळते..... एवढ्या ताकदीच्या इतक्या उपमा आणि उत्प्रेक्षा एकाच वेळी वापरल्या गेल्याचं मी याआधी फक्त महाकवि कालीदासाच्या काव्यात पाहिलं होतं... तसे बरेच जण अशा उपमा देण्याचा प्रयत्न करत असतात, पण इतकी सहज लालित्यपूर्ण शैली क्वचितच सापडेल...!
५) अशा मोहक मदमत्त निसर्गानं वेढलेलं असल्यानं वरकरणी कितीही चंचल लहरी उठत असल्या तरी काठावरच्या ध्यानस्थ पर्वताला पाहून तळे आत खोलवर निश्चल होते..... कवितेला हा विचार वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. (वेगळाच संदर्भ आठवला : या निशा सर्वभूतानाम् तस्यां जागर्ति संयमी। यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने:॥ समस्त जीवांची जी रात्र, तेंव्हा संयमी जागतो... आणि जिथे सर्व जीव जागरूक असतात, त्या भौतिक व्यवहारास मननशील मुनी रात्र मानून दुर्लक्षित करतो --- भगवद्गीता)

असंच लिहीत रहा..... एवढंच म्हणेन...!

स्वामीजी

Related Posts Plugin for WordPress, Blogger...