Tuesday, September 28, 2010

"शारदशोभा"

निळे सुंदर वैभव विलसे,
हिरवी माया गर्भार हसे,
वाद्यवृंद तो मेघस्वरांचा,
सलील संगीत वर्षा बरसे.

क्षणात पिवळे क्षणात काळे,
सात स्वरांचे रंग आगळे,
कधी कवडसे मुठीत गवसे,
मूठ उघडता तुषार भोळे.


सौंदर्याची शारद शोभा,
जणु मेनका उर्वशी रंभा,
गगन मंडपी शुभ्र चांदणे,
कोजागिरीची सालस आभा.

इंदुसंगे असंख्य तारका,
सहस्त्र-कांता कृष्ण द्वारिका,
चांदण भरल्या तडाग काठी,
रास खेळती कृष्ण गोपिका.

तृप्त चांदणे अमृत झरते
सरींकरिता सरिता झुरते,
सळसळणा-या पानांमधुनी,
सरीसरींनी सलील सरते.

भ्रमरास मोहवी रास फुलांचा,
रसपान खगांना मधुर फळांचा,
उमलुन उदरी कोमल अंकुर,
स्तनपान सोहळा हरीत मुलांचा.

पुर्वा उधळीत झेंडु बकुळा,
हिरवी धरती पिवळ्या माळा,
निळ्या तडागी शुभ्र पाखरे,
रंगवैभवी शारद लीळा.

- सारंग भणगे. (२७ सप्टेंबर २०१०)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...