Wednesday, January 26, 2011

स्वरसेन हरपला

स्वरनाद असा स्वर्णखड्गाचा खणखणाट जणु
स्वरस्पर्श असा चैतन्याचे सळसळती रेणु जणु

स्वररास असा मधुप्रपाताचे अभिसिंचन जणु
स्वरगंध असा केशरकस्तुरीचा परिमळ जणु

स्वरआर्त असा गहनगुहेच्या तळात हुंदका जणु
स्वरगंभीर असा घनगर्दगगनी मेघ-हुंकार जणु

स्वरज्ञानी असा गणपतीत वसे बृहस्पती जणु
स्वरवैभवी असा लक्ष्मीत वसे सरस्वती जणु

स्वरयोगी असा योगेश्वर जन्मे बुद्धात जणु
स्वरभास्कर असा भास्करही भासे चंद्र जणु
====================
सारंग भणगे. (२६ जानेवारी २०११)

Sunday, January 16, 2011

गेल्या सुचून ओळी...

माळून आज आली
केसात मोगरा तू
आणि वसंत फुलला

पाण्यात पाहतना
आले हसू तुला गं
आणि तरंग उठला

घेई कटीवरी ती
घोटीव ज्या घटाला
उसळून तोच फुटला

स्पर्शून अंग ओले
गेला खट्याळ वारा
अन झंझावात सुटला

लाजून लाल झाले
दोन्ही कपोल गोड
अवचित सांज झाली

पाहून 'वादळाला'
सर्वांग शब्द झाले
गेल्या सुचून ओळी.
==========
सारंग भणगे. (१६ जानेवारी २०१०)

Saturday, January 15, 2011

अशा आर्त कविता कविने लिहाव्या

अशा आर्त कविता कविने लिहाव्या
वाचून प्रेतात आत्मा जगावा
शब्दांनी भांडून ठिणग्या फुटाव्या
कविता पाहून वणवा उठावा
अशा आर्त कविता कविने लिहाव्या


अशा आर्त कविता कविने लिहाव्या
दुष्टास सुष्टाची स्वप्ने पडावी
माणूस पेटून मशाली जळाव्या
काळीज फाडून मराठी रडावी
अशा आर्त कविता कविने लिहाव्या


अशा आर्त कविता कविने लिहाव्या
गर्भात ऐकून शिवबा रुजावा
डोळ्यात जान्हवी-जमुना वहाव्या
अमृतात तुकया-ज्ञाना भिजावा
अशा आर्त कविता कविने लिहाव्या
==============
सारंग भणगे. (१५ जानेवारी २०११)

Friday, January 7, 2011

जोगवा

पेटलेले अंग माझे तंग चोळी काढ ना,
भूक माझी वाढते रे प्रेम ताटी वाढ ना.

घे उभारी या उभारी; ऊर भारी जाहला,
बाहुलीला बाहुपाशी घेई माझा बाहुला.

नागिणीचा घाट आहे नागमोडी नागवा,
जागलेल्या जोगीराजा मागते मी जोगवा.

खोडी काढा; खोड जिरवा; खड्ग आता काढुनी,
संगिनीचा संग आता सोंगटीशी जोडुनी.
=====================
सारंग भणगे. (२०१०)

Thursday, January 6, 2011

IIतु सुर्य हो मुला रेII

हा सुर्य वेदनेचा उजळुन ये मनाशी,
तु सुर्य हो मुला रे चिरंजीव अविनाशी.

माझ्या ह्रुदय गगनी सुर्यात तुझाच भास,
घे उंच तु भरारी गूजगोष्टी गगनाशी.

पाहेन मी तुला रे उंचावुनी रे माना,
सोडुनि मानपाना बिलगुन ये स्तनाशी.

वाटेत सावलीला घेशील श्वास थोडा,
घेशील भेट तेव्हा हलकेच जीवनाशी.

अटळ दु:ख आहे; कशास दु:ख त्याचे,
दु:खास तोंड देता जा बोल वेदनांशी.

जाशील दूर तरिही विसरू नकोस माती,
आजन्म असती नाती; अवघे अन्य विनाशी.

नसशील तु समीप आठव तुझे अमाप,
नित-नित रे विनित तुज आठवेन मनाशी.
====================
सारंग भणगे. (५ जानेवारी २०११)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...