Saturday, August 27, 2011

तुझ्या मिठीत


तुझ्या मिठीत सुखाने विसावले होते,
धरा धरून नभाचेहि फावले होते.

हिरे रुपे धनधान्यात जो बुडालेला,
खरे खुरे सुख त्याचे हिरावले होते.

नशा तुझ्या गझलांची अवीट रे होती,
तुझ्या पुढे परवाने स्थिरावले होते.

मुठीत बंद कराया कुणी निघालेले,
तुटून बोट तयांचे निभावले होते.

मला किती बघताती वळूवळू वेडे,
सर्वांग सुंदर कायेसि भावले होते
========================
सारंग भणगे. (ऑगस्ट २०११)

कविता व्हावे जीवन

कवितेच्या दवबिंदूंनी आयुष्याचे पान सजावे,
लाटांवरती आयुष्याच्या नाव कवितांचे तरावे.

खिन्न मनाला पाणी घाली पाउस वारा गोंजारत जातो,
रोपाला या आयुष्याच्या ऊन कवितांचे मिळावे.

मातीवरती धावत जाती गवताची हि नाजूक पाती,
आयुष्याच्या मातीमधुनी काव्य-तृणांनी मूळ धरावे.

चुंबन घेती डोंगर शिखरे पहाट होते चूर बावरी,
आयुष्याच्या अधरांनीही काव्य-उषेच्या मधात न्हावे.

नितळ तळ्याच्या निळ्या जळावर वारा उठवी 'लहरी' वादळ,
पवन-प्रतिभा तडाग-जीवन तरंग-कवितांचे बनावे/ उठावे.

झरझर निर्झर नयन मनोहर सलील गाणी गातो सुंदर,
निर्झर बनुनी आयुष्याने गीत कवितांचे म्हणावे.

कृष्ण-निशेला नभात रचती चंद्र तारका रास-चांदणे,
जीवन-रात्री मानस-व्योमी काव्य चांदणे मुग्ध खुलावे.

वसुंधरा हि उपवर होते श्रावण येतो कवेत घेतो,
आयुष्याच्या भवसृष्टीने काव्य-सरींनी भिजून जावे.

कुसुमांवरती अलगद आली गुलाल लाली प्रभात वेळी,
जीवनपुष्प हे काव्यछटांचे रंग लेऊनी गंधित व्हावे.

रवीबिंबाच्या हेमकणांनी सुंदर दिसते अंबर अवघे,
आयुष्याच्या गगनालाही काव्य-रवीने कवेत घ्यावे.

सुंदर चित्रे सृष्टीमधली काव्य जणू ते भगवंताचे,
कविता व्हावे जीवन आणि कवितेमधुनी जिवंत व्हावे.
==================================
सारंग भणगे (जुलै २०११)

Wednesday, August 24, 2011

पहाटवारा सांगत होता

पहाटवारा सांगत होता रात्र भयाण सरली आता,
अंधारात बुडालेल्या उजळून आल्या विराण वाटा.

पहाट वाटे सुंदर त्यांना ज्यांची होती रात्रही सुंदर,
खिन्न-कभिन्न रात्र जयांची पहाट त्यांची असते धूसर.

प्रेतकळा ती गावावरती लुटली होती अब्रू त्यांची,
लुचली होती गाई-गुरांना क्रूर गिधाडे वासनांची.

स्फुंदत होती; कण्हत होती; रात्र क्रंदूनी म्हणत होती,
कणाकणाने विरघळणारी क्षणाक्षणाने शिणत होती.

आक्रोश होता; आकांत होता; होते हुंदके दबके दबके,
मिटक्या मारीत जनावरांनी रवंथ केले चघळीत लचके.

जळवा पिसवा रक्तपिपासू घोट चवीने रिचवित होत्या,
हिंस्त्र पशूंच्या लंपट जीव्हल्या भूक युगांची शमवित होत्या.


ओरबाडूनी पान-फुलांना आता हुंगती नवी पालवी,
लक्तर लक्तर चिवडित होते; चाटत चाटत लाळ कालवी.

तिथे जवळच मंदिर होते हाकेच्या बस अंतरावरती,
दुग्ध-दह्याचे ओघळ होते पाषाणाच्या पिंडीवरती.

निर्घृण होती रात्र जरी ती निश्चल होते देव नि मानव;
वखवखलेले नाचत सुटले नृशंस तांडव मांडून दानव.

खापर फुटले; छप्पर तुटले; पहाटरश्मी डोकावीत होता,
पहाटवारा सांगत होता; बघ्या-भूतांना बोलावीत होता.
===================================
सारंग भणगे. (२३ ऑगस्ट २०११)

Saturday, August 6, 2011

याला काय आयुष्य म्हणावे?

जिवंत आहे म्हणून जगणे
याला काय आयुष्य म्हणावे?
मरत नाही म्हणून मरत रहाणे
याला काय आयुष्य म्हणावे?

जगण्यासाठी हव्यात इच्छा
उत्साह हवा नवा नवा
श्वासामध्ये भरली हवा
त्याला काय आयुष्य म्हणावे?

पहात नाही आकाश निळे;
निळे डोंगर; निळा खंड्या,
मात्र पहाती 'निळा सिनेमा'
त्याला काय आयुष्य म्हणावे?

मरण्याचीही क्षिती नव्हती
क्षितीज त्यांचे 'स्वतंत्र' होते,
आपली क्षितिजे 'गाडी बंगले'
त्याला काय आयुष्य म्हणावे?

खोटे दिसणे खोटे हसणे
खोटी नाती, खोटी ना ती?
खोट्याचीहि होते खोटी
त्याला काय आयुष्य म्हणावे?

दमतो पुष्कळ; रोज पळापळ
पैशासाठी सारे व्याकूळ
भरले घर पण ते गोकुळ नाही
त्याला काय आयुष्य म्हणावे?

झेपावयाचे पण झेप झेपेना
झोपलेलो; पण झोप येईना
झापड खाऊन झापड जाईना
त्याला काय आयुष्य म्हणावे?

आयुष्य आहे बहुत सुंदर
सुंदर त्याचा लेखाजोखा
आपल्या लेखी सुंदर (फक्त) काया
त्याला काय आयुष्य म्हणावे?

चला जगूया जरा नव्याने;
आनंदाने गाऊ गाणे थव्याथव्याने
पुसून सवाल असले; पुन्हा न पुसणे
याला काय आयुष्य म्हणावे?
याला काय आयुष्य म्हणावे?
========================
सारंग भणगे. (२ ऑगस्ट २०११)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...