कवितेच्या दवबिंदूंनी आयुष्याचे पान सजावे,
लाटांवरती आयुष्याच्या नाव कवितांचे तरावे.
खिन्न मनाला पाणी घाली पाउस वारा गोंजारत जातो,
रोपाला या आयुष्याच्या ऊन कवितांचे मिळावे.
मातीवरती धावत जाती गवताची हि नाजूक पाती,
आयुष्याच्या मातीमधुनी काव्य-तृणांनी मूळ धरावे.
चुंबन घेती डोंगर शिखरे पहाट होते चूर बावरी,
आयुष्याच्या अधरांनीही काव्य-उषेच्या मधात न्हावे.
नितळ तळ्याच्या निळ्या जळावर वारा उठवी 'लहरी' वादळ,
पवन-प्रतिभा तडाग-जीवन तरंग-कवितांचे बनावे/ उठावे.
झरझर निर्झर नयन मनोहर सलील गाणी गातो सुंदर,
निर्झर बनुनी आयुष्याने गीत कवितांचे म्हणावे.
कृष्ण-निशेला नभात रचती चंद्र तारका रास-चांदणे,
जीवन-रात्री मानस-व्योमी काव्य चांदणे मुग्ध खुलावे.
वसुंधरा हि उपवर होते श्रावण येतो कवेत घेतो,
आयुष्याच्या भवसृष्टीने काव्य-सरींनी भिजून जावे.
कुसुमांवरती अलगद आली गुलाल लाली प्रभात वेळी,
जीवनपुष्प हे काव्यछटांचे रंग लेऊनी गंधित व्हावे.
रवीबिंबाच्या हेमकणांनी सुंदर दिसते अंबर अवघे,
आयुष्याच्या गगनालाही काव्य-रवीने कवेत घ्यावे.
सुंदर चित्रे सृष्टीमधली काव्य जणू ते भगवंताचे,
कविता व्हावे जीवन आणि कवितेमधुनी जिवंत व्हावे.
==================================
सारंग भणगे (जुलै २०११)
No comments:
Post a Comment