पापणी खालून तीर सोड नि कर वार सखे,
जिवणी खालून हसता चालते तरवार सखे.
हंसकांतीची मयूर सुंदरी मृगनयना तू,
हरिणीपरी तू चालून करशी संहार सखे.
सौष्ठव तव ते जरी झाकण्या प्रावरणे असती,
वसनामधुनी उमलूनी येती आकार सखे.
का उगा गजरा खोवून येशी वेणीमध्ये,
का उगा करावा चंद्रानेही शृंगार सखे.
जिंकण्यासाठीच जंग जंग मी पछाडतो तुज,
हारही आहे स्वीकार परि ना धिक्कार सखे.
तुजवरी मरणे हक्कचि माझा जन्मापासून,
तू एकच असशी जगण्यासाठी आधार सखे.
तू माझे जगणे माझे जीवन औषध माझे,
मी तुझाच रोगी तुझाच मज अन आजार सखे.
चांदण्यात भरली ओंजळ असते अंधाराची,
रात्रीस मजला असाच पाहिजे शेजार सखे.
मी वेडा झालो प्रीतीमध्ये हसती मजला,
तू परि हासता वेडावुनी मज सत्कार सखे.
बोथट जरीहि उपमा तरीहि तू चंद्रचि माझा,
हा मनातला मम दूर जाहला अंधार सखे.
धगधगणा-या ज्वालामुखीचा लावा जरी तू,
कवेत मजला घेऊनी विझवी अंगार सखे.
हे चारुगात्री रात्री गात्रे फुलविशी माझी,
हे व्योम तु धात्री प्रीतीदात्री स्वीकार सखे.
राग मी गातो आळविताना तुजला सारंग,
तारा मनीच्या छेडून उठती झंकार सखे.
============================
सारंग भणगे (२३ ऑक्टोबर २०११)
No comments:
Post a Comment