Friday, November 25, 2011

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली,
तारे नि चांदणीला बिलगून रात गेली.

काळ्या नभात नक्षी नक्षत्र तारकांची,
रसिकास जागणा-या रिझवून रात गेली.

करते अमावासेला अंधार आपलासा,
मग कोर चांदव्याची खुलवून रात गेली.

हातात हात घेई ते हात चांदण्याचे,
पाशात रातराणी विसरून रात गेली.

ओवून तारकांना माळा गळ्यात घाली,
माळून चंद्र भाळी भुलवून रात गेली.

लावण्य काय वर्णू या यामिनी परीचे,
प्रेतात कामपीडा उठवून रात गेली.

आहे स्तनात माझ्या हे दूध चांदण्याचे,
वेडे चकोर सारे खिजवून रात गेली.

होत्या कडा रुपेरी त्या सावळ्या ढगांच्या,
मग केशरी कळ्यांना पसरून रात गेली.

ओठावरी फुलांच्या गाते पहाट गाणी,
गाणे मधाळलेले सुचवून रात गेली.

संकेत मीलनाचा देतो प्रशांत वारा,
प्राची शशांक भेटी ठरवून रात गेली.

भासे धरेवरी हे आकाश चांदण्याचे,
राने जमीन सिंधू भिजवून रात गेली.

पिवळी मिठी उन्हाने हिरव्या धरेस देता,
स्पर्शात तांबड्याच्या हरखून रात गेली.

गर्वात यौवनाच्या चंद्रास जाळु पाही,
चुंबून त्या रवीला हरवून रात गेली.

अपुल्याच पावलांचे सोडून माग जाते,
भेटायचे पुन्हा हे शिकवून रात गेली.
==========================
सारंग भणगे. (२१ ऑक्टोबर २०११)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...