Saturday, December 10, 2011

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझाच मी शोध घेत आहे,
किती जरी सांगतो मनाला तुझाच ते ध्यास घेत आहे.

नसूनही तू मला दिसावी; रडून ही असावे हसावी,
तुझे असे खेळ जीवघेणे खुळावूनी प्राण घेत आहे.

अजाणता जाणता तुला मी हळूच गे घेई बाहुपाशी,
मनातल्या मी मनात माझ्या तुझीच रे भेट घेत आहे.

भले न द्याव्या कुणीच टाळ्या; कडा पुसाव्यात लोचनाच्या,
तुझ्याच हे गीत वेदनांचे अजूनही दाद घेत आहे.

जगू कशाला तुझ्याविना मी मारायचे आज काय बाकी,
तरी कधी वाटते मला कि तुझाच मी श्वास घेत आहे.
=====================================
सारंग भणगे. (२० नोव्हेंबर २०११)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...