Saturday, August 25, 2012

काहूर

जळलेल्या काळजाचा धूर
ध्वस्त मनातील काहूर
स्वप्ने विरून गेलेली
जळून गेलेला कापूर.
उदासीचे शेवाळे दाटले
तळ्यातले पाणी आटले
एक तारा निखळला अन
मनाचे अवकाश फाटले
सारीच गाणी विराण्या
मनात मरण कहाण्या
काळजात फक्त जखमा
साऱ्याच जुन्या पुराण्या
स्वप्नांचे इमले कोसळले
दीपस्तंभ हि ढासळले
फोफावले दु:खाचे तण;
आशांचे तृण काजळले
अस्तित्व गेले खंगून
जिजीविषा गेली भंगून
आता झालो एक शून्य
गेलो अनंतात रंगून
================
सारंग भणगे. (१९ ऑगस्ट २०१२)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...