पतंग बनुनी उगाच गगनी फिरत राहिलो कधी
पाण्यामधल्या पानासम अन वाहत गेलो कधी
शब्द तुझे मी स्तब्ध होउनी कधी ऐकले नाही
सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही
सूर्य जाहलो नभी एकटा उगवुन मी मावळतो
चंद्राभवती अगणित तारे म्हणून त्यावर जळतो
गगन मंडपी भेटावेसे स्वप्न पाहिले नाही
सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही
वाटांवरती एकलकोंड्या तिचीच सोबत होती
मृगजळ होऊन माझ्या पुढती प्रियाच चालत होती
हात सोडणे होते नशिबी धरणे जमले नाही
सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही
चिरविरहाने डोळ्यांमध्ये अश्रू वाहत होते
दृष्टी पुढचे दृश्य धुक्याचे धूसर धुरकट होते
पुढ्यातले ते रूप प्रियेचे, मजला दिसले नाही
सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही
हाक मारता एक जरी तू धावत आलो असतो
वादळ वारे काहूर सारे फोडत आलो असतो
जरी घुसळला अवघा सागर अमृत तरले नाही
सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही
मुकी आंधळी प्रीत आपली सरली सरणावरती
तुझे वराती मुकेच रडती माझ्या मरणावरती
तुझी पाठवण करून आता काही उरले नाही
सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही
=============================
सारंग भणगे. (२५ ऑगस्ट २०१२)
No comments:
Post a Comment