कविता कशाला म्हणायचं? हा प्रश्न कधी कधी फारच गहन होत जातो. आशयाचा अभाव असलेल्या, म्हणजेच एका अर्थाने आत्माच हरवलेल्या, कित्येक काव्य सदृश रचना आपण अनेकदा वाचतो, पाहतो. त्यांना कविता म्हणावेच लागते, कारण त्या रचना या पद्यात्मक असतात.
याउलट कित्येक रचना या मुक्तछंदामध्ये सहज लेखणीतून झिरपलेल्या असतात, परंतु त्या मनावर कितीतरी खोल ठसा ठेऊन जातात. त्यातील आशय विचार गर्भ असतोच परंतु तो विचार करायला प्रवृत्त करणारा देखील असतो. परंतु त्यांची रचना काही वेळा काव्याच्या (खरेतर पद्याच्या म्हटले पाहिजे) मूळ नियमांमध्ये बसत नसते. अर्थात, अशा अनेक रचना मुक्तछंदीय कविता म्हणून सर्वमान्य आहेतच. परंतु तरीही या कवितेच्या निमित्ताने काव्य आणि पद्य, (कवितेचे) तंत्र आणि मंत्र याविषयी विचार मनात येऊन गेले.
अरविंद पोहरकरांच्या काव्यरचना यापूर्वी मी वाचल्याचे स्मरत नाही. त्यामुळेच कदाचित मी त्यांच्या कवितेविषयी मनामध्ये काहीच गृहीत न धरता, कुठलाही पूर्वग्रह किंवा अपेक्षा न बाळगता त्यांच्या या कवितेचा रसास्वाद घेऊ शकलो.
अरविंदजींची हि कविता मला तरी उत्स्फूर्त कवितेचे उत्तम उदाहरण वाटते. कवितेचा जन्म कदाचित अभिव्यक्ती (केवळ व्यक्त होणे नाही) या साठीच झाला असला पाहिजे, आणि हि कविता म्हणजे अभिव्यक्तीचा उत्तम नमुना वाटते. कदाचित विषयांतर होईल आणि कदाचित माझा मुद्दा विवादास्पद देखील होईल, परंतु माझा हाच मुद्दा अधिक सुस्पष्ट करण्यासाठीच मी हे विधान करण्याची हिम्मत करतो कि, काही वेळा सुरेश भट साहेबांच्या काही गझलादेखील या कलाकृती म्हणून उत्तम असल्या तरीही त्या मध्ये कृत्रिमतेचा भास होतो किंवा त्या थेट काळजाला जाऊन भिडत नाहीत. त्या कौशल्यपूर्ण वाटतात; परंतु भावपूर्ण वाटत नाहीत. याउलट जर बहिणाबाईंची कुठलीही रचना पहिली तर त्यामध्ये भावार्तता ओतप्रोत भेटते. त्यामध्ये कौशाल्याहून अधिक आशय गर्भता आणि भावपुर्णता अधिक वाटते. ती कविता थेट मनाला जाऊन भिडते, कायम लक्षात राहते. (मी हे माझे वैयक्तिक मत नोंदवत आहे, यामध्ये दोन कवींची तुलना करण्याचा उद्देश नाहीच, परंतु मी या कवींचा फार सखोल अभ्यास केला आहे असा दावा देखील नाही.)
असो, अरविंदजींची हि रचना अशीच सखोल आशयाने परिपूर्ण अशी वाटते. एकाच कवितेमध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील काही विविध वैषम्यांना स्पर्श केला आहे, आणि त्या वैषम्यामध्ये असलेल्या वैगुण्यावर भाष्य करण्यापेक्षा कुठेतरी नकळत एक सकारात्मक संदेश त्यामध्ये दडला आहे. माझ्या मते कविता लिहिताना कवीचा कुठेही असा सकारात्मक किंवा विधायक संदेश देण्याचा विचार नव्हता, तर मनामध्ये निर्माण झालेल्या भाव-विचारांना व्यक्त करणे इतपतच स्फूर्तीने लिहिलेल्या या कवितेतून तो सकारात्मक संदेश आपोआपच प्रकट झाला आहे. तो संदेश किंवा विचार हा कवितेचा गाभा न बनता त्या वैषम्यावर केलेले समांतर भाष्य होऊन जाते.
कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य जे मला जाणवले ते म्हणजे कवितेमध्ये स्पर्श केलेले वैषम्य आणि त्यावरील विचारात्मक भाष्य हे दोन्ही इतके नेमके आहे कि त्यामध्ये आवश्यक संदेशात्मक भाष्य अंतर्भूत आहेच, परंतु तरीही त्या वैषम्यावर विचार संपला आहे असे वाटत नाही, किंबहुना तो विचार तिथून पुढे सुरु होतो, आणि अशा तऱ्हेने हि कविता तुम्हाला विचारप्रवण करते.
"आनंदाश्रू गळायला आभाळभर आनंद हवा" हे सांगताना आपण दु:ख करत राहतो असे सांगण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपण वेचायला विसरतो हि किती निराळ्या पद्धतीने सांगितले आहे, आणि मग पुढे आपण तो आनंद कसा वेचू शकतो यावर विचार करायला आपल्याला प्रवृत्त केलेले आहे. थोडे लिहून खूप काही सांगणे आणि खूप पुढे विचार करायला भाग पडणे हेच तर कुठल्याही रचनेचे यश असू शकते.
प्रत्येक विचारामध्ये एक प्रकारच नाविन्य देखील आहे. दगडांना ठोकर खाव्याच लागणार हे कठोर सत्य प्रामाणिक निष्ठुरपणे मांडतानाच अखेरीस जखमा वाटून घेण्याचा विचार मला कवितेमध्ये भासलेल्या त्या सकारात्मकतेचे प्रमाण तर आहेच, पण सुरुवातीला नकारात्मक वाटणारी कविता तिथे पूर्ण होते असे वाटते. साऱ्याच समस्यांना उत्तर नसते, साऱ्याच समस्या सोडवता येत नसतात; तर त्या समस्यांचा जीवनातील नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी काही उपाय करता येतात याचे हे उत्तम उदाहरण होते. एखादा अपंग व्यक्ती पुन्हा कदाचित धडधाकट होऊ शकत नाही. या समस्येला कदाचित वैद्यकीय पर्याय नसेलही, परंतु त्या व्यंगामुळे हतबल होऊन जीवनाला नाकारण्यापेक्षा व्यंग नसलेल्या अवयवांना जीवनामार्गात वापरावे असाच काहीसा धडा या विचारातून मिळून जातो.
लोकांचे शिव्याशाप थांबवता येत नाहीत हे तर जगन्मान्य सत्य. परंतु ते शिव्याशाप हेच जिवंतपणाचे एक लक्षण असू शकते असा विचार कितीजणांनी केला असेल. हा दृष्टीकोन किती बरोबर; किती चूक, किती उपयोगी कि कितपत प्रत्यक्षात आणणे शक्य या वृथा चर्चेपेक्षा हा देखील एक दृष्टीकोन असू शकतो, हा विचार मला अधिक आकर्षक वाटतो. तिथेच पुढील विचारांना सुरुवात होते.
मी या कवितेला कुठलीही विशेषणे देणार नाही. बरेचदा विशेषणांमुळे कवितेविषयी एक पूर्वग्रह निर्माण होऊ शकतो. म्हणून मी इतकेच म्हणू इच्छितो कि या कवितेला रात्री उशाशी घेऊन झोपावे, कदाचित एखाद्या चीठो-यावर लिहिलेल्या त्या कवितेचे सकाळी उठे पर्यंत एक पुस्तक झालेले असू शकते!
No comments:
Post a Comment