मराठमोळ्या मातीमध्ये मत्त मातली म्लेंच्छ-भुते,
मर्द मराठे मरून उरली जिवंत त्यांची भ्याड भुते.
झुगारण्या ते अजस्त्र जोखड मावळ-स्कंधी रुतलेले,
उभारण्या ते अवनत मस्तक यवन पदांशी झुकलेले.
पराक्रमाच्या नावेमधुनी संकट सिंधू तरावया,
गिरी रायरी सारे जमले अरि निर्दालन करावया.
नेत्रांमधल्या स्फुल्लींगांची तप्त अर्पिली खूप फुले,
छातीमध्ये स्वातंत्र्याच्या दृढ स्वप्नाचा दीप जळे.
धमन्यांमध्ये उसळत जाते अभिमानाची लाट नवी,
ओठांमध्ये जयघोषाची गीते गाती वीर कवी.
धडधडणाऱ्या काळजातुनी प्रदीप्त तारा तडितेच्या,
भळभळणाऱ्या बोटांमधुनी धारा रक्तिम सरितेच्या.
विशाल भाळी तिलक रेखुनी दिली गर्जना वकुबाने,
स्वातंत्र्याचे तख्त स्थापण्या शपथ घेतली शिवबाने.
============================== =====
सारंग भणगे. (२७ नोव्हेंबर २०१२)
No comments:
Post a Comment