तुला 'जीवना'चे दिले दान आहे
तुझा जन्म हे जीवना दान आहे
मला कोरड्या रूदनाची समस्या
तुझे क्रंदणे हे समाधान आहे
नभी वीज ती गूज सांगे मनाचे
मनी अंकुरे बीज आलिंगनाचे
कुठे दूर ऐकावया येत आहे
मला मेघमल्हार तव स्पंदनाचे
घनावीण वीणा न वाजे मनाची
विणू वीण दोघे तनाशी तनाची
अरे कृष्णवर्णा तुला काय वर्णू
करूणाघना वंचना ‘जीवना’ची
झरा 'जीवना'चा उरी वाहु दे ना
नदी यौवनाने उतू जाउ दे ना
किती काळजाचे चरे मी सहावे
घडा अमृताचा रिता होउ दे ना
======================
सारंग भणगे. (२८ डिसेंबर २०१३)