Wednesday, December 3, 2014

बागेश्रीची कविता

घरात भिंत उभी मधोमध
अल्याड पल्याड दोन गाव
बाहेर पाटी एकच नाव...!
तिनं राखलंय एक तावदान
भिंतीच्या अगदी मधोमध,
कधी इच्छा अनावर झाली
की येते ती खिड़कीशी
पाहत राहते
कामाचा व्याप,
त्याची लगबग
तास अन् तास
त्याला जाणीवही नसते
तिच्या असण्याची...
त्यानं राखलंय एक भुयार,
हवं तेव्हा तिच्याकडे येण्यासाठी!
इच्छा अनावर झाली
की तो तिच्याकडे येतो!
शमली की जातो,
भिंतीच्या पल्याड!
तिने कित्येक संध्याकाळ
खिडकीशी काढल्यात!
-बागेश्री देशमुख
==========================
कविता अगदी स्पष्ट आहे. एक परिस्थिती ज्यात ती त्याच्या सोबतीची अनावरपणे वाट पाहत राहते; त्यावेळी त्याच्याकडे तिच्यासाठी वेळच नसतो. तो आपल्याच विश्वात गुंगलेला, आणि ती त्याच्या विश्वात गुंतण्यासाठी आतूर. त्याचे गुंगणे इतके कि तिच्याबरोबर गुंतवणूक करायला ना त्याच्याकडे वेळ, ना तसे काही भान! त्याचे ते गुंगणे तिला सतत गुंगारा देणारे. पण तो तरीही वाट पहात राहते.....कित्येक संध्याकाळी!

तो आपल्या विश्वात गुंगलेला, पण त्याने असे काही भुयारी मार्ग काढलेले कि जेव्हा त्याची इच्छा होते तेव्हा तो सहज तिच्या पर्यंत पोहोचू शकतो. मात्र तो तिचा संग करतो केवळ आपल्या इच्छापूर्तीपुरताच, आणि एकदा का ती शमली कि तो त्या अडग भिंतीपलीकडच्या आपल्या विश्वात गुंगून जातो पुन्हा एकदा......त्याची इच्छा पुन्हा एकदा अनावर होईपर्यंत!

इथे त्याच्या इच्छा शमवणे हे मी केवळ शारीरिक वासना शमवणे अशा मर्यादित अर्थाने घेणार नाही, जरी ते ‘शमणे’ ह्या क्रियापदाच्या वापरामुळे प्रतीत होत असले तरी. कवियत्रीच्या मनात ते तशाच मर्यादित अर्थाने आहे कि नाही ठाऊक नाही, पण वाचकाला कविता व्यापक करण्याचा मुलभूत अधिकार असतो, तो वापरून मी त्या इच्छा ह्या सर्व प्रकारच्या इच्छा मानेन. कुटुंबासोबत सहवासाची देखील इच्छाच. ती त्याच्या बाबतीत केवळ एक इच्छा असते; तर तेच तिच्याबाबतीत एक जगण्याची गरज असते; आवश्यकता असते.

तिच्यासाठी भिंतीला तावदान. तिला फक्त पलीकडचे पाहता यावे म्हणून, तर त्याला भिंतीचा अजिबात अडसर नाही, कारण त्याने भिंतीखालून भुयार खणले आहे. म्हणजे ती भिंत जेव्हा त्याला हवे तेव्हा कामास येते, आपल्या विश्वात रमून जायच्या वेळी, आणि ते भुयार कामास येते जेव्हा तिच्या विश्वातून त्याला आपली इच्छापूर्ती करून घ्यायची असते.

तिला दिलेले तावदान हे वरपांगी वरदान वाटते, तिला त्याच्या विश्वात डोकावून पाहण्यासाठी दिलेली संधी वाटते. पण एका अर्थाने त्या तावदानातून पलीकडचे विश्व तिला पाहता येते जे तिला सतत वाकुल्या दाखवत राहते. त्या पलीकडच्या विश्वात त्याचे रमणे हे तिला खिजवत राहते, आणि तावदानाचे वरदान तिच्यासाठी शाप बनून राहते.

एक विलक्षण असा विसंगती-विलास ह्या कवितेत दिसून येतो. वरवर तशी साधीच वाटणारी कविता जेव्हा तिच्या दृष्टीकोनातून किंवा खरेतर तिच्या भूमिकेत शिरून पहिली जाते तेव्हा एक विमनस्क करणारं रखरखीत आणि खरखरीत वास्तव समोर येतं.

आजच्या शहरी जीवनातील एक सत्य परिस्थिती हि कविता चित्रित करते का? ह्या modern जमान्यातील स्त्रीची व्यथा हि कविता मांडते का? एक दुर्लक्षित केली जात असलेली किंवा पुरूषी प्रभाव असलेल्या समाजव्यवस्थेमध्ये वाढत चाललेली समस्या हि कविता मांडते का? असे स्वाभाविक प्रश्न माझ्या मनात निर्माण होतात. कदाचित एवढा सम्यक् विचार कविता लिहित असताना होत नसतो, पण वाचक जेव्हा बारकाईने वाचतो तेव्हा कवितेची व्यापकता त्याला जाणवू शकते, आणि तसेच काहीसे माझे ह्या कवितेवर विचार करताना होऊन गेले आहे. वरवर तशी साधी आणि स्पष्ट वाटणारी कविता एका अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीला शब्दांकित करते असे वाटते.

तिचे तावदान आणि त्याचे भुयार हि प्रतीके ह्या कवितेचा प्राण आहेत. मागे एका कवितेवरील चर्चेमध्ये 'काव्यमूल्य’ असा शब्द/ विषय चर्चेला आला होता. त्याची व्याख्या त्यावेळी केली गेली नाही. पण ह्या क्षणी मला जर ह्या कवितेतील काव्यमूल्य विचारले तर हि दोन प्रतीके; हि दोन रूपके ह्यात ह्या कवितेचे काव्यमूल्य संपुटीत झाले आहे असे मला वाटते. वरवर ती सामान्य वाटतील, पण त्या दोन प्रतीकांमागे एक विशिष्ट विचार आहे असे मला वाटते.

काव्याच्या व्युत्पत्ती आणि उत्पत्तीविषयी विचार करायचा झाला तर हि प्रतीके हि हेतुपुरस्सर योजून जन्माला येत नाहीत. कविता सहसा उत्स्फूर्त नसते असा मानणारा एक वर्ग आहे, परंतु मी व्यक्तिश: कविता हि उत्स्फूर्त असते अशा school of thought चा आहे. अर्थात, उत्स्फूर्तता म्हणजे काय हे थोडे समजून घेण्याचा भाग आहे, परंतु तो विषय अलहिदा वेगळा. तर हि प्रतीके माझ्या मते उत्स्फुर्तपणे कवितेमध्ये लिहिली गेली असावीत, आणि ते तसे असेल तर मला असे वाटते कि हे सारे कुठेतरी अंतर्मनात कोरले गेलेले असते जे परावर्तीत होऊन कविता रूपाने साकार आणि व्यक्त होते; गोचर होते. तो एखादा विचार, अनुभव, अनुभूती मनामध्ये किंवा अंतर्मनामध्ये नकळतपणे वास करून असते आणि केव्हातरी ती त्या डोहाच्या तळातून सळसळत बाहेर येऊन मनाच्या तळ्याच्या दर्शनी प्रतलावर तरंगांच्या रूपाने उमटते. मागे एकदा उमेशदांनी म्हटल्या प्रमाणे परावाणी मनाच्या खोल गुहेतून प्रवास करत करत आपल्या नकळतपणे वैखरीमध्ये ‘परा’वर्तीत होते आणि कविता निर्माण होत असावी! तो विचार बीज बनून मनात रूजत राहतो आणि जेव्हा तो परिपक्व होतो तेव्हा मनाची जमिनीखालचे अव्यक्त प्रतल फाडून कवितेच्या माध्यमातून धरतीवर फुलारतो.

हे सर्व लिहिण्याचे कारण एवढेच कि सुरूवातीला जेव्हा मी हि कविता वाचली तेव्हा ह्यात काव्य काय? प्रत्येक असल्या सामान्य विचाराचे काव्य लिहिलेच पाहिजे का? प्रत्येक विचारला कवितेमध्ये बांधलेच पाहिजे का? ई. प्रश्न माझ्या मनात येऊन गेले. परंतु मी जेव्हा कवितेवर अधिक बारकाईने विचार करू लागलो तेव्हा ही कविता वाचनातून समजण्याच्या पलीकडे समजू लागली.

अखेरीस एवढेच लिहू इच्छितो कि हि कविता स्त्रीच्या भूमिकेतूनच; नव्हे त्या भूमिकेशी समरस होऊन वाचली पाहिजे तेव्हाच ती मनाच्या संवेदनांच्या तारा कुठेतरी हलक्याश्या छेडू शकेल. एका अर्थाने स्त्रीचे तिच्या पतीविषयी, प्रियकराविषयीचे भावविश्व केवळ एकाच प्रतीकातून उलगडून दाखवणारी कविता मला आवडली.

म्हटले तर कवितेत हवे तेवढी वैगुण्य काढता येतील. परंतु जेव्हा एकदा कवितेतील संवेदनेशी माझी समवेदना झाली तेव्हा मला त्या वैगुण्यांवर बोट ठेवण्यातच वैगुण्य वाटू लागले.........इथेच थांबतो, कारण पुढे असे लिहायचे प्रसंग बरेच येतील!

- सारंग भणगे.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...