Saturday, December 13, 2014

* घुसमट *


तू घरी येतोस...मी दार उघडते
तूझा चेहरा हसरा नसतोच
मीच हसते थोडी गालात.....
नेहमीप्रमाणे मख्ख असतोस तू
मी बडबडत राहते स्वयंपाकघरातून
तू हातातली मोज्यांची वळकटी
माझ्या शब्दांसकट बूटात ठेवतोस...
मी विचारत राहते अनेक प्रश्न
सांगत राहते काहीबाही
दिवसभरात घडलेले...दिसलेले....ऐकलेले
....हातपाय धुवून येताना तू
फ़िरवून जातोस यंत्राप्रमाणे तुझा हात
माझ्या घामेजलेल्या अंगावरुन...
मला कळतं रे...तुझे स्पर्श तर नक्कीच कळतात
किळसवाणे वाटतात तुझे स्पर्श
जेव्हा मी जीव तोडून बोलत असते
आणि तू खेळत असतोस
माझ्या चेतनाहीन अवयवांसोबत...मख्खपणे...
"हो" किंवा "नाही" च्या पलिकडे उत्तर नसते
माझ्या एकही प्रश्नाला तुझे
आणि मी मुर्खासारखी घुटमळत राहते
तुझ्या आजूबाजूला...
तुझा तुटपुंजा सहवास मिळवण्यासाठी...
जेवणाची ताटं करकरतात...भरली जातात
निमूटपणे रिकामीही होतात
माझे बोलणे चालूच असते
तुझे ऐकणेही चालू असते...
तशाच ओल्या हातांनी
अंथरुणं जमिनीवर कोसळतात
घाबरल्यागत... डोळे मिटून...
कदाचित त्यांनाही माहित असावं
कि थोड्या वेळात सुरु होणार आहे
तुझे बोलणे आणि माझे फ़क्त ऐकणे....
तुझा दिवस इथेच संपतो
माझा मात्र संपत नाही
मी अंधारातही बघत राहते
तुझ्या चेहर्‍यातला मख्खपणा
अगदी पहाट होईपर्यंत...
--संतोष वाटपाडे (नाशिक)
-------------------------------------------------
कविता हे अभिव्यक्तीचे सर्वात सशक्त माध्यम. अभिव्यक्ती म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे आपल्या भाव-भावना कलात्मक पद्धतीने मांडणे. त्यामुळे सहसा कवितांमधून आपले अनुभव, आपल्या जाणीव, भाव-भावना आणि विचार व्यक्त होताना दिसतात. एका अर्थाने कविता हे कवीच्या स्वत्वाचे दर्शन असते. कुठल्याही प्रसंगावर कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा ती त्या प्रसंगाबाबतचा कवीचा दृष्टीकोनच व्यक्त करते.

पण काही वेळा तटस्थ राहून; दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून त्या दुसऱ्याच्या भूमिकेतून आपले कथन काव्यातून करणे किंवा आपला दृष्टीकोन व्यक्त करणे हे काही खूप नवीन नाही. परंतु तटस्थ राहून स्वत:वरच टीका करणारी कविता हि अगदी नवीन नसली तरी विरळा असते असे वाटते.

संतोषजींच्या ह्या कवितेत कदाचित ते स्वत:चा दृष्टीकोनच मांडत असतील, परंतु स्त्रीच्या भूमिकेत शिरून; तटस्थ राहून; एका अर्थाने स्वत:वरच टीका करण्याचा प्रामाणिकपणा ह्या कवितेत निश्चितपणे जाणवला.

तसे पाहता कविता काही अनोख्या विषयावर नाही. अनेक स्त्रियांनी (कदाचित पुरूष कवींनी देखील असेल) अशा प्रकारची स्त्रीवादी म्हणवली जाईल अशी कविता कैक वेळा लिहिली असेल. परंतु मी आधी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही पुरुषाने अशी कविता लिहिताना इतका प्रामाणिक तटस्थपणा आढळलेला नाही.

कवितेचे शीर्षक बिन-महत्वाचे असते असा एक सर्वसाधारण सार्वत्रिक समज आहे. परंतु इथे मला कवितेच्या शीर्षक हे सूचक वाटते. म्हटले तर कवितेला अनेक रंग देता येऊ शकतील. उदा: ह्या कवितेला ‘पिळवणूक’ असेही शीर्षक देता आले असते, आणि ते तसे दिले गेले असते तर कवितेचा भावार्थ बदलला असता, असे मला वाटते. परंतु ‘घुसमट’ हे शीर्षकच कवितेविषयी उत्सुकता निर्माण करणारे आहे, तसेच ते कवितेचा गाभा सांगणारे आहे. कवितेतील शब्दातून जितके काही व्यक्त होते ते कवितेच्या ह्या शीर्षकाने अधिक ठळक होते, असे मला वाटून गेले.

अर्थाच्या दृष्टीने कविता सरळ आणि थेट आहे. असे वाटून गेले कि हीच कविता; हीच भावना जर स्त्रीने लिहिली असती तर कदाचित ती इतक्या सरळ आणि थेट नसती लिहू शकली. माझ्या इथेच अभिव्यक्तीमधील तो फरक जाणवतो.

शब्द बुटात ठेवणे; घामेजले अंग; चेतनाहीन अवयव; तुटपुंजा सहवास; ताटं करकरणे; निमूटपणे रिकामी होणे; अंथरूण घाबरणे; ई. ठिकाणी कविता जिवंत होते, ती अनेक निर्जीव गोष्टींना सजीव करते. ते सर्व वाचताना कवितेत व्यक्त केलेल्या भावना जिवंत होतात, अधिक खोल आणि ठळक होतात. कविता मनाचा ठाव घेत राहते आणि वाचक कवितेत गुंतून राहतो, कवितेशी त्याची सह-अनुभूती होते. काव्याच्या दृष्टीकोनातून हि सर्व कवितेची सौंदर्यस्थळ आहेत, आणि भावनेच्या दृष्टीकोनातून कवितेला भावनिक खोली देणारी स्थळ आहेत.

मला कवितेमध्ये सर्वात आवडलेला भाग म्हणजे –

कदाचित त्यांनाही माहित असावं
कि थोड्या वेळात सुरु होणार आहे
तुझे बोलणे आणि माझे फ़क्त ऐकणे...

कवितेच्या अंताला कविता उच्चांकाला पोहचते. मी पहिल्यांदा जेव्हा हि कविता वाचली तेव्हा मला ह्याच ओळी हे कवितेचे वैगुण्य वाटल्या. कवीला नक्की काय म्हणायचे आहे ते मला कळले नाही. परंतु जेव्हा मी आत्ता ह्या कवितेवर माझे विचार लिहायला लागलो तेव्हा मला ह्या ओळी अंगावर येणाऱ्या वाटल्या, आणि हे सर्व लिहित असताना माझ्या अंगावर वारंवार अक्षरश: काटा आला, डोळे किंचित पाणावले.

ते त्याचे ‘बोलणे’ काय आहे ह्याचा अर्थबोध हा पुरूष म्हणून मला अतिशय उद्वेगजनक वाटला! ती जे बोलते आणि तो जे बोलतो ह्यातील हि तफावत पुरूष म्हणून मला लाजायला लावणारी वाटली.

संतोषजी, कविता इथे जिंकते. ह्या क्षणी मी ह्यावर अधिक लिहू शकत नाही, परंतु तुम्ही हे जे लिहिले आहे त्याला सलाम. एरवी छान वाटणारी, पण फार काही outstanding न वाटणारी हि कविता इथे अक्षरश: उच्चांकाला पोहोचते, आणि वाचकाचा; विशेषत: पुरूष वाचकाचा कडेलोट करते एवढेच म्हणून मी इथे थांबतो!

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...