Monday, April 27, 2015

चालत गेलो

मी स्वप्नांना तुडवित तुडवित चालत गेलो
नवीन स्वप्ने घडवित घडवित चालत गेलो

जसे धरावे मनी तसे ना होते कधीही
होते त्याचा अनुभव होतो थोडा तरीही
मनात अनुभव मढवित मढवित चालत गेलो

किती मिळाले किती हरवले हिशेब त्यांचा
करूनही का उरून गेला उरात हातचा
त्या हाच्च्याला मिळवित मिळवित चालत गेलो

नवी पालवी बघून झाला हर्ष मनाला
पानझडीच्या ऋतूत लागे घोर जीवाला
भावझुल्याला झुलावित झुलावित चालत गेलो

घडायचे ते घडून गेले असे म्हणाले
घडेल ते ते पहात रहावे असे म्हणाले
घडी घडी मी घडवित घडवित चालत गेलो

--
सारंग भणगे
(११ मार्च २०१५)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...