Thursday, January 29, 2015

गाणे गात फिरावे


आकाशातून भिरभिरणारे गाणे गात फिरावे
दरीदरीतून दुमदुमणारे गाणे गात फिरावे

शांत तळ्याच्या गालावरती वलये उठवीत जाऊ
जलथेंबांच्या तालावरती नाचून थोडे पाहू
पानावरती टपटपणारे गाणे गात फिरावे

गवतावरती गोंडस बोंडे गवतफुलाची तोंडे
कशी शाल्मली हृदयामध्ये जपते कापूसगोंडे
तृणपात्यातून हुळहुळणारे गाणे गात फिरावे

छाती फाडून दुर्गकड्याची वाहे झुळझुळ पाणी
गोड गळ्याने निर्झर गाती निर्मळ मंजुळ गाणी
नदीकाठातून खळखळणारे गाणे गात फिरावे

तलम धुक्याचे गर्द रेशमी पडदे सारून थोडे
क्षितिजावरती सूर्य सोडवी अंधाराचे कोडे
सांज नभाशी कुजबुजणारे गाणे गात फिरावे

ओढ लावते संध्या तिजला गाऊ तरल तराणे
गाढ झोपल्या रात्रीसाठी अंगाईचे गाणे
चांदण रात्री लुकलुकणारे गाणे गात फिरावे
-------------------------------------------------------
सारंग भणगे. (२९ जानेवारी २०१५)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...