कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्याच्या मूळापाशी जाऊन शोधत आलं पाहिजे. मग मी कविता का करतो ह्याच उत्तर मला तरी माझ्या पहिल्या कवितेत दडलेलं असावं, असं वाटतंय. पाहूया!
८ वी इयत्तेत मी माझी पहिली कविता केली होती हे मला स्पष्ट आठवत. अभ्यासाच्या tension मध्ये मी कविता केली होती. कविता विशेष आठवत नाही. पण त्याक्षणी ती कविता करणे क्रमप्राप्त होते हे निश्चित.
परीक्षेची पूर्वतयारी करत असताना अभ्यासाच्या काही गोष्टी लक्षात राहत नव्हत्या. त्या वयात येते तसे किंचितसे नैराश्य मनात दाटले होते, आणि त्या नैराश्यातून कवितेने जन्म घेतला. एका डायरीच्या शेवटच्या पानावर काही ओळी खरडल्या असतील. एक ओळ स्पष्ट आठवते म्हणजे ‘देवा आमची अशी का रे बुद्धी’. म्हणजे ती किंचित निराशा, वैफल्य ह्यातून ईश्वराला त्यावेळच्या बुद्धीनुसार असा सवाल पुसला होता कि हे अभ्यासाचे माझ्या लक्षात राहत नाही अशी बुद्धी तू का दिलीस?
प्रसंग कदाचित वरकरणी अत्यंत किरकोळ आणि सर्वसामान्य वाटत असेल, किंबहुना आहेही. परंतु ह्या प्रसंगातून एक गोष्ट ठळकपणे स्पष्ट होते कि मी कविता व्यक्त होण्यासाठी करू लागलो. हा असा प्रसंग निश्चित आहे कि त्या क्षणाच्या माझ्या भावना मला इतर कुणाशी नव्हे; तर फक्त त्या मुक्या कागदांशीच बोलता आल्या असतील! व्यक्त होणे हे कवितेचे (कदाचित कुठल्याही कलेचे) सर्वात प्रथम; सर्वात मुलभूत आणि शाश्वत असे कारण आहे, हे निश्चित!
आता मग दुसरा प्रश्न असा स्वाभाविक येतो कि व्यक्त होण्यासाठी काय फक्त कविता हीच एक कला होती का? निश्चित नाही! माझा मोठा भाऊ उद्विग्न झाला, चिडला कि चित्र काढायचा. त्याची चित्रकला खरोखर सुंदर होती. अजून त्याने अशा मानसिक अवस्थेत काढलेली चित्र मला स्पष्ट आठवतात. तो त्यातून व्यक्त होत होता, मी कवितेतून! स्पष्टच आहे कि जरी मनुष्याला व्यक्त होण्याची गरज असली तरी प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी दिलेली कला वेगवेगळी आहे.
मग पुढचा प्रश्न हा आहे कि हे माध्यम त्या व्यक्तीमध्ये कुणी दिले? माझ्या मते ते प्रत्येकजण घेऊनच जन्माला येतो. म्हणजे ते जन्मदत्त आहे; ईश्वरदत्त किंवा निसर्गदत्त असते.
त्यानंतरची कविता ९ वी इयत्तेत केली ती भारत देशावर. माझी पहिली कविता ही प्रसंगोद्भव होती, तर ही दुसरी कविता अधिक सहज आणि उत्स्फूर्त असावी. ही दुसरी कविता वरकरणी तरी मी माझ्या कुठल्याशा व्यक्त होण्याच्या आवश्यकतेतून लिहिलेली नव्हती. परंतु थोडा अधिक विचार करता मला असे वाटते कि ती देखील माझी एक व्यक्ततेची आवश्यकताच होती. माझ्या मनातील माझे देशप्रेम मला जगासमोर मांडायचे असेल कदाचित. त्यातून ह्या काव्याची निर्मिती झाली असावी.
जशा आपले अनुभव, ज्ञान, जाणीवा, भाव-भावना, विचार ह्यांच्या कक्षा विस्तारत जातात तशा काव्यनिर्मितीच्या प्रेरणा अधिक विविधांगी होत जातात. कधी कधी आपण आपल्यातील कवित्वाच्या जाणीवेने एखादी कविता लिहायला स्वत:ला भाग पाडत असूत. परंतु तरीही कळत नकळत प्रत्येक कवितेत स्वयंप्रेरणा आणि उत्स्फूर्तता ह्यांचा काही ना काही अंश असतोच असतो. ती स्वयंप्रेरणा आपल्याला व्यक्त होण्यास ‘भाग पाडते’. हे ‘भाग पाडते’ पुरेसे सूचक आहे कि कविता लिहिणे ही आपली आवश्यकता असते.
काही कविता लिहून झाल्यावर एक मनस्वी आनंद मिळतो. हा मनस्वी आनंद ही देखील कलाकाराची गरज होते, आणि त्यातून अधिक कविता लिहिण्यास मी प्रवृत्त होतो, ज्याला आपण स्वान्त सुखाय म्हणतो.
आता गेल्या सुमारे १० वर्षात आपल्या कविता सहजपणे इतर कवी-रसिकांसमोर मांडण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे, त्यामुळे काही वेळा वाचकांच्या सुखावणाऱ्या, आणि काही वेळा टीकात्मक प्रतिक्रियातून देखील जो आनंद मिळतो, तो पुढील काव्यलेखनाला प्रेरक असतोच असतो! तसेच इतरांचे काव्य वाचून, त्यातून काही नवीन शिकून काव्य लिहिण्याची प्रेरणा मिळत राहते. अशी सुद्धा काव्यलेखनाची प्रक्रिया चालूच राहते.
पण तरीही मुलत: व्यक्त होणे हेच माझ्यासाठी कवितेचे स्वरूप आहे आणि ते श्वास घेण्याइतकेच आवश्यक आहे!
सारंग भणगे