अशा पर्वताच्या पोटातील आतड्यासारख्या अंतहीन गुहेच्या शेवटी
त्याचं पार्थिव अस्तित्व होत..
अंधाराला देखील भय वाटावं
इतक्या गडद काळोखानं अनंत काळ माखलेल्या
एका तमव्याकूळ विश्वात!
अन त्यामध्ये टाचा घासत
आयुष्याचे कंटाळवाणे क्षण
अपरिहार्य हतबलतेने व्यतीत करताना
ते अंधारविश्व हेच केवळ एक सत्य मानणाऱ्या
आणि ह्या पलीकडचे विश्व हे अज्ञेय वाटणाऱ्या
त्याच्या अंत:करणात अचानक एक दिवस
त्या अज्ञाताचा शोध घेण्याची मनीषा जागी झाली
मार्ग शोधायचा लागलेला अथक ध्यास
निबिड अंधारात चाचपडणारे हात-पाय
ह्या अविरत अविश्रांत धडपडीतून
एक उर्जास्त्रोत त्या अथांग गुहेच्या तोंडाकडे
विलक्षण वेगाने गेला आणि...........
अनादी काळापासून प्रथमच
प्रकाशाचा एक बंडखोर किरण
त्या अक्षय अंधाराच्या अचेतन विश्वाला
अक्षरश: चिरत सळसळत
त्या गुहेच्या ओटीपोटात शिरला.....
==========================
सारंग भणगे (२४ ऑगस्ट २०१७)
No comments:
Post a Comment