वयात आलेल्या माझ्या मुली,
आता जेव्हा तू माझं बोट सोडून
ह्या रस्त्यांवर उतरशील,
तेव्हा तुला भेटतील
ह्या शहरात वावरणारी
अनेक जंगली श्वापदे,
दिसतील कोल्हे; लांडगे; गिधाडे;
आणि अनेक जळवा; पिसवा,
अंगाला लुचणाऱ्या; रक्त पिणाऱ्या!
लुचेल एखादी जळू तुझ्या मऊ कोमल त्वचेला;
लचके तोडायला अंगावर धावतील लांडगे;
आणि फसवतील काही लबाड कोल्हे
तुला त्यांचं भक्ष्य करण्यासाठी!
तू लढ; हरू नकोस; भिऊ नकोस!
ह्या कभिन्न जंगलात भिन्न रहा आणि चालत रहा!
एखाद अनावर जनावर
तुला ओरबाडून; तुझ्या तनुची लक्तरं करू पाहील
जरी भक्ष झालीस तरी तुझ लक्ष्य विसरू नकोस,
स्वत:ची घृणा तर कधीच करू नकोस!!
शरीरावर झाले आघात
तरी तुझ मन त्यापासून अस्पर्श ठेव,
शांत रहा, पण भ्याडपणाने गप्प राहू नकोस!
अन्यायाचा थयथयाट कितीही असला तरी
तुझ्या अंतरंगातल्या अमर्याद शक्तीच्या थैमानापुढे
त्यांचा टिकाव लागणार नाही!
त्या शक्तींना टिकव,
आणि वेळप्रसंगी
त्या शक्तींचा टिकाव ह्या श्वापादांवर घालून
त्यांच्या नृशंस; हिडीस वृत्तीला ठेचून मार!
पण असा बदला हेच जीवनाचे ध्येय
बनवू नकोस!
तुझ ध्येय कितीतरी उदात्त आहे,
ते ओळख; पारख!
ह्या जळवा; पिसवा फेकून दे
आणि तुझा काजवा शोध!
होय, ह्या घनघोर जंगलात
काही काजवेही भेटतील तुला;
हा विश्वास ठेव!
आणि नाहीच मिळाला एकही काजवा
तर तुझ्या मनमंदिरात काजव्यांचे थवे शोध!
त्या काजव्यांची मशाल जेव्हा तुझ्या अंतरंगात पेटेल
तेव्हा हे जंगल देखील उजळून निघेल!!!
तेव्हा जग तुझ बोट धरून चालायला शिकेल!
============================
सारंग भणगे (११ ऑक्टोबर २०१७)