Saturday, October 21, 2017



कलापूर्ण व्हावे.. जगावे असे की..
सुरांसोबती ताल मिसळून जावा..
धुमारे फुटावे हजारो... मनाला..
निळाभोर.. आकाश पक्षी उडावा..

कधी चित्र-रंगात गुंतून जाता
जुन्या चौकटीतून बाहेर यावे
पहाव्यात रेषा..उमलती कशा या
कलामंदिरी.. फक्त देणे उरावे

कलाकार आहेच 'तो' ही निराळा
रुजे पंचभूतात गाणे प्रवाही
असे गूढ शिल्पात कोरून जाई
उरे ना कला.. ना कलाकार राही

* सुनीति लिमये
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सुनीतिताई, फार म्हणजे फार सुरेख रचना आहे!

रणजित नेहेमी म्हणत असतो कि कवितेला छान लय असली कि कविता वाचावीशी वाटते आणि हे खरेच आहे. कविता लयबद्ध असली कि तिला एक वेगळीच उभारी येते. म्हणजे प्रत्येक कविता ही मोरासारखी सुरेख असतेच; पण ती छान लयीत असली कि जणू मोराने तो पिसारा पूर्ण फुलवला कि तो कसा अधिक मनोहर दिसतो, तसे काहीसे होते! तुमच्या ह्या कवितेला इतकी सुंदर लय आहे कि वाचायला खूप मजा आली.

अशा लयबद्ध कवितेला सुंदर शब्दांची साथ मिळाली तर तो पिसारा फुलवलेला मोर जणू आनंदाने थुईथुई नाचू लागला आहे असा अनुभव मिळतो. अतिशय साधेच, पण तरीही कवितेला एकदम अनुरूप असे शब्द तुमच्या कवितेचे सौंदर्य खुलवत आहेत. प्रासादिक कवितांचा उद्देश हाच असतो कि वाचकाला त्यातून एक आनंद मिळावा, आणि तुम्ही जसे लिहिले आहे कि ‘सुरांसोबती ताल मिसळून जावा’; तसे तुमचे हे शब्दसौंदर्य त्या नादमय कवितेच्या सौंदर्यात फार सुरेख मिसळले आहेत.

शब्दांना नाद असतो, पण शब्दातून चित्र देखील निर्माण होते. कुणास ठाऊक मेंदूच्या किंवा मनाच्या कुठल्या कुठल्या अंगांना ते शब्द स्पर्शून जातात आणि कुठल्या कुठल्या संवेदनांना सुखावून जातात! पण अशी सौंदर्यपूर्ण कविता मनाला फार आल्हाद देऊन जाते! त्यासाठी नादमधुर तसेच समर्पक आणि सौंदर्यपूरक शब्द कवितेत योजणे ही सोपी कला नाही. शेकडो कविता वाचल्यावर मग असा अनुभव क्वचित मिळून जातो!

पण कवितेचा खरा आत्मा असतो तो म्हणजे तिचा आशय! ह्या कवितेत जर आशय नसता तर तो पूर्ण पिसारा फुलवून आनंदाने नाचणारा मोर हा एखादा लोकांचे कृत्रिम रंजन करण्यासाठी तयार केलेल्या electronic / मानवनिर्मित मोरासारखा वाटला असता. सौंदर्यपूर्ण कवितेत तितकंच सखोल आणि सघन आशय जेव्हा मिसळलेला असतो, तेव्हा ती कविता खऱ्या अर्थाने जिवंत होतेच; पण कवितेला अधिक उदात्तता देखील येते.

तुमच्या ह्या कवितेत आयुष्य अधिक परिपूर्ण; कलात्मक कसे जगावे हा संदेश हा त्या आशयाचा पाया रचतो, पण शेवटी तुम्ही जेव्हा ‘उरे ना कला.. ना कलाकार राही’ ही ओळ लिहिता तेव्हा जीवन कितीही सुंदर असले तरीही जीवनाची अगदी खरी परिपूर्तता ही त्या तत्वात विलीन होण्यात; कला आणि कलाकार हे द्वैत देखील संपण्यात आहे, हे लिहिता तेव्हा केवळ नतमस्तक व्हावे वाटते!

इतक्या छोट्या कवितेत इतके रंग असे भरले आहेत कि क्षणभर थक्क होऊन गेलो मी! फार आवडली ही रचना!

- सारंग

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...