कधी कधी खूप खूप ओकंबोकं वाटतं
मोठ्या मोठ्या खोलीमध्ये छोटं छोटं वाटतं
कंदीलाची काचदेखील काळी काळी होते
मनामध्ये दाट दाट धुकं बिकं दाटतं
पागोळ्यातून डोळ्यांच्या थेंब थेंब गळतात
उंबऱ्याकडे ओठांच्या भराभरा पळतात
गालावर दु:खाचे शेवाळे वाळत जाते
ओले होऊन देखील ओठ गाल डोळे जळतात
काळंनिळं होतं मन वळबिळ उठतात
आतड्याचे पीळ सारे घट्ट घट्ट होतात
मन मात्र अजूनही मऊ मऊ असते
आठवणींचे काटे त्यात खोल खोल रुततात
कुणी कुणी नसावं एकटं एकटं असावं
आठवणीत कुणाच्या उगा कुढत बसावं
एकांताच्या सुईत एकाकीपण ओवून
थोडं थोडं उसवावं थोडं थोडं शिवावं
=======================
सारंग भणगे (१९ नोव्हेंबर २०१८)
No comments:
Post a Comment